नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेत उपयुक्त असलेल्या निळ्या-हिरव्या शेवाळीच्या जातीमध्ये ऍनबिना, नोस्टोक, कॅलथ्रिक्स, प्लोटोनेमा, टॉलिपोथ्रिक्स, सायटोनेमा, ऍलोसिरा आणि बेस्टीलॉपसिसचा अंतर्भाव होतो. योग्य परिस्थितीत निळे-हिरवे शेवाळ प्रतिहेक्टरी ३० कि. ग्रॅ. नत्र स्थिर करू शकते.
पाणी साचून ठेवलेल्या तळ्यात, ओढ्यात निरनिराळ्या रंगांच्या शेवाळांची निर्मिती होते. यात निळ्या-हिरव्या शेवाळांचाही समावेश होतो. विशिष्ट जातीच्या निळ्या-हिरव्या शेवाळात हवेतील नत्र स्थिर करण्याची क्षमता असते. या शेवाळामध्ये ‘हेटरोसिस्ट’ पेशीच्या रचनेमुळे हवेतील नत्र स्थिर करता येते. अर्थातच हवेतील मुक्त वायुरूपातील अनुपलब्धतावस्थेत असलेल्या नत्राचे रूपांतर नत्रयुक्त संयुगात होऊन जमीन सुपीक बनविते. नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेत उपयुक्त असलेल्या निळ्या-हिरव्या शेवाळीच्या जातीमध्ये ऍनबिना, नोस्टोक, कॅलथ्रिक्स, प्लोटोनेमा, टॉलिपोथ्रिक्स, सायटोनेमा, ऍलोसिरा आणि बेस्टीलॉपसिसचा अंतर्भाव होतो. योग्य परिस्थितीत निळे-हिरवे शेवाळ प्रतिहेक्टरी ३० कि. ग्रॅ. नत्र स्थिर करू शकते.
निळे-हिरवे शेवाळ तयार करण्यासाठी अधिक काळ सूर्यप्रकाश व उष्णता मिळण्याच्या ठिकाणी जागा निश्चित करावी. २ मीटर बाय १ मीटर बाय २० सें. मी. आकाराचे खड्डे तयार करून त्यामध्ये प्लॅस्टिक पेपर पसरवावा. मातीमध्ये २५ ग्रॅ. कार्बोप्युुरीन मिसळावे. खड्ड्यात ६ ते १० सें. मी. पातळीपर्यंत पाणी साठवून ठेवावे. त्यामध्ये २०० ग्रॅ. सोडियम मॉलेब्डेट, ४० ग्रॅ. पोटॅशियम क्लोराईड यांचे मिश्रण टाकून आतील माती तळाशी बसल्यावर शांत पाण्यात निळ्या-हिरव्या शेवाळाचे २५० ग्रॅ. ‘मातृकल्चर’ म्हणजे मूलभूत बियाणे शिंपडावे. साधारणपणे १० ते १५ दिवसांत शेवाळाची भरपूर वाढ होते आणि पाण्यावर चांगला थर बसतो. शेवाळाची उत्तम वाढ झाल्यावर पाणी आटू द्यावे व पूर्ण सुकल्यावर शेवाळ मातीपासून वेगळे होऊन पापड्या तयार होतात. या पापड्या पिशव्यांमध्ये भरून ठेवाव्यात. अशाप्रकारे २ चौरस मीटरच्या एका खड्ड्यातून सुमारे दीड ते दोन कि. ग्रॅ. निळे-हिरवे जिवाणू खत मिळते. निळे-हिरवे शेवाळाच्या खतांचा वापर केल्यास प्रतिहेक्टरी २५ ते ३० कि. ग्रॅ. नत्र मिळते आणि रासायनिक खतांची तेवढी बचत होते. जमिनीत सेंद्रिय द्रव्यांची वाढ होऊन जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. शेवाळाची वाढ होत असताना तयार झालेली वृद्धी संप्रेरक निळे-हिरवे शेवाळ जिवाणू संवर्धक अधिक उपयुक्त ठरल्याचे आढळून आले. भात पिकांची रोप लावणी झाल्यावर ८ ते १० दिवसांनी शेतातील पाण्यावर निळे-हिरवे शेवाळ संवर्धन हेक्टरी १० ते १५ कि. प्रमाणे समप्रमाणात शिंपडावे, तसेच ३-४ वर्षे शेवाळ संवर्धन भात शेतात टाकून त्यांची संख्या योग्य पातळीवर आणून ती टिकवून ठेवावी.
ऍझोला
ही एक नेचे वर्गातील पाणवनस्पती आहे. या प्रकारची वनस्पती अतिशय थोड्या अन्नावर उत्तमप्रकारे व झपाट्याने वाढते. या वनस्पतीमध्ये पेशीत नत्र स्थिर करणारी ऍनबिनी अझोला नावाची नीलहरित शेवाळ वर्गातील वनस्पती वाढत असते. ही वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करून त्यातील शेवाळासही पुरवते, तर शेवाळ हवेतील नत्रवायू स्थिर करून ऍझोल वनस्पतीस पुरवतेे. अशाप्रकारे सहजिवी पद्धतीने जगणार्या वनस्पतींमध्ये ४-५ टक्के नत्र असते. ऍझोलाचा नत्र पुरविणारी वनस्पती म्हणून आणि हिरवळीचे खत म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो, तसेच त्याचा भात शेतीस चांगला उपयोग करता येतो.
ऍझोस्पिरीलम जिवाणू खते
हे अणूजीव सहयोगी वृत्तीचे असून त्यांचे वास्तव्य साधारणतः जमिनीच्या सामूवर अवलंबून असते. ऍझोस्पिरीलमच्या योग्य वाढीसाठी आणि नत्र स्थिरीकरणाशी संबंधित असलेल्या नायट्रोजिनेज या विकराच्या क्रियाशीलतेसाठी जमिनीचा सामू ५.६ ते ७.२ इतका असला पाहिजे. या जिवाणू खतास बियाण्यांबरोबर चोळून पेरणी केली असता, या जिवाणूंची वाढ पिकाच्या सानिध्यात त्यांच्या मुळाभोवती, अवतीभवती प्रामुख्याने होऊन रोपटाच्या मुळ्यांमध्येदेखील हे जिवाणू प्रवेश करतात. या सहयोगी पद्धतीने वाढणार्या जिवाणूंद्वारे नत्राचे स्थिरीकरण होऊन ते पिकांना ताबडतोब लागू होते. हे जिवाणू मुळ्यांमध्ये नत्राच्या गाठी तयार करीत नाहीत. प्रामुख्याने हे तृणधान्य वर्गातील मका, गहू, ज्वारी, भात, ऊस आणि चार्याचे गवत इत्यादी पिकांसाठी उपयुक्त ठरले असून ऍझोटोबॅक्टर जिवाणू खतांप्रमाणे करावा. याच्या वापरामुळे प्रतिहेक्टरी २० कि. गॅ्र. नत्र स्थिर होतो. ऍझोस्पिरीलम हे जिवाणू कृत्रिम माध्यमात वाढवून जिवाणूंच्या प्रामुख्याने २ जाती आढळतात. या म्हणजे ऍझोस्पिरीलम लिपोफेरम व ऍझोस्पिरिलम ब्रोसिलन्स.
ऍझोटोेबॅक्टर जिवाणू खते
ऍझोटोबॅक्टर जिवाणू असहजिवी (स्वतंत्र) पद्धतीने वातावरणातील मुक्त स्थिरीकरण करणारे असून ते तृणधान्य, गळीत धान्य, ऊस, कापूस, ज्यूट, बागायती पिके आणि पालेभाज्यावर्गीय पिकांना संयुक्त नत्ररूपाने पुरवठा करतात. जमिनीत सेंद्रिय पदार्थांच्या विघटनातून मिळणार्या
ऊर्जेवर हे जिवाणू जगतात व स्वतंत्ररीत्या हवेतील वायुरूपातील नत्राचे अमोनियममध्ये रूपांतर करण्याची त्यांची क्षमता असते. हे जिवाणू खत बनवण्यासाठी ऍझोटोबॅक्टर जिवाणूंची द्रव माध्यमामध्ये वाढ करण्यात येते आणि लिग्नाईट पावडरमध्ये मिसळून जिवाणू संवर्धन म्हणजेच खत तयार होते. ऍझोटोबॅक्टरच्या प्रामुख्याने पाच जातींची ओळख पटली आहे. त्यात ऍझोटोबॅक्टर, व्हेनलेंडी, ऍझोटोबॅक्टर अंगलीस आणि ऍझोटोबॅक्टर क्रेकोकम जातींचे जिवाणू अधिक प्रमाणात आढळतात. जिवाणू संवर्धनासाठी उपलब्ध जातीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो.
ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धनाचा (खत) उपयोग खालील विविध वर्गीय पिकांसाठी होतो.
१. तृणधान्य ः ज्वारी, गहू, बाजरी, मका, भात
२. गळीत धान्य ः तीळ, सूर्यफूल, मोहरी, करडई
३. नगदी पिके ः कापूस, ज्यूट
४. बागायती पिके ः द्राक्षे, केळी, टरबूज, खरबूज
५. पालेभाज्या/फळभाज्या ः कांदा, लसूण, बटाटे, टोमॅटो, मिरची, भेंडी, कोबी, मुळा, वांगी इत्यादी
ऍझोटोबॅक्टर जिवाणू खत तीन पद्धतीने वापरता येतात
१) बियाण्यांवर किंवा बेण्यांवर अंतरक्षीकरण २) रोपांच्या मुळावर अंतरक्षीकरण आणि ३) शेतातील मातीत मिसळून. ऍझोटोबॅक्टर जिवाणू खत बियाण्यांंस चोळले असता पिकांची उगवणक्षमता वाढते. पिकांच्या मुळांची वाढ होऊन पिके जोमदार वाढतात. ऍझोटोबॅक्टर जिवाणू विविध संप्रेरक (जिबे्रलिड आम्ल, इंडोल आम्ल) जीवनसत्व, बायोटिन इत्यादी पदार्थांची निर्मिती करतात. त्यांचा पिकांच्या वाढीस परिणामकारक उपयोग होतो. ऍझोटोबॅक्टर जिवाणू बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करतात. त्यायोगे पिकांचे बुरशीजन्य रोगापासून काही प्रमाणात संरक्षण होते. शेतमालाची प्रत सुधारते. रासायनिक नत्राच्या वापरात बचत होते. या ऍझोटोबॅक्टर जिवाणू खतामुळे २० कि. गॅ्र. नत्र प्रतिहेक्टरी स्थिर होतो.
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील नत्र स्थिरीकरण प्रकल्प आणि कृषी रसायनशास्त्र आणि मृद्विज्ञान विभागात सातत्याने सुरू असलेल्या संशोधनावरून आकलन होते. ही ऍझोटोबॅक्टर जिवाणू खतांच्या वापरामुळे निरनिराळ्या पिकांच्या उत्पादनात १४ ते ३३ टक्क्यांपर्यंत वाढ होते. तृणधान्य, कापूस, टरबूज, भेंडी व इतर पिकांसाठी संवर्धन (२५० ग्रॅ.) घेऊन ३०० मि. लि. पाण्यात द्रावण तयार करावे. हे द्रावण हलक्या हाताने चोळून लावावे व नंतर पेरणी करावी. उसाच्या एक हेक्टरी क्षेत्रावर लागण करण्यासाठी ५० लिटर पाण्यामध्ये २० जिवाणू संवर्धन पाकीट मिसळून द्रावण करावे. कांड्यांची लागवण करतेवेळी तयार केलेले द्रावण बाटलीमध्ये घ्यावे व उसाचे बेणे बादलीतील द्रावणात बुडवून लगेच लागवण करावी. बटाट्याच्या बेण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ऍझोटोबॅक्टरची ५ पाकिटे ५० लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे व द्रावणात बेणे बुडवून लागवण करावी. मिरची, तंबाखू, कांदा, फळे व पालेभाज्या पिकांसाठी १० पॅकेट्स १५ ते ३० लिटर पाण्यात मिसळून चांगले द्रावण तयार करावे आणि त्यात रोपांची मुळे ५ मिनिटे बुडवून ताबडतोब लावावीत.