Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

थंडीपासून फळबागा वाचवा

थंडीचा परिणाम फळपिकांवर कशा प्रकारे होतो आणि त्यासाठी उपाय म्हणून आच्छादन व वारा प्रतिरोधक कसे वापरावे, याची माहिती या लेखात आपण घेऊया.

कडाक्याची थंडी दीर्घकाळ राहिल्यास किंवा थंडीची लाट आल्यास फळबागेवर विपरीत परिणाम होतात. थंडीमुळे रात्रीच्या तापमानात घट होते म्हणजेच जमिनीचे तापमान कमी होते. पहाटे तर जमिनीच्या वरच्या थरातील तापमान गोठण बिंदूच्या खाली जाते. कधी-कधी तापमान खूपच कमी होते व त्यामुळे धुके, फेसाची पुंजके असे गोठण अवस्थेतील पाणी हवेत किंवा झाडाच्या बुंध्यात, फांदे, पाने यांच्या बेचक्यात फेसाची पुंजके दिसतात. जमिनीत उपलब्ध असणारे पाणी अतिथंड होते. कुठल्याही वनस्पतीत जवळपास ९० ते ९६ टक्के पाणी असते. त्यामुळे पेशीतील व फळातील पाणीही गोठते. पाण्याचे आकारमान गोठलेल्या पाण्यापेक्षा कमी असते. यामुळे फळातील गोठलेले पाणी आकाराने वाढते व त्याचा परिणाम म्हणून आतील दाब हा बाहेरच्या दाबापेक्षा अधिक होतो.

जमिनीत हवेचा दाब हा वातावरणातील दाबापेक्षा कमी होतो. जमिनीतील दाब कमी, पानांच्या, खोडाच्या पेशीतील पाणी गोठलेले किंवा शीतावस्थेत यामुळे मुळांकडून जमिनीतील पाण्याचे शोषण, मुळं ते खोड, खोड ते फांद्या आणि फांद्या ते पाने यांच्याकडे अन्नद्रव्याचे वहन होत नाही. या सर्वांचा परिणाम खालीलप्रमाणे फळझाडांवर आढळतो.
* प्रकाशसंश्‍लेषणाचा वेग मंदावतो.
* झाडाची वाढ खुंटते.
* मुळांची वाढ खुंटते.
* पानांचा आकार कमी होतो. पर्यायाने पर्णभार कमी होतो.
* अन्ननिर्मितीची क्षमता कमी होते.
* कोवळ्या फांद्या, पाने गळून पडतात. काही वेळा पूर्ण झाडही (थंडीची लाट अधिक दिवस राहिल्यास) सुकून जाते. कारण त्याच्या सर्व पेशी थंडीमुळे गोठून मरण पावतात.
* फूलगळ होते.
* फळ तडकणे किंवा भेगा पडणे यांसारखी विकृती दिसते.

नवीन फळबाग लागवड केलेल्या बागेत व रोपवाटिकेत खालीलप्रमाणे थंडीचा परिणाम आढळतो :
* नवीन फळबाग लागवड केलेल्या रोपांना आणि कलमांना व कलमीकरण केलेल्या फळझाडास डोळे फुटण्याचे प्रमाण कमी होते.
* बियाण्यांची उगवण उशिरा होते, उगवणीचे प्रमाण कमी होते.

केळीवर थंडीच्या लाटेचा परिणाम
थंडीच्या लाटेचा केळीच्या कंद उगवणीवर विपरीत परिणाम होतो. कारण, यासाठी ते १६.० ते ३०.० अंश सेल्सिअस तापमान लागते, म्हणून कांदे बाग ऑक्टोबरअखेर करावी. या वर्षासारखी स्थिती असेल, तर नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करावी. उशीर झाल्यास पुढील वर्षी फळांची वाढ अवस्था थंडीत सापडण्याची शक्यता असते. यामुळे घडाची वाढ हळू होते. घड पक्व होण्यास उशीर लागतो. थंडीचा नवीन मुळे फुटण्यावरही परिणाम होतो. तसेच दिवस-रात्रीतील तापमान तफावत (डायरनल चेंज इन टेम्परेचर) अधिक असल्यास मुळांचे कंकण सडते, कार्यक्षम मुळांची संख्या घटते. पाने वाढ व संख्या कमी होते. जून-जुलै महिन्यात (मृगबाग) लावलेल्या केळीचे केळफूल बाहेर पडण्यास उशीर होतो. कारण, लागवड ते केळफूल या अवस्था पूर्ण होण्यासाठी लागणारे एकूण उष्णता एकक उशिरा पूर्ण होतात.

थंडीचा आणि फळबागेवर पडणार्‍या कीड व रोगाचा संबंध
थंडीची लाट आल्यास सिगारटोका, लीफ स्पॉट आणि जळका चिरूट या बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव केळी पिकावर वाढतो. थंडीच्या काळात आणि पानावर दव साठून राहिल्यास फळपिकांमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव अधिक होण्याची शक्यता असते. आंब्याच्या फुलोर्‍यावर बुरशी रोगाचा (भुरी) प्रादूर्भाव जास्त प्रमाणात होतो. द्राक्षांमध्ये ‘डाऊनी मिल्ड्यू’ किंवा ‘पावडरी मिल्ड्यू’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव अधिक होतो. सहजीवी किटक व बुरशीला हानी पोहोचते. यामुळे किडींच्या (विशेषतः रस शोषणार्‍या व पाने खाणार्‍या) प्रमाणात वाढ होते. उदा. आंब्यावरील मावा, तुडतुडे आणि लिंबूवर्गीय पाने कुरतडणारी अळी, लेमन बटरफ्लाय इत्यादी. सीताफळावर ‘मिलीबग’सारख्या किडींचा प्रादूर्भाव वाढतो.

महाराष्ट्रातील पाऊस-पाण्याचा आढावा आपण ६ डिसेंबर २०१२ च्या अंकात घेतलेला आहे. त्याचे अवलोकन करून सध्या महाराष्ट्रात उपलब्ध असणारे पाणी व उभे असलेले फळबाग क्षेत्र याचा या ठिकाणी प्रामुख्याने विचार केलेला आहे. फळबागेची रोपवाटिका आणि फळबागेचे थंडीच्या काळातील व्यवस्थापन करण्यासाठी प्रामुख्याने खालीलप्रमाणे उपाय करता येतील :
भाजीपाला व फळ रोपवाटिकेचे थंडीपासून संरक्षण
तात्पुरते उपाय
यामध्ये विहिरीचे पाणी सकाळी स्प्रिंकलरने देणे, आच्छादनाचा वापर करणे, वारा प्रतिबंधक कंपाऊंड (ताटी लावणे, तार कंपाऊंडवर बारदाणा लावणे) अशा प्रकारचे उपाय करता येतील. तसेच शेकोट्या करणे, कम्पोस्ट (सेंद्रिय) खताचा वापर अधिक प्रमाणात करणे, विद्राव्य खताची किंवा संप्रेरकाची फवारणी करणे, असे उपाय करता येतील.
कायमस्वरूपी उपाय
भक्कम (सिमेंटचे) कंपाऊंड बांधणे, शेडनेट, पॉलिहाऊसची उभारणी करणे.

फळबागेचे थंडीपासून संरक्षण
फळबागेस रात्री पाणी देणे, विहीर बागायत असल्यास पहाटे पाणी देणे, शेकोट्या करणे, विद्राव्य खतांची फवारणी करणे, आच्छादनाचा वापर करणे, उत्तर-पूर्व व दक्षिण-पूर्व बाजूने कुंपण करणे, जिवंत कुंपण (विंड ब्रेक्स) करणे किंवा वारा प्रतिरोधक झाडे लावणे (शेल्टर बेल्टस् लागवड) इत्यादी. अति तांत्रिक फळबाग लागवडीमध्ये पॉलीहाऊस उभारणे.

वारा प्रतिबंधक व वारा प्रतिरोधक वृक्षांची लागवड
सध्या महाराष्ट्रात आंबा, मोसंबी, संत्रा, लिंबू, द्राक्ष, काजू, डाळिंब, सीताफळ, अंजीर, केळी, चिकू इत्यादी फळपिकांच्या बागा सुस्थितीत दिसतात. यापैकी संत्रावर्गीय पिकांच्या फळबागेस उन्हाळ्यात पाण्याची फार टंचाई जाणवणार नाही. कारण, बहुतांश क्षेत्र विदर्भात येते. यावर्षी विदर्भात चांगला पाऊस पडला आहे. इतरत्र मात्र फळबागेस पाणीटंचाई जाणवेल. यातच जर तीव्र थंडी पडली तर फळबागेचे मोठे नुकसान होऊ शकते.

चिकू, आंबा, काजूसारख्या बागेस वारा प्रतिबंधक वृक्षलागवड केल्यास मोठ्या प्रमाणात उपयोग होतो, तर कमी उंचीच्या फळबागेस इतर पद्धतीचे वारा प्रतिबंधक उपाय केले तरी चालू शकतात. यामध्ये बांबूची अथवा पाचट किंवा ज्वारी व बाजरीचा कडबा, तुराटी किंवा कापसाचे पर्‍हाटी, सिंधीच्या पानाची ताटी चारही बाजूंनी लावता येईल. कायमस्वरूपी वारा प्रतिबंधक म्हणून सिमेंट, वीट अथवा दगडमाती किंवा दगड, सिमेंटचे वारा प्रतिबंधक कंपाऊंड बांधता येईल. तात्पुरता हंगामी उपाय म्हणून तार कंपाऊंड केलेले असल्यास त्यास बारदाणा किंवा प्लॅस्टिक किंवा शेडनेट लावता येईल. पर्यावरणीयदृष्ट्या आणि उत्पन्नाचा व इतर दुय्यम फायद्याचा विचार करता, जिवंत वारा प्रतिबंधक अर्थात वृक्ष लागवड करणे उपयुक्त ठरेल.

वारा प्रतिबंधक किंवा जैविक कुंपण अथवा जिवंत कुंपण हे तंत्र वार्‍याच्या प्रवाहाला, त्याच्या वेगाला अडथळा निर्माण करते. वेगाला प्रतिबंध करते. त्यामुळे वार्‍याचा वेग कमी होतोच; परंतु दूरवरून आलेले थंड वारे एकदम झाडांच्या संपर्कात येत नाहीत. त्यामुळे थंडीपासून वृक्षांचा बचाव होतो. तसेच रात्री फळबागेच्या जमिनीत बाहेर पडणारी उष्णता शेताबाहेर जाऊ देत नाही. यामुळे जमिनीच्या वरच्या थरातील व फळबागेतील तापमानात दिवस-रात्री फार मोठी तफावत येत नाही. यामुळे थंडीपासून तसेच धुक्यापासून फळबागेचे नुकसान कमी होण्यास मदत होते.

याच पद्धतीने वारा प्रतिरोधक तंत्र काम करते. फरक एवढाच असतो की, जिवंत प्रतिरोधक लावताना २-३ ओळीत झाडे लावली जातात व हे प्रतिरोधक वार्‍याच्या प्रवाहाला प्रतिबंध करीत नाहीत, तर त्याच्या प्रवाहाची दिशा बदलवतात. यामध्ये वार्‍याचा काही भाग फळबागेत जातो तर काही भाग उर्ध्वगामी (वरच्या दिशेला) वळविला जातो. यामुळे फळबागेच्या क्षेत्रातील पिकास जोरदार वार्‍याचा, थंड वार्‍याचा किंवा उष्ण वार्‍याचा एकदम सामना करावा लागत नाही. यामुळे झाडांना वर सांगितल्याप्रमाणे होणार्‍या विकृतींना अटकाव करता येतो.

वारा प्रतिरोधक म्हणून झाडांची लागवड करता येते. यामध्ये सर्वसाधारणपणे तीन ओळीत झाडांची लागवड करतात. पहिली ओळ कमी उंचीच्या झाडांची, दुसरी ओळ उंच जाणार्‍या झाडांची व आतील तिसरी ओळ झुडपांची असते.  यात वारा प्रतिरोधक झाडाची उंची १०-१५ पट अंतरावरील फळबागेचे अथवा इतर पिकांच्या क्षेत्राचे संरक्षण वार्‍याच्या दिशेला (वारा ज्या दिशेकडे चालला आहे त्या बाजूला) करते. वारा प्रतिबंधात्मक किंवा वारा प्रतिरोधक सजीव वृक्षांची लागवड करायची असल्यास ती झाडे ओळीने उत्तर-पूर्व आणि दक्षिण-पूर्व या दिशेने लावावीत. यासाठी कुठल्या जातीची वृक्ष निवडावीत, कशा प्रकारे लावावीत, वृक्ष निवडीच्या अटी काय आहेत, हे ५ एप्रिल २०१२ च्या अंकात सविस्तरपणे सांगितले आहे.

थंडीपासून फळबाग किंवा रोपवाटिका यांचा दरवर्षी वाढणार्‍या थंडीपासून बचाव करायचा असेल तर वारा प्रतिबंधक आणि वारा प्रतिरोधक याशिवाय पर्याय नाही, हेच वारंवार सिद्ध झाले आहे. याच्या जोडीला जर ‘आच्छादन’ या तंत्राचा अवलंब केला तर निश्‍चितच फळबाग, भाजीपाला व इतर पिकांना याचा फायदा होतो.

– प्रा.जायभाये

Exit mobile version