गोवर्धन, नाशिक येथील ‘निर्मल ग्राम निर्माण केंद्र’ ही संस्था ‘सफाई’या विषयावर प्रयोग, प्रशिक्षण प्रचार, प्रसार, या माध्यमांतून काम करते. कचर्याचा आणि सांडपाण्याचा पुनर्वापर, खत निर्माण करणारी कमी खर्चातील संडासची मॉडेल्स, गांडूळ खत आणि सेंद्रिय खत बनविणारी विविध मॉडेल्स यांसारख्या शेती आणि पर्यावरणपूरक विषयांवर संस्थेचे संशोधन आणि प्रशिक्षण सुरू असते. संस्थेच्या जागेत थोड्या प्रमाणात सेंद्रिय पद्धतीने शेतीही केली जाते. यंदाच्या खरिपात संस्थेच्या संचालिका श्रीमती नलिनीताई नावरेकर यांनी वर्तमानपत्राच्या कागदाच्या मल्चिंगचा प्रयोग केला. त्यामुळे तण नियंत्रणाचे काम सोपे झाले. ‘आधुनिक किसान’च्या वाचकांसाठी त्यांच्याच शब्दांत हा प्रयोग देत आहोत. मजूर टंचाईच्या समस्येवर हा स्वस्त आणि सोपा प्रयोग मार्गदर्शक ठरू शकतो.
रब्बीत जसे शेताला पाणी देणे हे एक महत्त्वाचे काम असते, तसेच खरिपात तण काढणे हे महत्त्वाचे काम असते. या कामाच्या अभावी शेतीचे नुकसान होण्याची बरीच शक्यता असते. मजुरांच्या कमतरतेमुळे ही कामे पूर्ण न होणे, असेही बरेच ठिकाणी घडते. आमच्या जमिनीत तण फार मोठ्या प्रमाणात वाढते. पावसाळ्यात तर तणांची वाढ भरपूरच असते. तण खूप वाढून मुख्य पीक त्यात झाकून गेले आणि शेवटी हातचे गेले, असा अनुभव आम्हाला पुष्कळदा येतो.
तण हे खरे तर जमिनीसाठी वरदान आहे; पण ते मुख्य पिकापेक्षा जास्त वाढणे उपयोगाचे नाही. मुख्य पीक चांगले वाढेपर्यंत तण कापणे, निंदणे थोडक्यात तणाचे नियंत्रण आवश्यक ठरते; परंतु वेळेच्या, मनुष्यबळाच्या अभावी ते शक्य होत नाही आणि मुख्य पिकाचे नुकसान होते. तणाचे नियंत्रण करण्यासाठी जमिनीवर आच्छादन करण्याचाही चांगला फायदा होतो. तणनियंत्रणाच्या मुख्य उद्देशाने आम्ही यंदा आच्छादनाचा एक वेगळा प्रयोग केला. हा प्रयोग म्हणजे कागदाचे आच्छादन.
प्लॅस्टिकचे आच्छादन
आच्छादनाने तणांचे नियंत्रण होते. मग इतरही प्रकाराने आच्छादन करायला काय हरकत आहे? शेतकर्यांची गरज ओळखून कंपन्यांनी प्लॅस्टिकचे आच्छादन बाजारात आणले. त्याने तणांची वाढ रोखणे, जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे असे फायदे होतही असतील; परंतु मोठे नुकसान सोसून झालेले थोडेसे फायदे काय कामाचे? प्लॅस्टिक ही पर्यावरणाचे आणि मानवी आरोग्याचे नुकसान करणारी वस्तू! शेतामध्ये त्याच्या आच्छादनाचा तात्पुरता फायदा झाला तरी, ते जमिनीसाठी पुढे जाऊन घातकच ठरते. एक तर प्लॅस्टिकमधून सतत काही सूक्ष्मकण मोकळे होत जातात आणि दुसरे म्हणजे जसजसे प्लॅस्टिक जुने होत जाते तसतसे त्याचे तुकडे होऊ लागतात. बारीक आणखी बारीक बारीक असे तुकडे होतात. (इंग्रजीत – शास्त्रीय भाषेत त्याला ‘फोटो डिग्रेडेशन’ म्हणतात.) ते जमिनीत मिसळून जमिनीचे वेगवेगळ्या प्रकारे नुकसान होते. इतके करून हे प्लॅस्टिक आच्छादन खूप महागडे असते. स्वस्त पडावे म्हणून हलक्या दर्जाचे प्लॅस्टिक वापरले तर ते जमिनीचे जास्तच आणि लवकर नुकसान करणारे. त्याऐवजी मग कागदाचे आच्छादन योग्य ठरू शकेल.
जैविक आच्छादन
सर्व प्रकारच्या आच्छादनात हे आच्छादन योग्य आणि उत्तम म्हणता येईल. हे आच्छादन म्हणजे वाळलेल्या गवताचे, पालापाचोळ्याचे आच्छादन होय. यामुळे भरपूर फायदेच होतात. जमिनीत चांगला ओलावा, नैसर्गिक पद्धतीने टिकून राहतो आणि पाण्याची काही प्रमाणात बचत होते. कडक उन्हामुळे जमीन तापून झाड-पिकांना होणारा त्रासही अर्थातच कमी होतो. आणखी एक जास्त महत्त्वाचा फायदा होतो, तो जमिनीची सुपीकता वाढण्याचा! ज्याचे आच्छादन केले तो पालापाचोळा, काडीकचरा जमिनीवर जागीच कुजून, जमिनीतल्या उपयुक्त जिवाणूंना पोषक वातावरण मिळते, त्यांची संख्या वाढते. त्यामुळे जमीन सजीव बनते. सुपीक बनते, कसदार बनत जाते. या सर्वांबरोबरच तणनियंत्रणाचा आणखी एक फायदा होतो.
तणनियंत्रणासाठी असे जैविक आच्छादनाचे तंत्र जरूर अवलंबावे. मात्र त्यासाठी काही मर्यादा दिसतात. तणनियंत्रणाची विशेष गरज खरिपाच्या हंगामात असते. कारण पावसामुळे तणांची वाढ जास्त असते; परंतु खरिपाच्या/पावसाळ्याच्या सुरुवातीला आच्छादनासाठी आवश्यक तेवढा जैविक कचरा (पालापाचोळा, काडीकचरा इ.) उपलब्ध असतोच असे नाही. जरी पुरेशा प्रमाणात जैविक कचरा उपलब्ध असला आणि पिकांच्या रांगांमधून त्याचे आच्छादन केले तरी त्यातूनही काही प्रमाणात तण उगवतेच आणि मग असे तण काढणे आणखी अवघड होऊन बसते, असा अनुभव येतो. तेव्हा मनुष्यबळाअभावी तणनियंत्रणाच्या हेतूने यंदा आम्ही कागदाचे आच्छादन करण्याचा विचार केला. तसा प्रयोग केला,
तो पुढीलप्रमाणे-
कागदाचे आच्छादन
पहिले निंदण झाल्यावर लगेच पिकाच्या दोन रांगांमध्ये, दोन झाडांमध्ये तीन-चार कागदांची चळत ठेवत गेलो. पावसाची झिमझिम किंवा पावसाच्या सरी चालू असतील, तर हे कागद जमिनीला चिकटून जातात आणि उडून जात नाहीत. पाऊस चालू नसेल, निंदतांना निघालेली थोडीशी मूठ-दोन मूठ माती त्या कागदावर टाकून दिली; जेणेकरून कागद उडणार नाहीत.
तूर, हळद, चवळी इत्यादी पिकांमध्ये हा प्रयोग आम्ही केला. (मनुष्यबळ आणि वेळेच्या अभावामुळे त्यातही काही ठिकाणी कागदाचे आच्छादन पूर्ण झाले, काही ठिकाणी आच्छादन होऊ शकले नाही. त्यामुळे अनायसा तौलनिक अभ्यास झाला.) ज्या ठिकाणी हे आच्छादन झाले होते तिथली पिके चांगली वाढली आणि आच्छादन झाले नव्हते त्या ठिकाणच्या रोपांची वाढ बरीच कमी झालेली दिसून आली. अर्थात तणांनी त्याला वेढले होते. तण पिकाच्याही वर वाढलेले होते. त्यामुळे मुख्य पीक वाढले नव्हते.
कोणत्या कागदाचे आच्छादन?
आमच्या केंद्रावर कागदाचा जवळपास शंभर टक्के पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण होत असते. कागदाचा दर्जा आणि त्याची स्थिती/अवस्था यावरून त्याचा कशासाठी पुनर्वापर करायचा, हे ठरवले जाते. शेतातील आच्छादनासाठी आम्ही मुख्यतः वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर केला. जो भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो आणि इतर पुनर्वापरासाठी त्याचा दर्जा तितकासा चांगला नसतो. लहानशा क्षेत्रात आम्ही हा प्रयोग केला. साधारण २४४३ चौरस फुटात म्हणजे दोन ते सव्वादोन गुंठ्यांमध्ये एवढ्या क्षेत्रासाठी १८ किलो कागद वापरला. बाजारातील रद्दीच्या भावानुसार त्याची किंमत १८० ते २०० रुपयांच्या दरम्यान येईल. अर्थात एका गुंठ्याला ८०/९० रुपये.
कागदाचे आच्छादन केल्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी तण उगवत नाही आणि आपले पीक व्यवस्थित वर वाढते. काही दिवसांनी (हा काळ पाऊस, हवामान इ. गोष्टींमुळे बदलता असतो.) हा कागद हळूहळू कुजून जमिनीत मिसळून जातो. कागद सेंद्रिय पदार्थांपासून बनलेला असल्यामुळे तो जमिनीत मिसळल्याने काही नुकसान नाही. कागद कुजल्यानंतर पुन्हा तिथे तण वाढू लागते. जमिनीला तणांची आवश्यकता असतेच. शिवाय ते तण कापून नंतर आच्छादनाच्या कामी येते. तणदेखील जमिनीसाठी आवश्यक असते.
तण नियंत्रण हवे, तणाचा नाश नको
मुख्य पिकाच्या वाढीला काही प्रमाणात तण त्रायदायक ठरते, म्हणून ‘तण खाई धन’ असे म्हणण्याची पद्धत रुढ झाली आणि हळूहळू तणांचा नाश करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. मग कंपन्यांनी विषारी तणनाशके बाजारात आणली. मात्र, या तणनाशकांचे घातक परिणाम आहेत. मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर त्याचे गंभीर परिणाम होतात. ऍलर्जी, जन्मजात व्यंग, नपुसकत्व, यकृतावर परिणाम, कर्करोगाशी संबंध अशा अनुभवाच्या बातम्या जगभरातून येत आहेत. अर्जेंटिनामध्ये यासंबंधी संशोधन झाले आहे. बेडूक, खेकडे, कासव, कोंबड्या आणि इतर पक्ष्यांवरही त्याचे दुष्परिणाम झाले आहेत.
‘तण देई धन’ ही एक अत्यंत महत्त्वाची आणि सत्यावर आधरित अशी संकल्पना आहे. अभ्यास, निरीक्षण आणि प्रयोगाद्वारे तज्ज्ञांनी ती मांडली आहे. जमिनीत असलेली कमतरता दूर करण्यासाठी जमिनीला सकस बनवण्यासाठी जमिनीत तण उगवत असते. उदा. काही तणांची मुळे जमीन भुसभुशीत करतात, काही तण जमिनीचा नायट्रोजन वाढवण्याचे काम करतात. तणांमुळे जमिनीला कायम नैसर्गिक आच्छादन करण्याचे काम होत असते. भरपूर वाढलेले तण कापून जागच्या जागी कुजवू शकलो, तर ते जमिनीसाठी खूप उपयोग ठरते. एकूण काय, मुख्य पिकाच्या वाढीपुरते फक्त तणनियंत्रणाचे काम, वेगवेगळ्या प्रयोगांनी करायला हवे.
संपर्क ः
नलिनी नावरेकर
निर्मल ग्राम निर्माण केंद्र,
गोवर्धन, पो. गंगापूर, ता. जि.नाशिक, पिन कोड – ४२२२२२
(फोटो प्रतीकात्मक)