कांदा पिकाचे उत्पादन मुख्यत्वे रोपांची पुनर्लागवड करून घेतले जाते. कांदा उत्पादन बियाणे पेरून घेणेही शक्य आहे. कर्नाटक, राजस्थान आणि महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील पठारी भागात पावसाळ्यात कांदा बियाणे पेरून उत्पादन घेतले जाते. कांदा बियाणे पेरून उत्पादन घेतल्यास कांदा काढणीसाठी हवामानानुसार पेरणीपासून चार महिन्यांत लागतो. उशिरा लांबलेल्या पावसामुळे जिरायत भागात कांदा रोपे टाकली गेली नाहीत, अशा ठिकाणी या पद्धतीने कांदा उत्पादन घेणे सहज शक्य होईल.
अशा पध्दतीने उत्पादन घेण्यासाठी खालील काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.
१.प्रतिकूल हवामान
२.रोपे टाकण्याचा काळ निघून जाणे.
३.मजुरांची टंचाई
४.शेतामध्ये तणांचे प्रमाण अत्यल्प असल्यास
प्रतिकूल हवामानात नैसर्गिक आपत्तीमुळे रोपांचे नुकसान होते. यामुळे कांदा पीक नियोजन कोलमडते. कधी-कधी कांदा उत्पादन क्षेत्रात पाण्याची उपलब्धता नसल्याने कांदा रोपे वेळेत तयार करणे शक्य होत नाही. परिणामी, कांदा उत्पादनाचा हंगाम निघून जाण्याची भीती असते. शेतमजुरांची उपलब्धता अलिकडे शेतीतील मोठी समस्या ठरली आहे. प्रत्यक्ष बियाणे पेरणी केल्याने पुनर्लागवडीसाठी लागणार्या मजुरांची बचत होऊ शकते.
प्राथमिक काळजी
*शेत बहुवार्षिक तणांपासून मुक्त असावे.
*बियाण्यांची उगवण क्षमता
चांगली असावी.
*पीक लागवड आराखडा योग्य असावा.
*प्राथमिक अवस्थेत पाणी नियोजन
योग्य असावे.
*कटवर्म/मुंग्यांचा बंदोबस्त करावा.
*बीजप्रक्रिया करावी.
कांदा उत्पादनावर हरळी, लव्हाळा यांसारख्या बहुवार्षिक तणांचा परिणाम होतो. यामुळे शक्यतो अशा शेतात प्रत्यक्ष बी पेरून कांदा उत्पादन घेणे टाळावे. बियाण्यांची उगवण क्षमता उत्तम असणे आवश्यक आहे. कारण बियाणे पेरतेवेळी प्रतिवर्ग मीटर अर्धा ते पाऊण ग्रॅम बियाणे टाकावे लागते.
यामुळे अपेक्षित रोपांची संख्या शेतात मिळते. रोपांची संख्या कमी-अधिक झाल्यास रोपांची विरळणी अथवा नांगे भरावे लागतात. नांगे भरलेली रोपे काढणीसाठी उशिरा तयार होतात. प्रत्यक्ष पेरणी करून कांदा उत्पादन घेण्यासाठी रूंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे बियाणे उगवण्यासाठी तसेच कांदा पोसण्यासाठी भुसभुशीत जमीन उपलब्ध राहते. सोबतच पावसाळ्यात सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरते. बियाणे उगवणीच्या काळात पाण्याचे नियोजन व्यवस्थित करणे गरजेचे असते. बियाणे शेतात पेरल्यानंतर मुंग्या बियाणे एका जागी गोळा करतात. तसेच बियाणे उगवल्यानंतर कटवर्म रोपे जमिनीलगत कापून टाकतात. त्यामुळे शेतात अपेक्षित रोपांची संख्या राखणे शक्य होत नाही. यासाठी बियाणे पेरणीपूर्वी हेक्टरी १० किलो फोरेट
१० जी. शेतात मिसळावे. बियाणे चांगल्या प्रकारे उगवण्यासाठी तसेच उगवल्यानंतर मरण्यापासून वाचवण्यासाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. यासाठी प्रतिकिलो बियाण्याला २ ग्रॅम थायरम किंवा कॉपर २ ग्रॅम ऑक्झिक्लोराईडने बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी १० कि. ट्रायकोडर्मा प्रतिहेक्टर शेणखतात मिसळून शेतात टाकावी.
बियाण्यांचे प्रमाण
*एकरी २ किलो किंवा हेक्टरी ५ किलो
*‘एनएचआरडीएफ ’चे कमी कालावधीत
तयार होणारे ‘ऍग्रीफाऊन्ड डार्क रोड’ किंवा ‘ऍग्रीफाऊन्ड लाईट रेड’ हे वाण वापरावे.
बियाणे पेरणी
बियाण्यांची पेरणी न्यूमॅटिक सीड ड्रील अथवा पाभरीने पेरून अथवा फेकून करता येते. अपेक्षित उत्पादनासाठी प्रतिवर्गमीटर रोपांची संख्या ६५ ते ८० असणे आवश्यक असते. साधारणपणे १ ग्रॅम वजनामध्ये कांद्याच्या २५० बिया असतात. त्यामुळे ७० टक्के उगवण क्षमता लक्षात घेता ०.५ ग्रॅम बियाणे प्रतिवर्गमीटर पुरेसे होते. कांदा बियाणे आकाराने लहान असल्यामुळे पेरणी अथवा फेकून टाकताना त्यामध्ये भाजलेली ज्वारी, बाजरी अथवा बियाण्यांच्या आकाराची चाळलेली वाळू मिसळावी.
पेरणीपश्चात काळजी
कांदा बीज पेरणीनंतर गरजेनुसार पाण्याचे नियोजन करावे. बियाणे दाट पडले असल्यास रोपांची विरळणी करणे गरजेचे असते. विरळणी करताना प्रतिवर्गमीटर क्षेत्रफळात रोपांची पुरेशी संख्या ठेवावी. यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळवणे सोपे होते. विरळणी करते वेळी दोन रोपांमधील चौफेर अंतर ८ ते १० सें. मी. राहील, याची काळजी घ्यावी. प्रतिवर्गमीटर ७० ते ८० रोपे ठेवावीत. रोपांची संख्या जास्त असल्यास दाटीमुळे कांदापात उंच वाढते, रोपे अशक्त बनतात, कंदाची वाढ खुंटते, जोडून रोपे असल्यास कंदाचा आकार चपटा होतो. रोपे ३० ते ४० दिवसांची झाल्यावर विरळणी करावी आणि लगेचच पाणी द्यावे.
खत नियोजन
२५ किलो स्फुरद :पेरणी करतेवेळी
२० किलो नत्र :२० ते २५ दिवसांनी (तणनाशक फवारणी अगोदर)
४० किलो नत्र :पेरणीनंतर ५० ते
२५ किलो स्फुरद, ५५ दिवसांनी
५० किलो पालाश,
२५ किलो गंधक, ४० किलो नत्र : पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी
तण नियंत्रण
तण नियंत्रणासाठी ५ मि. लि. ऑक्झिफ्ल्युरोफेन अधिक १० मि. लि. फ्ल्युझॉलफॉप इथाइल १५ लिटर पाण्यात मिसळून बी पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी जमिनीत पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. यानंतर आवश्यकतेनुसार निंदणी करावी.*
-राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठान