कुक्कुटपालन हा व्यवसाय अंडयांसाठी व मांसासाठी करतात. अंडयासाठी ठेवण्यात येणा-या कोंबडयांपासून दररोज उत्पन्न मिळते. अंडयांसाठी व्हाईट लेग हॉर्न नावाची जात प्रसिध्द आहे. या जातीच्या कोंबडया केंद्रीय कुक्कट पैदास केंद्र, मुंबई, पुणे किंवा व्यंकटेश्वर हॅचरी, पुणे येथून मिळू शकतात. मांसासाठी कोंबडया दोन महिने ठेवल्या जातात. या संकरित कोंबडया असुन त्यांना ब्रॉयलर्स असे म्हणतात. या कोंबडया व्यंकटेश्वर हॅचरी, पुणे, पूना पर्ल्स, पुणे इत्यादी ठिकाणाहून उपलब्ध होऊ शकतात.
कोंबडयांची घरे :
हवामानातील बदल, ऊन, वारा, पाऊस, थंडी तसेच इतर प्राण्यांपासून संरक्षणासाठी कोंबडयांना घराची आवश्यकता असते. प्रत्येक अंडी देणा-या कोंबडीस अडीच ते तीन चौरस फुट जागा लागते. घराची लांबी, पक्ष्यांची लांबी व पक्ष्यांच्या संख्येवर अवलंबून असावी. मात्र रुंदी 25 फुटापेक्षा जास्त असू नये. घरांची लांबी पूर्व-पश्चिम असावी. ही घरे जमिनीपासून 2 ते 2.5 फुट उंचीवर असावीत. जोत्यापासून 2.5 – 3 फुट भिंती घ्याव्यात व त्यावर छतापर्यत बारीक जाळया बसवाव्यात. छताची मधील उंची 12 – 15 फुट असून ते दोन्ही बाजूस उतरते असावे.
पक्षी पालनाच्या पध्दती :
सर्वत्र प्रचलित असलेल्या कोंबडया पाळण्याच्या दोन पध्दती आहेत. त्या म्हणजे गादी पध्दत (डीप लिटर) व पिंजरा पध्दत.
गादी पध्दत :
या पध्दतीत कोंबडया जमिनीवर लिटर पसरुन त्यावर वाढविल्या जातात. लिटरसाठी (गादीसाठी) लाकडाचा भुसा, शेंगाचे फोलपट, भाताचे तूस उपयोगात आणतात. यामध्ये कोंबडयाची विष्ठा यावर पडते व ती शोषली जाते. गादी माध्यमे दररोज हलवली जातात व त्यात चुना मिसळावा. त्यामुळे ही कोरडी राहण्यास मदत होते व शेवटी याचा उपयोग खत म्हणून होतो.
पिंजरा पध्दत :
या पध्दतीत एक कोंबडी एका पिंज-यात किंवा दोन – तीन कोंबडया एका पिंज-यात ठेवल्या जातात. सर्वांसाठी लांब एकच एक पन्हाळयासारखे खाद्याचे व पाण्याचे भांडे जोडलेले असत. यात प्रति पक्षास 60 – 70 चौरस इंच किंवा एक चौरस फुट जागा दिली जाते. विष्ठा परस्पर पिंज-याच्या खाली केलेल्या खड्डयात जमा होते. प्रत्येक पिंज-याची पुढील उंची 18 इंच व मागील उंची 15 इंच असते. त्यामुळे मागील बाजूस उतार मिळून व अंडी गोळा होण्यास मदत होते.
पिल्लांची जोपासना :
एक दिवसाची पिल्ले ठेवण्यापुर्वी घरे स्वच्छ धुवून निर्जंतुक करावीत, जमिनीवर लिटर पसरुन ठेवावे. ब्रूडरची (कृत्रिम दायी) ची व्यवस्था करवी व त्यातील तापमान नियंत्रित करावे. पिल्लांना सुरुवातीस चार आठवडयांपर्यंत कृत्रिम उष्णतेची गरज असते. यासाठी सुरुवातीचे तापमान 15 अंश फॅ. असावे व त्यानंतर प्रत्येक आठवडयास ते 5 अंश ने कमी करावे.
बांबूची टोपली किंवा लाकडाचे खोके ब्रुडरसाठी उपयोगात आणता येतात. दोनशे पन्नास पिल्लांसाठी 4 फुट व्यासाचे 1.5 ते 2 फुट उंचीचे ब्रुडर पुरेसे आहे. प्रत्येक पिल्लास 7 – 10 चौरस इंच जागा लागते. पिल्ले आल्यावर त्यांना पाण्यातून ग्लूकोज द्यावे. सुरुवातीचे तीन दिवस खाद्य जाड कागदावरच द्यावे.