सेंद्रिय कर्बवाढीसाठी सेंद्रिय चक्र महत्त्वाचे

सेंद्रिय कर्ब हा जमिनीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून, त्यावरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. विशेषतः जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या, त्यांची क्रियाशीलता, अन्नद्रव्यांची उपलब्धता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, मातीच्या कणांची रचना इत्यादी अनेक भौतिक व रासायनिक गुणधर्म सेंद्रिय कर्बाशी निगडित आहेत. सेंद्रिय कर्बवाढीसाठी उपलब्ध परिस्थितीत व साधनसामग्रीनुसार कोणत्याही पद्धतीने शेतजमिनीस सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.

जमिनीचे आरोग्य राखून शेती उत्पादनक्षम आणि आर्थिकदृष्ट्या फायद्याची होण्यासाठी मातीसारख्या नैसर्गिक साधनसामग्रीचे संवर्धन व संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी पिकांची अन्नद्रव्यांची गरज जर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करून भागवली तर उत्पादनात वाढ तर होतेच, शिवाय जमिनीचे आरोग्य चिरकाल टिकून राहते. यासाठी सेंद्रिय खते (शेणखत, गांडूळखत, कम्पोस्ट खत), हिरवळीचे खत आणि जिवाणू खते यांचा वापर करावा आणि पिकाचे उत्पादन घ्यावे. सध्या आधुनिक कृषी व्यवस्थेत लागणार्‍या कृषी निविष्ठांचा तुटवडा भासत आहे. तसेच कृषी संलग्न व्यवसायातील कचरा, सेंद्रिय घटक पदार्थांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पदार्थांचे विघटन होणे पर्यावरणाच्या दृष्टीने गरजेचे आहे. शेतातील सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांचे विघटन, या पदार्थांचे पुनर्चक्रीकरण तसेच उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत बनवून व या सेंद्रिय चक्राचा वापर करून पिकांच्या अन्नद्रव्यांची गरज भागवण्यासाठी आपण रासायनिक खताला पर्याय देऊ शकतो.

सेंद्रिय चक्र म्हणजे काय?
शेतातील पिकांचे अवशेष, काडीकचरा, सेंद्रिय खते, शेती व शेती संलग्न कारखान्यातील टाकाऊ सेंद्रिय पदार्थ किंवा त्यांना कुजवून केलेले कम्पोस्ट खत तसेच जैविक खतांच्या शेतातील एकात्मिक वापरास ‘सेंद्रिय चक्र’ असे म्हणतात. अजूनही शेतातील बरेच टाकाऊ पदार्थ जसे पाचट, ताटे, भुसा, काडीकचरा व शेण जाळून टाकण्यात येते. साखर कारखान्यात तयार होणारे प्रेसमडसारखे उपयुक्त सेंद्रिय खत अजूनही लोकप्रिय झालेले नाही. सध्याच्या खतांच्या वाढीव किमतीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अशा परिस्थितीत शेतीत सेंद्रिय पदार्थांचा वापर करून रासायनिक खतांची बचत करता येऊ शकते, हे प्रयोगातून सिद्ध झाले आहे.

सेंद्रिय कर्ब वृद्धीसाठी विविध सेंद्रिय पदार्थांचे स्रोत
उष्ण हवामानामुळे तसेच जैविक क्रियेमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे विघटन आणि भस्मीकरण क्रिया सतत सुरू असते. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. हे प्रमाण कायम राखण्याचे महत्त्वाचे कार्य सेंद्रिय खतांद्वारे पार पाडले जाते; परंतु या खताचा वापर मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे, म्हणून शेणखत तसेच दुय्यम टाकाऊ पदार्थ गहू व भाताचे काड, गवत, झाडाची पाने, जनावरांचे मलमूत्र आणि विविध तणे यांपासून उत्तम दर्जाचे कम्पोस्ट तयार करून वापरणे आवश्यक आहे. तसेच सोनखत, गोबरगॅस स्लरी, लेंडी खत, कोंबडी खत, मासळीचे खत, हाडांचे खत, गांडूळ खत, तळ्यातील गाळ, शहरातील कचर्‍याचे कम्पोस्ट, प्रेसमड केक, स्पेंट वॉश, बायोकम्पोस्ट खत इत्यादी सर्व प्रकारची सेंद्रिय खते जमिनीत वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त सुबाभूळ, हादगा, शेवगा, करंज, गिरीपुष्प, धैंचा, ताग, बरू, गवार, चवळी यांचा हिरवळीचे खत म्हणून वापर करणे आवश्यक आहे. हिरवळीच्या खतांमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमिनीची सुपीकता कायम राखली जाते. ही पिके जमिनीच्या निरनिराळ्या खोलीमधून अन्नद्रव्ये शोषून घेऊन वरच्या थरात आणतात व पिकांचे अवशेष जमिनीत सेंद्रिय कर्बाचा पुरवठा करतात. याबरोबरच पीक फेरपालटीत मटकी, हुलगा, भुईमूग, चवळी, मूग, उडीद, सोयाबीन व लसूण घास यांची निवड केल्याने हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन जमिनीतील नत्राचे प्रमाण व उपलब्धता वाढते.

सेंद्रिय पदार्थांच्या वापराबाबत देशातील अनेक विद्यापीठांत घेण्यात आलेल्या प्रयोगातील महत्त्वाचे निष्कर्ष शेतकर्‍यांना उपयुक्त आहेत. उदा. हेक्टरी दहा टन सुबाभळीची पाने व फांद्या जमिनीत गाडल्यास रब्बी ज्वारी उत्पादनात २५ टक्के वाढ होते आणि हेक्टरी २५ किलो रासायनिक नत्राची बचत होते. उसाची पाचट जमिनीत गाडल्यास, खरीप हंगामातील मूग, उडीद पिके जमिनीत गाडल्यास जमिनीचे गुणधर्म सुधारून जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवांची संख्या वाढते. अशा प्रकारे विविध सेंद्रिय पदार्थांद्वारे जमिनीस कर्बाचा पुरवठा करावा.

जमिनीची सुपीकता व कर्ब नत्राचे प्रमाण
जमिनीची सुपीकता प्रामुख्याने पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात पुरवठा करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्ये नत्र, गंधक, स्फूरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा पुरवठा हा सेंद्रिय पदार्थांमार्फतच होत असतो. त्यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात असणे पिकांच्या वाढीसाठी गरजेचे आहे. म्हणूनच जमिनीच्या सुपीकतेमध्ये कर्ब नत्राचे प्रमाण ८ः१ आणि १५ः१ या मर्यादेपर्यंत असू शकते. सर्वसाधारणपणे हे प्रमाण १०ः१ ते १२ः१ असणे उत्तम असते. जमिनीतील कर्ब नत्र प्रमाण मुख्यत्वे तापमान, ओलावा व जमिनीचा प्रकार या घटकांवर अवलंबून असते. वातावरण उष्ण व दमट असेल तर सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेवर अनुकूल परिणाम होतो. याउलट अति शीत वातावरणात हीच क्रिया मंदावते व जिवाणूचे कार्य नीट होऊ शकत नाही. जमिनीचा ओलावा टिकून राहणे सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेला आवश्यक आहे. ओलावा भरपूर असल्यास सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. हलक्या व पाण्याचा त्वरित निचरा होणार्‍या जमिनीपेक्षा भारी व ओलावा धरून ठेवणार्‍या जमिनीत कर्ब नत्र प्रमाण उत्तम असते.

जमिनीत कर्ब नत्र प्रमाण योग्य राखण्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात. हलक्या जमिनीत सोटमूळ असणार्‍या पिकांपेक्षा आगंतूक मुळे असणार्‍या पिकांची पेरणी/लागवड केल्यास अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पिकांची काढणी झाल्यानंतर शेतात पिकांचे अवशेष भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. सेंद्रिय अवशेषांना कुजवून कम्पोस्ट खतनिर्मिती करून जर या खताचा वापर रासायनिक खतांसोबत केल्यास रासायनिक खतांच्या मात्रेमध्ये बचत होते. त्याशिवाय जमिनीतील कर्ब नत्र प्रमाण योग्य राखण्यास मदत होते. सतत एकाच प्रकारचे पीक घेतल्याने जमिनीतील विशिष्ट स्तरातील अन्नद्रव्याचे प्रमाण कमी होते.

वेगवेगळी पिके आलटून-पालटून घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता कायम राखली जाते. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी प्रचलित व सोपी पद्धत म्हणजे हिरवळीचे पीक. या पद्धतीत विविध प्रकारची पिके शेतात घेतली जातात व फुलोर्‍यात येण्यापूर्वी जमिनीत गाडली जातात. ती जमिनीत आपोआप कुजली जाऊन चांगले खत तयार होते. या पिकांच्या मुळावरील गाठीत रायझोबियम जिवाणूंचीही वाढ होते. त्यामुळे हवेतील नत्र जमिनीत स्थिर होते. पिकांच्या वर्गीकरणानुसार त्यांच्या बियाण्यास रायझोबियम व अझॅटोबॅक्टर जिवाणू संवर्धके पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करून लावावीत. जमिनीतील स्फूरदची उपलब्धता वाढविण्यासाठी स्फूरद विरघळवणारे जिवाणू वापरावेत. साखर कारखान्यातील टाकाऊ सेंद्रिय पदार्थात प्रेसमड हेदेखील उत्तम प्रतीच्या सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा करणारे व पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करणारे खत आहे.

फक्त रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी सेंद्रिय खते, हिरवळीची खते आणि जिवाणू खते यांचा एकात्मिक वापर केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वृद्धी होऊन जमिनीचे आरोग्य राखले जाईल आणि पिकांच्या उत्पादनात वाढ होईल. या सेंद्रिय पदार्थांमुळे किंवा खतांमुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म यांची सुधारणा होऊन जमिनीची सुपीकता व उत्पादकता यामध्ये वाढ होईल. अशा प्रकारे विविध सेंद्रिय पदार्थांद्वारे जमिनीस कर्बाचा पुरवठा करावा व नैसर्गिक सेंद्रिय चक्राचा अवलंब करावा. त्यामुळे जमिनीतील कर्बाची पातळी स्थिर ठेवून जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता यामध्ये वाढ करता येईल.

– डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. सुरेश वाईकर