Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

दुधवाढीसाठी अशी घ्या गाईची काळजी

 दुग्धेात्पादन हा शेतक-यांसाठी नियमित व हमखास उत्पन्न देणारा जोडधंदा आहे. दुध उत्पादनासाठी गाई, म्हशी जास्त दुध देणा-या असाव्यात. गीर व देवणी जातीस जर्सी व फ्रिजियनपासुन संकरित केलेले वाण ‘फुले त्रिवेणी’ जास्त दुध देणारे सिध्द झाले आहेत.

हल्‍ली गुरांच्या बाजारातुन संकरित गाई, कालवडी उपलब्ध होत आहेत. मु-हा, मेहसाणा, जाफ्राबादी आणि सुरती या म्हशी दुध उत्पादन सरस आहेत. किफायतशीर दुध उत्पादनासाठी साधारणत: फ्रिजीयन देवणी यांचा संकरीत वाण ‘होलदेव’ सरस ठरला आहे.

१. गाभण जनावरांची निगा :

गाभण गाई सातव्या व म्हशी आठव्या महिन्यानंतर कळपातुन वेगळया कराव्यात. वेगळया केलेल्या गाईना स्वतंत्र हवेशीर, कोरडया व स्वच्छ गोठयातुनच खाऊ घालावे.  चराईसाठी लांबवर नेऊ नये.

रोजच्या आहाराचे नियंत्रण पुढिल तक्त्यात दिल्याप्रमाणे करावे, जेणेकरुन गर्भाचे व आईच्या शरीराचे पोषण उत्‍तम होईल.

 

गर्भकाळ (महिने) गाय म्हैस
खुराक हिरवा चारा (किलो) किमान खुराक हिरा चारा (किलो) किमान
१.५ १० २.० १२
२.० १२ २.५ १५
२.५ १५ ३.० १८
१० .. .. ३.५ २०

 

पिण्यास मुबलक स्वच्छ पाणी दया व खाईल तेवढा कडबा दया.

२. विणा-या जनावरांची काळजी घ्या :

विण्याआधी म्हशीस भादरुन घ्या. सर्वसाधारणपणे दर ६ महिन्यांनी म्हशींना भादरावे. जनावर विण्याआधी १ दिवस योनीतुन पांढरा चिकट द्रव वाहतो.  जनावरास १० x १० (फुटाच्या) गोठयात मोकळे सोडा. त्यात तण, काड किंवा गवताची बिछायत करा.

गोठयात ०.२५ टक्के मॅलेथिऑन द्रावण फवारा किंवा ५ टकके डीडीटी ची धुरळणी करा. स्व्च्छ पाण्याची सोय करा. जनावरास अगोदर कळा येतात, ते उठबस करतात. पाण्याची पिशवी योनीतुन बाहेर येते. ती फुटते आणि वासरु डोके आणि पुढच्या पायाकडुन बाहेर येते. नैसर्गीकरित्या साधारणपणे अर्धा ते एक तास जनावर विते.

जास्त वेळ लागल्यास जवळच्या पशुवैद्यकास बोलावावे.  प्रसुतीनंतर जार एक ते दिड तासात पडते. तसे न झाल्यास पुशवैद्यकाची मदत घ्यावी.

जनावराच्या पाठीमागचा भाग गरज पाण्याने स्वच्छ करावा. योनीच्या बाहयांगास निर्जंतुक औषधीमिश्रीत ग्लिसरीन किंवा गोडतेल लावावे. कण्या किंवा घुग-या लवकरात लवकर दयाव्यात. ज्वारी / बाजरी /गहु / मका १ किलो शिजवावे. त्यात अर्धा किलो गुळ व मुठभर मीठ, १ ओला नारळ (खोबरे), १०० ग्रॅम मेथी, १०० ग्रॅम शेपु टाकुन ३ – ४ दिवस सकाळ – संध्याकाळ खाऊ घालावे. या काळात दुध कच्चे असते, त्याला चिक म्हणतात. हा चीक वासरास लवकरात लवकर पाजवावा. (अर्ध्या तासाच्या आत).

३. दुभत्या जनावरांची निगा व आहार :

पाचव्या दिवसापासुन घुग-या ऐवजी दिड किलो खुराक शरीर पोषणासाठी द्यावा व उत्पादित दुधाच्या ४० टकके या प्रमाणात जास्तीचा खुराक थेाडा थोडा वाढवत नेऊन ८ – १० दिवसांत पुर्ण संतुलित आहार दयावा. गाय रोज १० लिटर दुध देत असेल तर ४ किलो जास्तीचा खुराक दयावा.

अशा प्रकारे गाईला १.५ किलो अधिक ४ किलो असा एकुण ५.५ किलो खुराक, निम्‍मा – निम्‍मा करुन सकाळ-संध्याकाळ दयावा.  या शिवाय हिरवा चारा किंवा मुरघास १० – १५ किलो व खाईल तितका कडबा दयावा.

दुभत्या म्हशीस पोषणासाठी रोज २ किलो खुराक दयावा. दुध उत्पादनाच्या ५० टक्के जास्तीचा खुराक दयावा. म्हणजे १० लिटर दुध देणा-या म्हशीस ५ किलो जास्तीचा खुराक दयावा.

अशा प्रकारे २ + ५ = ७ किलो खुराक रोज सकाळ–संध्याकाळ निम्‍मा भाग दयावा. हिरवा चारा व सुकी वैरण गाईप्रमाणे दयावी. यामुळे जनावर लवकर दुधाळते. सहा लिटर दुध देणा-या म्हशीस १५ किलो डाळवर्गीय चारा जसे लुसर्न गवत, बरसीम, दशरथ, हादगा, शेवरी इतयादी अधिक १५ किलो कडुळ किंवा मक्याचा हिरवा चारा आणि खाईल तितका कडबा दिल्यास खुराक देण्याची आवश्यकता नाही.

सहा किलो पेक्षा जास्त दुध देणा-या जनावरास हिरवा चारा असला तरीही जास्तीचा खुराक देणे आवश्यक आहे.  एक किलो खुराकाऐवजी ४ किलो डाळवर्गीय हिरवा चारा दयावा.

सौजन्य  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

Exit mobile version