खरीप विशेष : बाजरी लागवडीचे नवीन तंत्र

बाजरी हे पीक हलक्या ते मध्यम जमिनीवर, जेथे पावसाचे प्रमाण २०० ते ७०० मि. मि. आहे, अशा प्रदेशांत घेतात. कमी पाण्यावर येणारे हे पीक असल्याने खत आणि तणांचे योग्य व्यवस्थापन करून चांगले उत्पादन घेता येणे शक्य आहे.

पूर्वमशागत
लोखंडी नांगराने जमिनीची १५ सें. मी. पर्यंत खोल नांगरट करावी. यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकांची धसकटे, काडीकचरा, हरळी, कुंदा वेचून शेत स्वच्छ करावे. शेवटच्या कुळवणीअगोदर हेक्टरी पाच टन शेणखत किंवा कम्पोस्ट शेतात पसरवून टाकावे.

पेरणीची वेळ
पेरणी जून महिन्यात चांगला पाऊस पडल्यावर करावी. पेरणी १५ जून ते १५ जुलै या दरम्यान केल्यास उत्पादन अधिक मिळते. पेरणीस उशीर झाल्यास पिकावर गोसावी, अरगट रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. धूळ पेरणी करावयाची असल्यास जून महिन्याच्या दुसर्‍या ते तिसर्‍या आठवड्यात करावी. धूळ पेरणी एकूण क्षेत्राच्या ३० टक्के क्षेत्रावर करावी. पेरणी करताना उताराच्या विरुद्ध सर्‍या पाडून पेरणी करावी. यामुळे पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवला जातो.

या व्यतिरिक्त राज्यात शिफारस करण्यात आलेले वाण
आयसीटीपी-८२०३, आयसीएमव्ही-२२१, जीके-१०५१, पीबी-७२७, बी-२३०१, जीएचबी-५५८, जीएचबी-५२६, पीबी-१०६, नंदी-३५, एमएलबीएच-५०४, प्रोऍग्रो-१, नंदी-३०, आयसीएमएच-३५६, संगम

बीज प्रक्रिया
बाजरीचे बी २० टक्के मिठाच्या द्रावणात (१० लिटर पाण्यात २ किलो मीठ) टाकावे. पाण्यावर तरंगणार्‍या बुरशी, पेशी व हलके बी काढून त्यांचा नाश करावा. राहिलेले बी स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत वाळवावे. ऍप्रॉन-३५ डब्ल्यूएस या रसायनाची बीज प्रक्रिया (६ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे) करावी. नंतर ऍझोस्पीरीलीअम व पीएसबी १० ते १५ ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. यासाठी बियाणे मोकळ्या पोत्यावर पसरावे. यावर थोडेसे पाणी शिंपडून ऍझोचे एक पाकीट फोडून बियाण्यांवर पसरून चोळावे व नंतर सावलीत वाळवून पेरणी करावी.

पेरणी
संकरित बाजरीच्या पेरणीसाठी पेरणी हेक्टरी ३ किलो बियाणे वापरावे. पेरणी करताना ४५ सें. मी. च्या पाभरीने २ ते ३ सें. मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी. पेरणीनंतर पहिली विरळणी १० दिवसांनी व त्यानंतर १० दिवसांनी दुसरी विरळणी करावी. दोन रोपांतील अंतर १० सें. मी. ठेवावे. यामुळे हेक्टरी रोपांची संख्या १ लाख ८० हजार ते २ लाख राहील. एक ते दीड महिन्याच्या काळात एक खुरपणी व दोन कोळपण्या देऊन पीक तणविरहित ठेवावे.

खते
हलक्या जमिनीत ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे. मध्यम जमिनीत प्रति हेक्टरी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश यांची शिफारस करण्यात आली आहे. यापैकी ३० किलो नत्र, ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. राहिलेले ३० किलो नत्र पेरणीनंतर एक महिन्यांनी द्यावे.

रोग व्यवस्थापन

केवडा
केवडा या रोगास गोसावी असे म्हणतात. हा रोग स्केलरोस्पोरा ग्रॅमीनीकोला या नावाच्या बुरशीपासून होतो. या रोगाची लक्षणे पिकाच्या वाढीच्या सर्वच अवस्थेत दिसून येतात. बियाण्यांद्वारे जमिनीत असलेल्या बुरशीपासून या रोगाची लागण होते. रोप अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला पाने पिवळी पडतात आणि नंतर ही पाने पांढरी होतात. कालांतराने तपकिरी, विटकरी रंगाची दिसू लागतात व करपू लागतात. रोगट पानांची सहसा वाढ होत नाही. अशा प्रकारच्या रोपांवरील कणासांमध्ये दाणे न भरता कणसांमध्ये पर्णमय केसाळ वाढ होते. या रोगाचे लैंगिक जिवाणू जमिनीत तीन वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. पीक वाढीच्या काळात रोगाचा प्रसार हा बुरशीच्या अलैंगिक बिजातून होत असतो.

रोग नियंत्रण
गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी ऍप्रॉन ३५ एसडी या बुरशीनाशकाची (६ ग्रॅम प्रतिकिलो) पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. रिडोमील एमझेड ७२ या पाण्यात मिसळणार्‍या बुरशीनाशकाचे पीक २० दिवसांचे झाल्यावर (०.१२५) टक्के फवारा करावा. शिफारस केलेल्या खताच्या मात्रा देणे आवश्यक आहे. यामुळेही पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. युरियाची दुसरी मात्रा वेळेतच द्यावी. पिकाची द्विदल धान्याच्या पिकाबरोबरच फेरपालट केल्यास जमिनीतील बुरशीचे प्रमाण कमी करता येईल.

अरगट
अरगट हा रोग क्लेव्हीसेप्स
प्यूजीफॉर्मोस नावाच्या बुरशीपासून होतो. बुरशीची वाढ कोवळ्या बिजांड कोषात होते. यामुळे दाणे भरण्याऐवजी त्यातून सुरुवातीला मधासारखा चिकट द्रव पाझरतो. या द्रवात बुरशीचे अलैंगिक बिजाणू असतात. याकडे माशा आकर्षित होतात व त्यातून या रोगाचा प्रसार होतो. प्रतिकूल हवामान आले म्हणजे हा द्रव जेथून बाहेर पडतो, तेथेच बुरशीचे रूपांतर रोगपेशीत होते. या रोगपेशी धान्याबरोबर दळल्या गेल्यास आणि माणसाच्या खाण्यात आल्यास विषबाधा होऊन जुलाब होतात व प्रसंगी मृत्यू ओढावण्याचा संभव असतो.

रोगनियंत्रण
अरगट रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यांस २० टक्के मिठाच्या द्रावणात बुडवावे. तरंगणारे हलके बी आणि रोगपेशी चाळणीने बाहेर काढून त्याचा जाळून नाश करावा. तळाशी राहिलेले बी बाहेर काढून स्वच्छ पाण्याने तीन वेळा धुवून सावलीत वाळवून नंतर पेरणीसाठी वापरावे. अरगट रोगाची कणसे दिसताच अशी ताटे उपटून त्याचा नाश करावा. पिकाची फेरपालट करावी किंवा रोगग्रस्त शेतात किमान दोन ते तीन वर्षे बाजारी पीक घेण्याचे टाळावे व खोल नांगरट करावी. कणीस निसवत असताना बाविस्टीन ०.१ टक्के बुरशीनाशकाची रोगनियंत्रणासाठी फवारणी करावी. रोगाची तीव्रता जास्त असेल तर १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

कीड व्यवस्थापन
हिंगे अथवा भुंगे

ही कीड काळ्या रंगाची असून, पंखावर पिवळट तपकिरी पट्टे असतात. ते फुलातील परागकण व पाकळ्या खाऊन टाकतात. यामुळे कणसात दाणे कमी भरतात. यावर उपाययोजनेसाठी भुंगे जमा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नाश करावा. प्रकाश सापळ्यांचा उपयोग करावा.