आधुनिक रोगनाशके व किटकनाशके इतर विषारी आहेत की, त्यांचा योग्य रितीने वापर न केल्यास माणूस व इतर पाळीव जनावरे यांच्या जीवीतास धोका पोहोचतो. त्यासाठी अशा औषधांपासून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने पुढील सूचना काळजीपूर्वक पाळाव्यात.
१. सर्व विषारी औषधांच्या बाटल्यांवर अगर डब्यांवर मोठ्या अक्षरामध्ये त्या औषधाचे नाव घालून ती औषधे थंड व कोरड्या जागी कुलुपामध्ये सुरक्षित ठेवावीत. ती मुलाबाळाच्या हाती लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
२. किटकनाशक व रोगनाशक औषधांच्य पिशव्या काळजीपूर्वक फोडाव्यात. तसेच किटकनाशक औषधे असलेल्या बाटल्यांची झाकणे सावकाश उघडावीत.
३. बऱ्याच वेळा पिकावर फवारण्याचे औषध आजूबाजूच्या गवतावर पडण्याचा संभव असतो. म्हणून त्यापासून जनावरांना धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी.
४. खाद्यपदार्थ, इतर औषधे व लहान मुले यांच्याशी औषधांचा संपर्क येऊ देऊ नये.
५. औषध मारण्याच्या कामासाठी हातापायांवर जखम झालेल्या माणसाची निवड करु नये कारण जखमेवाटे या विषारी औषधांचा शरीरामध्ये शिरकाव होऊन धोका पोहोचण्याचा संभव असतो.
६. फवारण्याचे मिश्रण किंवा उंदरांसाठी विषारी गोळ्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी मातीची भांडी, रिकामे डबे अगर बाटल्या घरगुती कामासाठी (उदा.गोडतेल, पाणी इत्यादी साठी) न वापरता जमिनीमध्ये खोल पुराव्यात व धातुची भांडी साबण, सोडा व माती यांनी स्वच्छ धुवून घ्यावीत.
७. डब्यातून अगर बाटलीतून औषध काढतांना त्यात नळी घालून तोंडाने वर ओढू नये. शक्यतो हातात रबरी हातमोजे घालावेत.
८. औषधांचे मिश्रण तयार करण्याचे अथवा फवारण्याचे काम चालू असतांना खाणे, पिणे अगर धूम्रपान करु नये. नाहीतर औषध पोटात जाण्याचा संभव असतो. तसेच औषध फवारण्याच्या नळीतील घाण अगर कचरा फुंकून साफ न करता तो तारेने साफ करावा.
९. किटकनाशक औषध तयार करतांना व फवारतांना जरुर ते शरीर संरक्षक कपडे व उपकरणे वापरावीत.
१०. शक्यतो पिकांवर फवारण्याचे मिश्रण हाताने न ढवळता ते ढवळण्यासाठी लागडी काठी वगैरे वापरावी.
११. भाजीपाला अगर जनावरांचा (कोबी, लसूण व गवत) वगैरे तत्सम पिकांवर औषध फवारल्यानंतर त्या भाज्या अथवा चारा किमान १५ दिवस तरी खाण्यामध्ये येऊ नये, त्याचप्रमाणे स्वच्छ धुवून घ्याव्यात.
१२. शक्यतो औषध फवारण्याचे काम एकाच माणसाकडून सतत करुन न घेता पाळीपाळीने करुन घ्यावे. त्याचप्रमाणे दुपारच्या वेळी हे काम न करता सकाळी व संध्याकाळी करावे.
१३. औषध फवारणी वाऱ्याच्य दिशेने करावी म्हणजे हे औषध पिकांवर चांगले पसरते. तसेच नाका-तोंडावाटे हे औषध पोटात जाण्याचा संभव टळतो.
१४. फवारण्याचे काम पूर्ण झाल्यावर अंगावरील कपडे तसेच सर्व अंग साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावे.
१५. पेरणीनंतर किटकनाशक व बुरशीनाशकाची बिजप्रक्रीया केलेले बियाणे शिल्लक राहील्यास खाण्याकरीता वापरु नये. ते जाळून अथवा जमिनीत पुरुन टाकावे.