Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कसे कराल शेतातील शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन

काही शेतात शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळतो, यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. या शंखी गोगलगायीचे व्‍यवस्‍थापन करण्‍याकरिता पुढील प्रमाणे उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने करण्‍यात देण्‍यात आला आहे.

शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात. शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिक ठिकाणी ठेवावेत. गोगलगायी दिवसा त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्यास्तापूर्वी त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून नष्ट करावी.

लहान शंखीसाठी मिठाची फवारणी किंवा कॅल्शीयम क्लोराईडचासुद्धा नियंत्रणासाठी बर्‍याच ठिकाणी वापर केला जातो. शंखी प्रामुख्याने पपईची रोपे व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. म्हणून मेटाल्डिहाईडच्या गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात मरतात.  शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा अथवा चुन्याचा ५ सें.मी. रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नियंत्रणासाठी टाकावा.

झाडाचे खोडास १०% बोर्डोंपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाही. गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड दाणेदार या कीडनाशकाचा वापर करावा. पूर्ण बागेमध्ये झाडाखाली मेटाल्डिहाईडचे दाणे प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे. जर हे आमिष उपलब्ध न झाल्यास, पुढील प्रकारे आमिष तयार करून बागेमध्ये टाकून घ्यावे. दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक 25 ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण 50 किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. 10 ते 12 तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामेथोक्‍झाम 50 ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे. सदरील आमिषा पासून पाळीव प्राणी लहान मुलांना दूर ठेवावे.

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

दुरध्‍वनी ०२४५२-२२९०००

Exit mobile version