Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सोयाबीन पिवळे पडत असल्‍यास करा उपाय योजना

परभणी जिल्‍हयात काही भागात सोयाबीन पिवळे पडत असुन यावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राने पुढील उपाय योजना सुचविले आहेत.  लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस” लक्षणे निर्माण होऊन सोयाबीन पिवळे पडते, ही एक पिकातील शारीरिक विकृती आहे.

क्लोरोसिसची लक्षणे 

लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरां फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे.  लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्यामुळे हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्र्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.

क्लोरोसिसची कारणे

लोह ची कमतरता विशेषत: कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरव्या रंगद्रव्य क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते. तथापि, बर्‍याचदा जा जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते.

उपाय योजना 

शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी. ०.५ ते १.० टक्के फेरस सल्फेट ची पानांवर फवारणी करावी किंवा ईडीटीए चेलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ दहा लिटर पाण्‍यात २० ग्रॅम प्रमाणात मिसळून फवारणी करावी.

 

(अधिक माहितीसाठी संपर्क करा –  कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी, दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९०००)

Exit mobile version