Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

असा करा गांडूळ खताचा वापर

गांडूळखत म्हणजे गांडूळाच्या नैसर्गिक कार्य करण्याच्या सवयीचा उपयोग करुन सेंद्रिय पदार्थापासून तयार झालेले खत. यात नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, संजिवके आणि सूक्ष्मद्रव्ये इत्यादीचे प्रमाण शेणखतापेक्षा अधिक असते. यात गांडूळाचे अंडीपुंज असून उपयुक्त जिवाणू आणि प्रतिजैविके असतात.

गांडूळ खताचे उत्पादन चार पद्धतीने उदा. कुंडी पद्धत, टाकी पद्धत, खड्डा पद्धत आणि बिछाना पद्धतीने करतात. शेतकऱ्यांच्या शेतवार मोठ्या प्रमाणावर गांडूळखत तयार करण्यास खड्डा पद्धत अधिक सोयीची आहे.

गांडूळ खत तयार करण्याची पद्धत :

गांडूळ खत मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर केला जातो.
1. खड्डा पद्धत (3 मी. लांब 2 मी. रुंद 0.6 मी. खोल)
2. सिमेंट हौद पद्धत (3 मी. लांब 2 मी. रुंद 0.6 मी. खोल)
3. बिछाना पद्धत (3 मी. लांब 2 मी. रुंद 0.6 मी. खोल)

गांडूळ खत तयार करण्याच्या वरील पद्धतीपैकी आपल्या सोयीनुसार एक पद्धत निवडावी. निवड केलेल्या पद्धतीसाठी लागणारी खड्डयाची रचना ही गुरांच्या गोठ्याजवळ उंच जागेवर योग्य निचरा असणाऱ्या ठिकाणी मांडवाच्या किंवा झोपडीच्या सावलीत किंवा पत्र्याच्या शेडमध्ये करुन घ्यावी, ज्यामूळे उन्हापासून व पावसापासून खताचे व गांडूळाचे संरक्षण होईल.

खड्डा भरतांना सर्वच पद्धतीमध्ये थरांची रचना सर्वसाधारणपणे एकाच प्रकारे केली जाते. सुरुवातीला तळाशी 15 सें.मी. जाडीचा सेंद्रिय पदार्थांचा (उदा. गव्हाचे काड, ऊसाचे पाचट, सोयाबीन, तूर, सूर्यफुलाचा भुसा, पालापाचोळा, चाऱ्याचा उरलेला भाग इत्यादी) थर द्यावा. त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत व चाळलेली माती 3:1 या प्रमाणात मिसळून त्याचा 15 सें.मी. चा थर द्यावा. त्यावर ताज्या शेणाचा किंवा पाण्यामध्ये शेण कालवून त्याची रबडी करुन 10 संे.मी. चा तिसरा थर द्यावा. शेवटी बिछान्यावर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन घालावे. हा बिछाना पाण्याने ओला करावा.

वातावरणानुसार व आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावे व खतामध्ये 50 टक्के ओलावा टिकून राहील, याची काळजी घ्यावी. रचलेल्या थरातील उष्णता कमी झाल्यावर एक ते दोन आठवड्यांनी वरील सेंद्रिय पदार्थांचा थर बाजूला सारुन कमीत कमी एक हजार प्रौढ गांडुळे सोडावीत. गांडुळांची संख्या कमी असेल तर खत तयार होण्यास अधिक काळ लागतो.

खताचा रंग काळसर तपकिरी

पण सर्वसाधारणपणे 3 मी. लांब 2 मी. रुंद 0.6 मी. खोल या आकारातील जागेत गांडुळांची संख्या 10 हजार झाली की, दोन महिन्यात उत्तम असे एक टन गांडूळ खत तयार होते. गांडूळ खताचा रंग काळसर तपकिरी असतो. खत तयार झाल्यावर पाणी बंद करावे. वरचा थर कोरडा झाला की, पूर्ण गांडूळ खत गांडूळासकट बाहेर काढावे व त्याचा बाहेर सूर्य प्रकाशात ताडपत्रीवर किंवा गोणपाटावर शंकु या आकाराचा ढीग करावा.

उन्हामुळे सर्व गांडुळे 3-4 तासानंतर तळाशी जाऊन बसतात. नंतर वरचा खताचा भाग हलक्या हाताने अलग करुन घ्यावा, ज्यामध्ये कुजलेले गांडुळखत तसेच गांडूळाची अंडी असतील, खाली राहिलेली गांडूळ परत खत तयार करण्यासाठी बिछान्यात सोडावीत.
सर्वसाधारणपणे गांडूळ खताततील अन्नद्रव्यांचे प्रमाण (शेकडा) नत्र स्फुरद पालाश 0.5-1.6 0.3-2.3 0.15-0.50.

गांडूळखत बागायती पिकांसाठी हेक्टरी 5 टन या मात्रेने वापरावे. खत वापरतेवेळी बांगडी पद्धतीने झाडाच्या बंुध्याभोवती प्रथम खत टाकून त्यावर शेणाचा 5 सें.मी. जाडीचा थर द्यावा. यावर 10 सें.मी. जाडीचे शेतातील टाकाऊ पदार्थ जसे ऊसाचे पाचट, वाळलेले गवत, भुसा यांचे आच्छादन करावे व लगेच पाणी देऊन ओले करुन घ्यावे. पुढील कालावधीत बागेस पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

प्रत्येक 3 ते 4 महिन्यांनी आच्छादनात भर घालून सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता नेहमीप्रमाणे कायम ठेवावी. दोन महिन्यानंतर गांडूळाची जमिनीवर झालेली क्रिया आणि त्याची वाढलेली संख्या दिसून येते. गांडूळ शेतीत पिकांच्या मुळाभोवती चांगला ओलावा राखणे गरजेचे आहे. ओलावा नसेल तर गांडुळ खताच्या कार्यक्षमतेत घट येते.

गांडूळ खत उत्पादन, वापर आणि उपयुक्ततेबद्दल महाराष्ट्रात गेल्या पाच दहा वर्षापासून संशोधन चालले आहे. त्यापासून महत्त्वाचे निष्कर्ष हाती आले आहेत.

1. कोणत्याही टाकाऊ सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करता येते.
2. गांडूळ शेती बागायती क्षेत्रात प्रचलित रासायनिक शेतीस पर्याय होऊ शकते.
3. गांडूळ शेतीद्वारे खारवट आणि चोपण जमिनीची सुधारणा करता येते.
या संशोधनाचा वापर करुन महाराष्ट्रात बरेचसे शेतकरी ऊस, चिकू, डाळींब, पेरु, द्राक्ष यासारख्या पिकांचे उत्पादन घेऊ लागले आहेत.

(गांडुळखत तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण (ट्रेनिंग) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे दिले जाते.)

Exit mobile version