हरभरा हे एक रब्बी हंगामामधील महत्वाचे कडधान्य पिक आहे. पिक फेरपालटामध्येही हरभरा हे एक उपयुक्त द्विदल पिक आहे. २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये १७.४४ लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा लागवड होऊन १५.०७ लाख टन हरभरा उत्पादन झाले. राज्याची सरासरी उत्पादकता ८.५० क्विंटल प्रति हेक्टर आहे. जमिनीची मशागत, पेरणी, रासायनिक खतांचा समतोल वापर, सुधारित वाणांची निवड, फायदेशीर पीक पद्धतीचा अवलंब, आंतरमशागत, गरजेनुसार पीक संरक्षण, तणांचा बंदोबस्त, उपलब्ध ओलाव्याचा कार्यक्षम वापर या सुधारित लागवड तंत्रज्ञानाद्वारे हरभरा उत्पादकेत वाढ करणे शक्य आहे.
• पूर्वमशागत : खरिपातील पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोल नांगरट (२५ सें.मी.) करून त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. कुळवाच्या पाळ्यांनी जमीन भुसभुशीत झाल्यावर जमिनीतील काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खरिपात शेणखत दिले असल्यास पुन्हा वेगळे देण्याची गरज नाही, अन्यथा एकरी दोन टन चांगले कुजलेले शेणखत पूर्वमशागत करताना शेतात पसरून मातीत चांगले मिसळून द्यावे.
• पेरणीचे तंत्र : परतीच्या पावसाच्या उपलब्ध ओलाव्याचा हरभऱ्याच्या उगवण आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो. उपलब्ध ओलीवर जिरायती पीक चांगले येते. जिरायती क्षेत्रामध्ये हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे, २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान जमिनीतील ओल उडून जाण्यापूर्वी पेरणी करावी. बागायती हरभरा २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान पेरावा. देशी हरभऱ्याच्या पेरणीकरिता दोन ओळींतील अंतर ३० सें.मी., तर दोन झाडांतील अंतर १० सें.मी. ठेवावे. काबुली हरभऱ्याकरिता दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी., तर दोन झाडांतील अंतर १० सें.मी. ठेवावे. बागायती हरभरा सरी-वरंबा पद्धतीनेसुद्धा चांगला येतो. तीन फुट रुंद सरी सोडून वरंब्याच्या दोन्ही बाजूंना १० सें.मी. अंतरावर बियाण्याची टोकण करावी. कोरडवाहू देशी हरभऱ्याची समाधानकारक उगवण होण्यासाठी बियाणे पेरणीच्या एक दिवस आधी पाण्यात साधारणतः ४ ते ६ तास भिजवावे. संध्याकाळी ते पाण्याबाहेर काढून हवेशीर ठिकाणी ताडपत्रीवर पातळ थरात पसरून ठेवावे. भिजल्यामुळे फुगलेले बियाणे पुन्हा यथास्थितीत येईल. असे सुकलेले बियाणे पेरणीसाठी वापरावे. ओलीताची व्यवस्था असल्यास स्प्रिंकलरद्वारे संपूर्ण शेत ओलवून घ्यावे. योग्य प्रकारे वाफसा आल्यानंतर ट्रॅक्टर अथवा बैलचलीत पेरणीयंत्राने पेरणी करावी.
• बियाण्याचे प्रमाण : हरभरा वाणांच्या दाण्यांच्या आकारमानानुसार एकरी बियाणे प्रमाण वापरावे. त्यामुळे एकरी अपेक्षित रोपांची संख्या राखतायेते. विजय या मध्यम दाण्यांच्या वाणाकरिता २६ ते २८ किलो; तर विश्वास, विशाल, दिग्विजय आणि विराट या टपोऱ्या दाण्यांच्या वाणांकरिता ४० किलो प्रति एकरी बियाणे वापरावे. जास्त टपोऱ्या दाण्यांच्या कृपा, पिकेव्ही २, पिकेव्ही ४ या काबुली वाणाकरिता ५० ते ५२ किलो प्रति एकरी या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे.
• बियाणेप्रक्रिया : बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत मर, मूळकूज किंवा मानकूज रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा रासायनिक बुरशीनाशक थायरम २ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम २ ग्रॅम एकत्र करून चोळावे. यानंतर जीवाणूसंवर्धक रायझोबियम व स्फुरद विरघळवणारे जीवाणू २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्याला गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. थंड द्रावणात २५० ग्रॅम प्रत्येक संवर्धन मिसळून लेप तयार करावा. १० किलो बियाण्यास हा लेप पुरेसा आहे. प्रक्रिया केलेले बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी.
• सुधारित वाण :
– देशी हरभरा : हा हरभरा मुख्यत्वे डाळीकरिता व बेसनाकरिता वापरतात. या प्रकारामध्ये साधारणतः दाण्याचा रंग फिक्कट काथ्या ते पिवळसर असतो व दाण्याचा आकार मध्यम असून १०० दाण्यांचे वजन हे १६ ते २६ ग्रॅम असते व पक्व होण्याचा कालावधी १०५ ते ११५ दिवस असतो. या प्रकारामध्ये विजय, दिग्विजय, विशाल, जाकी- ९२१८, साकी- ९५१६, फुले विक्रम, बीडीएनजी- ७९७ हे वाण आहेत.
– काबुली हरभरा : हा हरभरा खाण्यासाठी व छोले भटोरे बनविण्यासाठी वापरतात. या हरभऱ्याच्या प्रकारामध्ये दाण्याचा रंग पांढरा असतो. सध्या लागवडीखाली असणाऱ्या काबुली वाणांच्या १०० दाण्यांचे वजन साधारणतः २५ ते ४२ ग्रॅमपर्यंत आहे. या हरभऱ्याच्या जाती जवळपास ९५ ते ११५ दिवसांत पक्व होतात. या प्रकारामध्ये श्वेता, विराट, पिकेव्ही २ (काक २), पिकेव्ही ४, कृपा हे वाण आहेत.
– गुलाबी हरभरा : गुलाबी हरभरा देशी आणि काबुली हरभऱ्यापासून भिन्न म्हणजे लालसर गुलाबी असून दाण्याचा आकार गुळगुळीत गोल असतो. हा हरभरा फुटाणे करण्याकरिता वापरतात आणि त्याला देशी हरभऱ्याच्या तुलनेत बाजारभाव असतो. या हरभऱ्याच्या दाण्याचा रंग फिक्कट गुलाबी असून दाणे गोल व गुळगुळीत असतात. या प्रकारामध्ये गुलक १ हा वाण येतो.
– हिरवा हरभरा : या हरभऱ्याच्या दाण्यांचा रंग वाळल्यानंतरसुद्धा हिरवा राहतो. हा हरभरा उसळ किंवा पुलाव करण्यास उत्कृष्ट असून, त्याचा बाजारभाव इतर देशी वाणांच्या तुलनेत जास्त असतो. या प्रकारामध्ये हिरवा चाफा, पिकेव्ही हरित हे वाण येतात.
• संतुलित खतमात्रा : सुधारित वाण खत आणि पाणी यांस चांगला प्रतिसाद देतात, त्यासाठी खताची मात्रा माती परीक्षणानुसार द्यावी. प्रति एकरी चांगले कुजलेले दोन टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. जिरायती हरभऱ्याला पेरणीवेळी प्रति एकरी ५ किलो नत्र आणि १० किलो स्फुरद जमिनीत पेरून द्यावे. बागायती हरभऱ्याला पेरणीवेळी प्रति एकरी १० किलो नत्र, २० किलो स्फुरद व १२ किलो पालाश जमिनीत पेरून द्यावे. गंधक किंवा जस्ताची कमतरता असणाऱ्या जमिनीत नत्र व स्फुरदासोबत ८ किलो गंधक किंवा १० किलो झिंक सल्फेट प्रति एकरी पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यावे.
पीक फुलोऱ्यात असताना दोन टक्के युरियाची पहिली फवारणी आणि त्यानंतर १० ते १५ दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी. किंवा दोन टक्के पोटॅशियम नायट्रेटच्या दोन फवारण्या (पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना व त्यानंतर घाटे तयार होण्याच्या अवस्थेत) कराव्यात, यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.
• आंतरमशागत : हरभरा पिक दोन कोळपण्या २०-२५ दिवस व ३०-३५ दिवसांनी कराव्यात. कोळपणीनंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी आवश्यकतेनुसार एक-दोन खुरपण्या कराव्यात. माजुरांअभावी खुरपणी शक्य नसल्यास पेरणीवेळी पेंडीमिथॅलीन (३० इसी) १ लिटर प्रति एकर २०० लिटर पाण्यामधून फवारणी करावी.
• पाणी व्यवस्थापन : हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ सें.मी. पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर (सात ते आठ सें.मी.) देणे महत्त्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास ३० टक्के, दोन पाणी दिल्यास ६० टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात १०० टक्क्यांपर्यंत वाढ होते. जिराईत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल, तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सऱ्यांतील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा; तसेच लांबीसुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी. म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देणे सोयीचे होते. मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीत दोनच पाण्याच्या पाळ्या पुरेशा होतात. भारी जमिनीत ३० ते ३५ दिवसांनी पहिले, दुसरे पाणी ६५ ते ७० दिवसांनी द्यावे.
• काढणी व मळणी : शेताच्या सर्व भागातील पीक वाळल्यावर पाने झडतात, म्हणून पीक परीपक्व झाल्याबरोबर कापणी करावी. अन्यथा घाटे जमिनीवर गळून आर्थिक नुकसान होते. कापणी जमीनीलगत कापून केल्यास नत्राच्या गाठी असलेल्या मुळया जमीनीत राहून त्यातील नत्राचा पुढील पीकास उपयोग होतो. कापणीपश्चात उन्हात ८ ते १० दिवस वाळविल्यावर काठीने झोडपून अगर बैलांचे सहाय्याने मळणी करावी. त्यानंतर उफनणी करून बी अलग करावे. यासाठी मळणी यंत्राचा किंवा कापणी-मळणी एकत्र करणाऱ्या यंत्राचा वापर उपयुक्त ठरतो.
– श्री. संतोष करंजे, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या), कृषी विज्ञान केंद्र, बारामती