चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड फायदेशीर

मका पिकाचा चारा अत्यंत सकस, रुचकर असतो. मका पिकाचा हिरवा चारा दुभत्या जनावरांना खाऊ घातल्याने दुधाचे प्रमाण वाढते. मध्यम ते भारी परंतु चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत ऑक्‍टोबर – नोव्हेंबरमध्ये या पिकाची लागवड पूर्ण करावी.

मका हिरवा चारा व मुरघास म्हणून वापरता येतो. त्याच्यापासून अधिकाधिक चारा मिळण्यासाठी खालीलप्रमाणे तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.

लागवड तंत्रज्ञान :

• जमीन :
मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन आवश्‍यक असते. काळी कसदार, गाळाची व नदीकाठची जमीन अत्यंत उपयुक्त असते.

• मशागत :
पेरणीपूर्वी एक नांगरट, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. लागवडीसाठी सपाट वाफे अथवा सऱ्या सोडाव्यात. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते.

• पेरणी :
खरिपात जून ते ऑगस्ट या कालावधीत, रब्बी हंगामात ऑक्‍टोबर – नोव्हेंबरमध्ये आणि उन्हाळी हंगामात फेब्रुवारी – मार्चमध्ये मक्‍याची पेरणी करावी. पाभरीने ३० सेंमी अंतरावर पेरणी करावी.

• बियाणे प्रमाण व बीजप्रक्रिया :

पेरणीसाठी प्रतिएकरी ३० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बीजप्रक्रियेसाठी ॲझोटोबॅक्‍टर जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे.

• सुधारित जाती :
आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझीट, विजय, गंगा, सफेद-२, गंगा सफेद-५, डेक्कन डबल हायब्रीड

• आंतरमशागत :
पेरणीपासून महिनाभर पीक तणविरहित ठेवावे. त्यासाठी आवश्‍यकतेनुसार एक-दोन वेळा खुरपणी करून पीक स्वच्छ ठेवावे. एक महिन्यानंतर कोळपणी करावी. त्यामुळे तण नियंत्रणही होते. तसेच मुळांना हवा मिळून पिकाची वाढही होते.

• खत व्यवस्थापन :
पूर्वमशागत करताना प्रतिएकरी साधारणपणे १.२ टन (४-५ बैलगाड्या) चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. प्रतिएकरी नत्र ४० किलो, स्फुरद २० किलो व पालाश २० किलो अशी खतमात्रा आवश्यक आहे. यापैकी पेरणीवेळी नत्र २० किलो, स्फुरद २० किलो व पालाश २० किलो द्यावे. नत्राची उर्वरित मात्रा २० किलो पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावी.

• पाणी व्यवस्थापन :
रब्बी हंगामात १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

• पीक संरक्षण :
– खोड किडा : फवारणी प्रतिलिटर पाणी प्रोफेनोफॉस (५० ईसी) १.४ मि.लि.
दुसरी फवारणी १०-१५ दिवसांनी करावी.
– मावा : फवारणी प्रतिलिटर पाणी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अॅझाडिरॅक्‍टीन (१०,००० पीपीएम) २ मि.लि.

• कापणी :
हिरव्या व सकस चाऱ्यासाठी मक्‍याचे पीक ५० टक्के फुलोऱ्यात आल्यावर म्हणजे पेरणीनंतर अंदाजे ६५ ते ७० दिवसांनी कापणी करावी. अनेक शेतकरी मका पूर्ण पक्व झाल्यावर जनावरांना खाऊ घालतात. त्याऐवजी ५० टक्के पीक फुलोऱ्यात असताना जनावरांना चारा द्यावा. या वेळी चारा अधिक सकस असतो. साधारणतः योग्य व्यवस्थापनात मक्‍याचे एकरी २२० ते २८० क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

• फुलोऱ्यातील मका पिकातील अन्नघटक :
प्रथिने : ५ टक्के
स्निग्ध पदार्थ : ४.२ टक्के
खनिजे : ६ टक्के
पिष्टमय पदार्थ : ५२.८ टक्के

-प्रा. प्रवीण सरवळे, कृषी महाविद्यालय, बारामती