जाणून घ्या…लॉकडाऊन चा दुग्धव्यवसायावरील परिणाम

राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असली तरी तिचा तितकासा परिणाम जाणवत नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यावर खबरदारीचा उपाय म्हटले तर नुसते हात साबणाने धुऊन किंवा तोंडावर मास्क लावून चालणार नाही तर आपल्या आरोग्याची देखील काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दररोजच्या आहारामध्ये शाकाहारींसाठी दूध दुग्धजन्य पदार्थ तसेच फळे भाजीपाला आणि मांसाहारीसाठी अंडी, चिकन, मटण यांचा देखील समावेश करणे गरजेचे आहे. दूध हे रोजच्या आहारात लागणारी महत्वाची गरज असल्याने ते लहान बाळापासून ते वृद्ध माणसांपर्यंत सर्वांना चालते. शरीराच्या वाढीसाठी लागणारे सर्व घटक त्याच्यामध्ये उपलब्ध असतात त्यामुळे दुधाला पूर्णान्न म्हणून देखील संबोधले जाते. बहुतेक करून सगळ्याच घरांमध्ये दिवसाची सुरवात हि चहा पासून होते.

 आपल्याकडे एखादी गोष्ट नसली तरी आपण समजून घेऊ शकतो परंतु दुध हे मानवी आहारातील खूप महत्त्वाचा आणि पोषक घटक आहे. कोरोना संसर्गजन्य रोगाची लागण होण्याच्या भीती मुळे दूध दुग्धजन्य पदार्थ खरेदी करण्यापासून लोक वंचित राहतात तसेच शहरामध्ये विक्रेत्यास पूर्णपणे बंदी असल्यामुळे दूध आपल्या घरा पर्यंत पोहोचत नाही आणि त्याचा फटका लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध माणसे यांना फार मोठ्या प्रमाणावर बसतो.त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन संसर्गजन्य आजाराला सामोरे जावे लागते. संसर्गजन्य आजार हे खूप भयानक आणि जीवित हानी घडवून आणतात. म्हणून योग्य वेळीच खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे असते.

काय होतो? लॉकडाऊन चा दुग्धव्यवसायावर परिणाम

  • लॉकडाऊन मुळे छोटेछोटे दूध प्रक्रिया उद्योग अडचणीत येतात कारण त्यांचा उत्पादित झालेला माल ग्राहकांनी न घेतल्यामुळे ते पशुपालकांचे दूध विकत घेत नाहीत किंव्हा कमी दराने खरेदी करतात त्यात दुधाचा उत्पादन खर्च निघत नाही.

  • पशुपालकांकडे प्रश्न पडतो की दररोज उत्पादित होणाऱ्या दुधाला जर मार्केट नसेल तर दररोज तोटा सहन कसा करायचा आणि विकत चारा घेण्यासाठी पैसा कुठून उपलब्ध करायचा.

  • डेअरी व्यवसायामध्ये ग्राहकांनी दूध विकत नाही घेतले तर डेअरी देखील दूध संकलन करत नाहीत पण शेतकऱ्याकडे असा कोणताही पर्याय नसतो की जो गाईचे दूध देणे देखील आपण काही काळासाठी थांबवू शकतो आणि गरजेनुसार ते काढू शकतो कारण ही नैसर्गिक देन असल्याने त्याला आहे त्या भावात किंवा कमी दराने दूध विकणे भाग पडते आणि त्यामुळे तोटा सहन करावा लागतॊ.

  • लॉकडाऊनच्या काळात हमखास दूध दर कमी होतो पण दूध उत्पादित करण्यासाठी लागणारा खर्च कमी करून चालत नाही आणि त्यामुळेच पशुपालक तोट्यात जातो.

  • लॉकडाऊनच्या काळात दुधाला वाढीव भाव न देता आहे तो जरी दर दिला तरी पशुपालक तग धरून राहू शकतो कारण दुग्धव्यवस्यामध्ये एकदा पशुपालक तोट्यात गेल्यानंतर बाहेर निघणे अवघड आहे कारण दुधाचे भाव शेतकऱ्यांच्या हातात नाहीत.

  • दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी साथीच्या रोगाची साथ येत असते आणि त्याची लागण जनावरांना तसेच माणसांना होत असते आणि त्याचा दोन्ही बाजूंनी तोटा हा पशुपालन व्यवसायाला बसत असतो.

  • दुग्ध व्यवसाय उभा करण्यासाठी खूप मोठे भांडवल लागते आणि बंद करतानाही खूप मोठा तोटा सहन करावा लागतो त्यामुळे पशुपालकांसाठी लॉक डाऊन हा पर्याय नसून गंबीर प्रश्न आहे.

  • पुन्हापुन्हा लॉकडाऊन, डेअरी संप, दूध बंद आंदोलन त्यातच दर महिन्याला दूध दर कमी जास्त होणे, पशुखाद्याचे दर सारखे वाढतच राहणे. या कारणामुळे पशुपालकाने हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला तर आगामी काळात दुधाचा तुटवडा भासू शकतो.

  • गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनची परिस्थिती पाहता अजूनही काही व्यवसाय पूर्वपदावर आलेले नाहीत तो लगेच कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय जरी योग्य असला तरी त्यात दूध विक्री वरती बंदी आणून चालणार नाही. कारण लॉकडाऊनमुळे पशुपालकांची मानसिकता तोट्याची झाली आहे त्यासाठी कडक निर्बंध लावणे व योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना करणे हाच एकमेव मार्ग आहे.

 

-नितीन रा.पिसाळ

प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)

धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी, पुणे.