Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

खरीप विशेष : कापूस पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन

कापूस पिकासाठी अनुकूल हवामान आणि पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. त्यासोबतच वेळोवेळी सूक्ष्म अन्नद्रव्ये देणे, हे उत्पादन वाढीचे गमक आहे.

हवामानाचा परिणाम
कापसाच्या बियाण्यांची उगवण होण्यासाठी १८ ते २० अंश से. तर वाढीच्या अवस्थेमध्ये २० ते २५ अंश से. तापमानाची आवश्यकता असते. फुलोरा अवस्था ते बोंड धरण्याच्या काळात २७ ते ३४ अंश से. तापमान असल्यास उत्तम मानले जाते. उष्ण दिवस व थंड रात्र या प्रकारचे हवामान बोंडे चांगली भरण्यास व उमलण्यास उपयुक्त असते. लागवडीच्या काळात जास्त तापमानाचा विपरित परिणाम होऊन पिकाची उगवण कमी होते आणि नवीन अंकुर वाळतात. जमिनीलगत खोडावर स्कॉचिंग होऊन संपूर्ण झाड लाल होते. यामुळे पिकांची वाढ थांबते. पावसाचा मोठा खंड किंवा जास्त काळापर्यंत जमिनीत ओल नसल्याची परिस्थिती पात्याच्या अवस्थेपासून बोंड पोसण्याच्या कालावधीत असल्यास फुले, पात्यांची व बोंडांची नैसर्गिक गळ होते. मॉन्सूनचा पाऊस लवकर निघून गेल्यास मध्यम ते उशिरा परिपक्वतेचा कालावधी असणार्‍या वाणाचे किंवा संकरित वाणाच्या उत्पादनावर विपरित परिणाम होतो. याउलट शेतात जास्त काळ पाणी साचून राहिल्याने शरीर प्रक्रियेचे संतुलन बिघडून पाते व लहान बोंडांची गळ होते आणि प्रकाशसंश्‍लेषणाची क्रियाही मंदावते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जास्त पाऊस झाल्यास बोंडे चांगल्या प्रकारे उमलत नाहीत आणि ती सडतात. पावसाचा मोठा खंड पडल्यानंतर पाऊस आल्यास किंवा पिकाला पाणी दिल्यानंतर काही वाणांवर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होतो, म्हणून पिकाला पाण्याचा मोठा ताण पडू न देता किंवा पिकामध्ये जास्त पाणी साचू न देता जमीन कायम वाफसा परिस्थितीत ठेवल्यास उत्पादनात वाढ होते. यासाठी कापूस पिकाचे योग्य व्यवस्थापन केले तर उत्पन्नात नक्कीच वाढ होते.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
कापसाच्या शाश्‍वत उत्पादनासाठी २० ते २५ टक्के अन्नद्रव्ये हे शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खत, कम्पोस्ट खत आदी सेंद्रिय खतांमधून देणे आवश्यक आहे. यांपैकी कुठल्याही सेंद्रिय खतासोबत (हेक्टरी ५ टन) रासायनिक खतांचा वापर केल्यास पिकाद्वारे अन्नद्रव्येही मोठ्या प्रमाणात शोषली जातात. जिवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया केल्याने रासायनिक खतांमध्ये बचत होऊन त्यांनी उत्सर्जित केलेल्या जीवनद्रव्याने पिकाच्या वाढीवर अनुकूल परिणाम होतो. हेक्टरी उत्पादन समाधानकारक मिळण्यासाठी रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणानुसार योग्य पद्धतीने योग्य वेळी व योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. कापसासाठी शिफारस केलेल्या रासायनिक खताच्या मात्रा पुढीलप्रमाणे वापराव्यात.

खते देण्याची वेळ, प्रमाण (हेक्टरी)
सुधारित देशी व अमेरिकन वाण
पेरणीच्या वेळी खत देताना २५ ः २५ ः २५ याप्रमाणे खत मात्रा देण्यात यावी. यात ४० किलो डीएपी + ३५ किलो युरिया + ४० किलो एमओपी किंवा १६५ किलो
१५ ः १५ ः १५ किंवा १२५ किलो २० ः २० ः ०० + ४० किलो एमओपी किंवा ५० किलो युरिया + १५० कि. एसएसपी + ४० किलो एमओपी किंवा १०० किलो १० ः २६ ः २६ + ४० किलो युरिया.

पेरणीनंतर ३० दिवसांनी २५ ः २५ ः ०० याप्रमाणे ५० किलो युरिया द्यावा.
एकूण (किलो/हेक्टर) ५० ः २५ ः २५

जिरायत संकरित वाणाकरिता
पेरणीच्या वेळी १६ ः ४० ः ४०
याप्रमाणे ९० किलो डीएपी + ७० कि. एमओपी किंवा १०० कि. १५ः१५ः१५ + १५० कि. एसएसपी + ४० किलो एमओपी किंवा ३५ कि. युरिया + २५० कि. एसएसपी + ७० किलो एमओपी किंवा १५० किलो १० ः २६ ः २६

पेरणीनंतर ३० दिवसांनी ३२ ः ०० ः ०० याप्रमाणे ७५ किलो युरिया आणि पेरणीनंतर ६० दिवसांनी ३२ ः ०० ः ०० याप्रमाणे ७५ किलो युरिया द्यावा.

बी. टी. संकरित वाणाकरिता
पेरणीच्या वेळी २० ः ५० ः ५०
याप्रमाणे १०० किलो डीएपी + १०० किलो एमओपी किंवा १०० किलो २०ः२०ः०० + २०० किलो एसएसपी + १०० किलो एमओपी किंवा ५० किलो युरिया + ३०० किलो एसएसपी + १०० किलो एमओपी किंवा २५० किलो १० ः २६ ः २६

पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० ः ०० ः ०० याप्रमाणे १०० किलो युरिया, पेरणीनंतर ६० दिवसांनी ४० ः ०० ः ०० याप्रमाणे १०० किलो युरिया द्यावा.
एकूण १०० ः ५० ः ५०

बी. टी. संकरित वाणाकरिता (बागायती)
पेरणीच्या वेळी २५ ः ६५ ः ६५
याप्रमाणे १५० किलो डीएपी + १२५ किलो एमओपी किंवा १२५ किलो २०ः२०ः०० + २५० किलो एसएसपी + १२५ किलो एमओपी किंवा ५० किलो युरिया + ४०० किलो एसएसपी + १२५ किलो एमओपी किंवा २५० किलो १० ः २६ ः २६

पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० ः ०० ः ०० याप्रमाणे १२५ किलो युरिया आणि पेरणीनंतर ६० दिवसांनी ५० ः ०० ः ०० याप्रमाणे १२५ किलो युरिया द्यावा.
एकूण १२५ ः ६५ ः ६५

सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा
बर्‍याच वेळा योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन करूनसुद्धा नैसर्गिक कारणांमुळे पाने, फुले व बोंडांची गळ होते. याचे कारण बघता पाण्याचा मोठा खंड किंवा सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून राहणे, म्हणजेच वाफसा नसणे हे मुख्य कारण आहे. अशी गळ थांबवण्यासाठी पीक फुलावर असताना नॅपथॅलिक ऍसेटिक ऍसिड (प्लॅनोफिक्स), २ टक्के युरियाची (२०० ग्रॅम डीएपी + २ मि. लि. प्लॅनोफिक्स + १० लि. पाणी) साध्या पंपाने फवारणी केल्याने उत्पादनात वाढ होते. मुख्य अन्नद्रव्य नत्र, स्फुरद व पालाश व्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास लोह, मॅग्नेशिअम, जस्त हे जमिनीतून किंवा फवारणीतून द्यावे. त्याचबरोबर बोंडे धरण्याच्या तसेच बोंडे वाढीच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची किंवा विद्राव्य खताची मात्रा फवारणीच्या माध्यमातून दिल्यास लाल्याचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

पाणी व्यवस्थापन
कोरडवाहू कापूस घेताना पावसाचे पाणी जास्तीत जास्त जमिनीत साठवून त्याचा अधिक कार्यक्षमतेने वापर करणे महत्त्वाचे असते. याकरिता मूलस्थानी जल व माती संवर्धन करण्यासाठी शेतामध्ये बांध घालणे, जमिनीची खोल मशागत करणे, शेततळे, पाणी संवर्धन व साठवणूक समतल मशागत, उताराला आडवी पेरणी करणे, आंतरपीक, अरुंद वाफा व सरी पद्धत आदी बाबींचा अवलंब करणे आवश्यक आहे. अतिशय कष्टाने जमिनीत साठवलेल्या पाण्याचा पिकाकरता काटकसरीने उपयोग केल्यास चांगले उत्पादन घेता येते. यासाठी पिकाची योग्य वेळी पेरणी, योग्य उत्पादन तंत्राचा वापर, अच्छादनाचा वापर (उदा. उसाचे पाचट (हेक्टरी ५ टन) किंवा बाष्प निष्कारणाचा वापर करावा) संरक्षित पाण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. निश्‍चित पावसाच्या प्रदेशात पिकाच्या पाण्याची गरज ही ७५० ते ८०० सें. मी. असते; परंतु पावसाच्या लहरीमुळे ही गरज पूर्ण होऊ शकत नाही. तेव्हा पिकाला २० ते ३० सें. मी. पाणी सिंचनाद्वारे देणे आवश्यक असते.

अशा परिस्थितीमध्ये पिकाच्या पुढील नाजूक अवस्थांमध्ये ७ ते ८ सें. मी. चे संरक्षित पाणी देऊन अपेक्षित उत्पादन साधता येते. पिकाला केवळ एक पाणी देणे शक्य असल्यास फुलोर्‍याच्या उशिरा अवस्थेत द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास फुलोरा अवस्था व बोंडे भरण्याच्या अवस्थेत द्यावे. तीन पाणी देणे शक्य असल्यास फांद्या फुटण्याची अवस्था, फुलोरा अवस्था आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेत द्यावे. पाण्याची कमतरता असल्यास एक सरी आड पाणी उताराला आडवे द्यावे व पाणी कुठेही साचणार नाही, याची काळजी घ्यावी. शेततळे, नाला या स्रोतांद्वारे पाणी द्यावयाचे असल्यास ठिबक, सूक्ष्म तुषार या आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर केल्यास मर्यादित पाण्यामध्ये अधिक उत्पादन घेता येते. अमेरिकन संकरित बी. टी. वाणांची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता कमी असते. यामुळे कोरडवाहू परिस्थितीतील पाण्याचा ताण पडल्यास फूल, पाते, लहान बोंडे यांची मोठ्या प्रमाणात गळ होऊन उत्पादनात घट येते. यासाठी अशा वाणांना संरक्षित पाणी देणे आवश्यक आहे. शेवटच्या कोळपणीच्या वेळी पिकांना मातीची भर लावणे, हलक्या कोळपण्या करणे अशा उपाययोजना करून जमीन कायम वाफसा परिस्थितीत ठेवल्यास उत्पादनात वाढ होते आणि लाल्याचा प्रादुर्भाव कमी होतो.*

– डॉ. संजीव पाटील

Exit mobile version