केळींवरील प्रक्रिया आणि मूल्यवर्धन

केळीची तोडणी केल्यापासून ती ग्राहकांकडे पोहोचेपर्यंत सुमारे ३०-४० टक्के फळांचे नुकसान होते. केळीची साठवण क्षमता कमी असल्याने शेतकर्‍यांना आलेले उत्पादन तात्काळ विकावे लागते. त्यातून त्यांना कधी कधी उत्पादनखर्चही निघत नाही. अशा परिस्थितीत केळीवर प्रक्रिया करून तिचे मूल्यवर्धित पदार्थांमध्ये रूपांतर केले, तर चांगले उत्पन्न मिळू शकेल. यादृष्टीने तिरूचिरापल्ली येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राने अनेक मूल्यवर्धित पदार्थांच्या पद्धतीचे प्रमाणिकरण केले आहे. त्यापैकी व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा काही पदार्थांची ही माहिती.

केळीचे चिप्स् ः केळीचे चिप्स् तयार करण्यासाठी नेंद्रन जातीची केळी सर्वोत्तम समजली जातात. मात्र, अन्य जातींवर आणि मिंडोली जातीही चिप्स् तयार करण्यासाठी चांगल्या आहेत. चिप्स् तयार करण्यासाठी ८० टक्के पिकलेल्या केळी निवडून त्यांची साले काढून पोटॅशिअम मेटायबाय सल्फेटच्या द्रावणात ५ मिनिटे ठेवा. त्यानंतर ती काढून ०.८ ते १.२ मिलिमीटर जाडीच्या गोल चकत्या कापून त्या उकळत्या तेलात तळून घ्या. तळताना तेलात ३-४ चमचे १० टक्के मिठाचे द्रावण वापरले जाते. पूर्ण तळल्यानंतर चिप्स् पिवळ्या रंगाचे आणि कुरकुरीत होतात. थंड झाल्यानंतर चिप्स् पॉलिथीन पिशव्यांमध्ये हवाबंद करावीत. हे चिप्स् ३०-२५ दिवस राहतात. जर चिप्स् नायट्रोजन वायुयुक्त लॅमिनेटेड पॉलिथीन पिशव्यांमध्ये हवाबंद केले, तर ते ३ महिन्यांपर्यंत टिकू शकतात.

केळीचे फिग ः पिकून वाळवलेल्या केळांना फिग म्हणतात. केळाचे फिग तयार करण्यासाठी कर्पूरवल्ली जात चांगली असते. पिकलेली केळी सोलून १ टक्के पोटॅशिअम मेटाबाय सल्फाईटमध्ये बुडवून ५० अंश से. तापमानावर ओव्हनमध्ये ३४ तास ठेवले जाते किंवा कडक उन्हात ७ दिवस वाळवले जाते. वाळल्यानंतर फिग चिकट, गोड आणि भुरक्या रंगाचे होते. ते ३-४ महिने राहू शकते. केळाचे फिग बरेच गोड असते. यात जीवनसत्वेे आणि खनिजे भरपूर असतात. अन्य सुकवलेल्या फळांप्रमाणे हे खाता येते. आईस्क्रीम, केक, बेे्रड किंवा खीर यात घालूनही हे खाता येते.

केळाची प्युरी ः पिकलेल्या केळांपासून प्युरी किंवा लगदा तयार केला जातो. परदेशात या प्युरीला भरपूर मागणी असते. चांगली पिकलेली केळी पल्पर यंत्रात (लगदा करणार्‍या यंत्रात) घालून प्युरी केली जाते. त्यानंतर यंत्राने तो लगदा एकसारखा आणि वायूरहित करून पाश्‍चराईज केला जातो. पाश्‍चराईज्ड लगदा जंतूविरहित पिशवीत भरून हवाबंद करतात. योगर्ट, मिल्क शेक, आईस्क्रीम, ब्रेड, बिस्किट, ज्यूस आणि पेये तयार करण्यासाठी ही प्युरी वापरतात. ती साधारणपणे वर्षभर टिकवून ठेवता येते. कोणत्याही जातीच्या केळीपासून प्युरी करता येते.

केळीचे पीठ ः केळीपासून आणखीही उपयुक्त खाद्यपदार्थ तयार केले जाऊ शकतात. जसे केळीचे पीठ. कच्ची केळी चांगली वाळवून ग्राईंडरमध्ये दळून काढली जाते. हे पीठ खूप उपयुक्त असते आणि बिस्किट, ब्रेड, केक, पोळ्या, आरोग्यवर्धक पेये, शिशुआहार, यात वापरले जाते. याचप्रकारे पिकलेली केळी वाळवूनही पावडर केली जाते आणि अनेक प्रकारे दैनंदिन आहारात वापरली जाऊ शकते.

केळीचे लोणचे ः केळीचे लोणचे घालण्यासाठी पिकलेली, कच्ची कशाही प्रकारची केळी वापरता येतात. कच्ची केळी सोलून किसणीवर किसून घ्या. तो कीस वाफेवर १-२ तास उकडून घ्या. एका कढईत २०० मि.लि. खाद्यतेल गरम करून १८ ग्रॅम मोहरी एका आणि ६०० ग्रॅम उकडलेला कीस टाकून परतून घ्या. पाणी संपल्यावर त्यात ४.८ ग्रॅम हळद, २.४ ग्रॅम हिंग, २३ ग्रॅम तिखट, ६० ग्रॅम मीठ आणि १२ ग्रॅम कापलेला लसूण घालून चांगले मिसळा. आचेवरून उतरवल्यानंतर त्यात १०० मि.लि. व्हिनेगर आणि १०० ग्रॅम गरम करून थंड केलेले तेल टाका. याप्रकारे तयार झालेले लोणचे स्वच्छ बाटलीत भरून हवाबंद करा. हे लोणचे वर्षभर टिकते.
केळीची बिस्किटे ः केळीची बिस्किटे तयार करण्यासाठी केळीचे पीठ वापरले जाते. बिस्किटे तयार करण्यासाठी ४०० ग्रॅम केळीचे पीठ आणि २६५ ग्रॅम मैदा एकत्र करून चाळून घ्या. त्यात ६ ग्रॅम बेकिंग पावडर आणि १५ ग्रॅम दूध पावडर मिसळा. एका वेगळ्या पातेल्यात २६५ ग्रॅम पिठीसाखर आणि ४०० ग्रॅम डालडा एकत्र करून मिसळा. त्यात पिठाचे मिश्रण टाकून चांगले मसळून घ्या. त्या उंड्याची पोळी लाटा आणि बिस्किट कटरच्या साहाय्याने मनपसंद आकारात कापून तूप लावलेल्या ट्रेमध्ये ठेवा आणि ओव्हनमध्ये १८०-२०० अंश सेल्सिअस तापमानावर २०-३० मिनिटांपर्यंत बेक करा.