Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

जनावरे, कोंबड्यांच्या आहारात वापरा ॲझोला

खाद्यामध्ये ॲझोलाच्या वापरामुळे दूध उत्पादन, फॅट, वजन, अंड्याचे उत्पादन वाढते. आंबोणावरील खर्च १५ ते २० टक्के कमी होतो. जनावरे, कोंबड्यांचे आरोग्य सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ॲझोला उत्पादनासाठी योग्य जागेची निवड करावी. जागा सावलीत असावी. स्वच्छ व सपाट असावी. उपद्रवी प्राण्यांच्या प्रादुर्भाव नसावा. ॲझोलाच्या गरजेनुसार जागेचे आकारमान निश्‍चित करावे.

लागणारे साहित्य : टिकाव, फावडे, घमेले, पहार, ताडपत्री, एस.एस. पी. पावडर किंवा सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार, मिनरल पावडर, शेण, माती, ॲझोला

❄ तयार करण्याची पद्धत :
१. जमिनीत खड्डा करून
२. जमिनीवर विटांचा थर करून

❄ उत्पादनातील महत्त्वाच्या बाबी :
🌿 ॲझोलाचे पुनुरुत्पादन लैंगिक व अलैंगिक अशा दोन्ही पद्धतीने होते.
🌿 आपल्याकडे अझोलानिर्मितीसाठी प्रामुख्याने शेडनेट हाऊस पद्धतीचा अवलंब केला जातो. भूमिहीन पशुपालकही ॲझोला उत्पादन करू शकतो.
🌿 झाडाच्या सावलीत १० ते १२ सें.मी. पर्यंत पाणीसाठा करू शकणारे वाफे तयार करावेत.
🌿 निवडलेल्या जागा दगड, माती काढून एकसारखी सपाट करावी.
🌿 २.३ मीटर x३ मीटर आणि एक फूट खोल अशा आकाराचा वाफा तयार करावा.
🌿 वाफ्यामध्ये प्लॅस्टिक कागद किंवा ताडपत्री व्यवस्थित अंथरून त्यावर वजन ठेवावे. कमी प्रतीचा प्लॅस्टिक कागद असल्यास वाफ्यामध्ये खाली गोणपाट अंथरावे.
🌿 पंधरा किलो पोयटा माती वाफ्यामध्ये समांतर पसरावी.
🌿 सात किलो शेण दहा लिटर पाण्यात मिसळून शेणकाला तयार करावा. मातीवर त्याचा समांतर थर द्यावा. वाफा आठ सें.मी. उंचीपर्यंत पाण्याने भरून घ्यावा.
🌿 यानंतर ५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट पाच लिटर पाण्यात विरघळवून हे मिश्रण पाण्याने भरलेल्या वाफ्यामध्ये मिसळावे.
🌿 जनावरांच्या खाद्यात वापरण्यात येणारी क्षार पावडर ५० ग्रॅम प्रति पाच लिटर पाण्यात मिसळून हे मिश्रण वाफ्यातील पाण्यात मिसळावे.
🌿 संपूर्ण वाफा १० सें. मी. पर्यंत पाण्याने भरल्यानंतर त्यामध्ये एक किलो ॲझोला मिसळावा. त्यानंतर स्वच्छ पाणी शिंपडावे.
🌿 साधारणपणे १५ दिवसांनंतर संपूर्ण वाफा ॲझोलाने भरतो. त्यानंतर दररोज ३०० ग्रॅम ॲझोला वाफ्यामधून काढून जनावरांच्या खाण्यात वापरावा.
🌿 त्यानंतर प्रत्येक आठवड्यात ५० ग्रॅम क्षार पावडर आणि ५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रत्येक पाच लिटर पाण्यात मिसळून वाफ्यात मिसळावे.
🌿 एक महिन्यानंतर त्या वाफ्यामध्ये १० किलो बारीक माती आणि पाच किलो शेण मिसळावे. 🌿 प्रत्येक चौरस मीटरला २०० ते ३०० ग्रॅम ॲझोला वाफ्यातून रोज काढता येते.

❄ ॲझोलातील घटक : (प्रति १०० ग्रॅममध्ये)
कॅरोटिन : ४४७५ एमसीजी, बी -१२ : १.१९ मिलीग्रॅम, प्रोटिन : २५ ते ३० टक्के, बी – कॅरोटिन : १३८० एमसीजी, फॉस्फरस : ०.८६ मिलीग्रॅम, कॅल्शियम : ६७ मिलीग्रॅम, लोह : ७.३ मिलीग्रॅम, सोडियम : ०.२६ मिलीग्रॅम, मॅंगनीज : १०२ पीपीएम, मॅग्नेशियम : ४.३ मिलीग्रॅम, सल्फर : २.७ मिलीग्रॅम, तांबे : ०.९ पीपीएम, कोबाल्ट : ०.६१ मिलीग्रॅम, जस्त : ४.१ मिलीग्रॅम
कोरड्या वजनानुसार ॲझोलात २५ ते ३० टक्के प्रथिने, १० ते १२ टक्के खनिजे आणि ७ ते १० टक्के अमिनो आम्ले असतात. प्रथिनांचे प्रमाण जास्त तर लिग्निनचे प्रमाण कमी असल्यामुळे ॲझोला सहज पचते. ❄ ॲझोलाचे इतर पिकाच्या तुलनेत महत्व (उत्पन्न व पौष्टिकता)

पिकाचे नाव —- वार्षीक उत्पन्न (प्रती हेक्टर) —- शुष्क घटक (मे. टन) —- प्रोटीन (मे.टन)
यशवंत नेपीयर ————-२५० ————————–५० ————————– ४.२
लसूण घास —————– ८० ————————— १६ ————————– ३.२
चवळी ———————–३५ ————————– ०७ ————————— १.४
सुबाभूळ ———————८० ————————– १६ ————————— ३.२
स्वीट सुदान —————–४० ————————- ३.२ ————————– ०.६
ॲझोला ———————-३० ————————– ५६ ————————— २०

🐮🐔🐐 अॅझोलाचे फायदे :
✅ अल्प खर्चिक व किफायतशीर तंत्रज्ञान
✅ धान्य आणि चारा उत्पादनाच्या तुलनेत श्रम कमी; उत्पादन जास्त
✅ मुबलक प्रमाणात अन्नद्रव्यांची उपलब्धता
✅ खाद्य म्हणून गाय, म्हैस, शेळी, डुकरे, कोंबड्यांना उपयुक्त
✅ अॅझोलाची वाढ समांतर पद्धतीने होते. त्यामुळे सोयीनुसार शेती, परस, गोठ्याशेजारी व गच्चीवरही उत्पादन शक्य
✅ दूध उत्पादन, फॅट, वजन, अंडी उत्पादनात वाढ
✅ आंबवणावरील खर्च १५ ते २० टक्के कमी होऊन खादयावरील खर्चात बचत
✅ जनावरे, कोंबडीचे आरोग्य सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते
✅ अॅझोला वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्र व खनिजयुक्त असते. पिकांसाठी, झाडांसाठी त्याचा पीकसंवर्धक म्हणून वापर शक्य
✅ वाफ्यातून काढलेल्या एक किलो मातीत ०.५ किलो रासायनिक खतांइतके अन्नघटक

– डॉ. आर. एस. जाधव , विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र), कृषी विज्ञान केंद्र, बारामती
(सौजन्य : ADT BLOG, कृषी विज्ञान केंद्र, बारामती )
Exit mobile version