तूर काढणी व डाळ निर्मितीची सुधारित पद्धत

तुरीची काढणीची योग्य वेळ ओळखणे हा तूर उत्पादनातील महत्त्वाचा घटक आहे. उशिरा किंवा लवकर केलेली काढणी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट आणते. तुरीमधील डाळनिर्मिती आता सुधारित पद्धतींमुळे अधिक सोपी आणि किफायतशीर झाली आहे. यामधील कोरडी पद्धत जास्त फायद्याची असल्याचे आढळते.

तूर हे कडधान्याच्या पिकांपैकी एक महत्त्वाचे पीक असून, भारतात मुख्यत्वेकरून सर्व राज्यांत खरीप हंगामात हे पीक घेतले जाते. तुरीच्या डाळीत २०-२२ टक्के प्रथिने असून, भारतीयांच्या रोजच्या आहारात याचा वापर केला जातो.

तुरीच्या पारंपरिक वाणांमध्ये फुले आणि शेंगा येण्याचा कालावधी जवळपास दीड ते दोन महिन्यांचा असल्याने सुरुवातीस आलेल्या शेंगा वाळून जातात तर झाडावर काही फुले व हिरव्या शेंगा राहतात. यामुळे तुरीचे पीक नेमके कधी काढावे, याबाबतीत शेतकरी संभ्रमात पडतो. सर्वच शेंगा वाळल्यानंतर काढणी केल्यास सुरुवातीच्या वाळलेल्या शेंगा तडकून दाणे गळतात. काही वाणांचा फुले आणि शेंगा लागण्याचा कालावधी कमी असल्याने जवळपास सर्वच शेंगा एकाच वेळी पक्व होतात. तथापि, लवकर तयार होणारे वाण काढणीच्या वेळेस पावसात सापडले तर दाण्यांना मोड येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुरीच्या बाबतीत काढणीची वेळ ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. साधारणपणे ८० ते ९० टक्के शेंगा वाळलेल्या असताना काढणी करावी. उशिरा येणार्‍या वाणांमध्ये मात्र साधारणत: ७० ते ७५ टक्के शेंगा वाळलेल्या असतानाच काढणी करावी.

धसकटाची उंची कमी ठेवल्यास नांगरट करताना ट्रॅक्टरचे चाक पंक्चर होण्याची तसेच बैल नांगराने नांगरट करताना बैलांच्या पायांना इजा होण्याची शक्यता असते. म्हणून पीक तयार झाल्यानंतर धारदार विळ्याने जमिनीच्या वर ७.५ ते २५ सें. मी. उंचीवर कापणी करावी. कापणीनंतर बांधलेल्या पेंढ्या चांगल्या वाळल्यानंतर थ्रेशरमधून तुरीची काढणी करावी. थ्रेशरमधून काढणी आणि उफणणी केल्यास दाणे व भुसा अलग होतो. काही वेळेस भुशात सबंध शेंगा राहून जातात. त्याकरिता तूर चांगली वाळलेली असणे आवश्यक आहे. पाणी, खते, पीक-संरक्षण व काढणी या सर्व बाबींचे योग्य नियोजन केल्यास तुरीचे हेक्टरी २० ते २२ क्विंटल उत्पन्न मिळते.

डाळ निर्मितीचे तंत्र
तुरीची डाळ तयार करण्यामध्ये दोन भाग आहेत, ते असे –
* दाण्यांचे आवरण (साल) सैल करणे
* आवरण काढून टाकून दाण्यांचे दोन भाग करणे

पारंपरिक पद्धतीने डाळ निर्मिती करणे हवामानावर अवलंबून असल्याने त्यात वेळ आणि मनुष्यबळाचाही अपव्यय होतो म्हणून आता डाळनिर्मितीची सुधारित तंत्रे विकसित झाली आहेत. मोठ्या प्रमाणावर डाळ तयार करणार्‍या गिरण्यांतून ओली व कोरडी अशा दोन पद्धतीने डाळ केली जाते. ओल्या पद्धतीत दाणे पाण्यात भिजविले जातात. त्यामुळे टरफलाच्या आतील चिकट पदार्थ पाण्यात विरघळतो. दाणे फुगतात आणि वाळविल्यानंतर दाणे आकुंचन पावतात. त्यामुळे टरफल सैल होऊन काढणे सोपे जाते.

कोरड्या पद्धतीत रोलरच्या दाबामुळे दाण्यांच्या आवरणास तडे जातात व या तड्यातून तेल आत शिरते. असे दाणे सूर्यप्रकाशात वाळविल्याने आवरणाच्या आतील चिकटपणा कमी होतो. त्यामुळे टरफल सहजरीत्या वेगळे होते. दाणे भिजवून डाळ केल्यास डाळीचे प्रमाण अधिक मिळते; परंतु कोरड्या पद्धतीने डाळ केल्यास ती एकसारखी मिळते आणि तिला बाजारभाव चांगला मिळतो. शिवाय, अशा डाळीपासून केलेले पदार्थ अधिक काळ टिकतात.

– डॉ. जीवन रा. कतोरे
विषय विशेषज्ञ (कृषी विद्या)
– डॉ. उमेश जी. ठाकरे
विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार)