Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

अतिरिक्त उत्पन्नासाठी करा शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन

अनियमित पर्जन्य, हवामानातील बदल यामुळे कृषि उद्योगासमोर निरनिराळी आव्हाने उभी राहिली आहेत त्यातूनच उद्भवणारे कर्जबाजारीपण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण बनत आहे. त्यावर उपाय म्हणून कर्जमाफी वैगेरे योजना येत असतात. पण त्या तितक्या प्रभावी नसतात हे सर्व बदलण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया जास्त आत्मनिर्भर बनवले पाहिजे. शासनाची शेततळे योजना म्हणजे शेतीसाठी खात्रीशीर जलस्त्रोत शेततळ्यांच्या आकारमानानुसार काही लाख लिटर पासून काही कोटीं लिटर पर्यंत पाणीसाठा उपलब्ध आहेत. शेततळ्यांमुळे शेतजमीन पाणीसाठयासाठी जमिन अडकून राहते. पाणी स्वच्छ ठेवणे ही जिकरीचे होऊन जाते. जमिन अडकल्यामुळे उत्पादनात घट होते म्हणूनच या शेततळ्यांचा उपयोग करून कमीत कमी श्रमात मत्स्यव्यवसाय करून उत्तम उत्पन्न कमावता येते.

शेततळे सोडून मत्स्य तलाव जागा निवडीची तत्त्वे –

भूप्रदेश – मत्स्यतलावाची जागा निवड करताना जागेचा उतार हा मध्यम असावा. म्हणजेच दोनटक्के पर्यंत उतार असलेली जागा योग्य समजावी. जास्त उतार असलेली जागा निवड केल्यास खोदकामाचा खर्च तसेच बांध किंवा तट कामाचा खर्च वाढतो. तलावाची जागा पूर क्षेत्रापासून दूर असावी.
पाणी उपलब्धता – बारामाही पाण्याची उपलब्धता असावी. मत्स्य प्रकारानुसार पाण्याची गुणवत्ता (गोडे/निमखारे/खारे) असावी. पाणीपुरवठा साधनाची हमी, उपलब्ध पाण्याची गुणवत्ता (क्षारता, सामू, गढूळता, रंग, पारदर्शकता,प्राणवायूचेप्रमाण इत्यादी) चांगली असावी.

हवामान – 

तापमान, आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग इत्यादी बाबींचा विचार करावा. कमी पाऊस असलेल्या प्रदेशामध्ये पाणी साठवण क्षमता जास्त असलेले तलाव तयार करावे किंवा बाहेरील पाणीपुरवठा साधनाची निर्मिती करावी. बाष्पीभवन वेगाचा विचार करून तलावाची क्षमता ठरवावी. बाष्पीभवन वेग जास्त असल्यास पाणी वापर जास्त होतो व पाण्याचे तापमान वाढते.त्यामुळे सतत पाणी पुरवठा करावा लागतो.
व्यवस्थापन बाबी – चोरीपासून संरक्षण, मत्स्यखाद्य, काढणी पश्‍चात काळजी, हाताळणी, रोगापासून संरक्षण इत्यादी.

विक्री व्यवस्थापन –

शहरापासून अंतर, वाहतुकीची साधने, काढणीपश्‍चात काळजी, हाताळणी, साठवण, रस्ता इत्यादी.
इतर बाबी -अ) मजुराची उपलब्धता ब) वीज उपलब्धता क) तांत्रिक मार्गदर्शन ड) साहित्य उपलब्धता, ई) वित्तपुरवठा/ पतपुरवठा इत्यादी.

मत्स्य तलावाचे प्रकार –

कोणत्याही प्रकारचा तलाव हा मत्स्य पालनाकरिता उपयोगात आणला जाऊ शकतो परंतु मत्स्यपालन करण्याकरिता योग्य आकाराचा समांतर पायाचा व तळाचा कमी उतार असलेला तलाव हा योग्य समजला जातो. संचयन तलाव- या तलावाचे क्षेत्रफळ हे ०.२ ते २.० हेक्‍टर इतके असू शकते. सर्वसाधारणपणे या तलावाची लांबी ९० मीटर, रुंदी ३० मीटर व खोली २ ते ३.५ मीटर इतकी असते.
विक्रीकरण तलाव– या तलावाचा उपयोग हा विक्री योग्य मासे ठेवण्याकरिता होतो. ज्यावेळी बाजारामध्ये मागणी वा किंमत जास्त असते त्या वेळी या तलावाचा उपयोग होतो. या तलावाचे क्षेत्रफळ कमी असून तलावाची खोली ही सर्वसाधारणपणे तीन मीटर पर्यंत असते.
अलग/वेगळीकरण तलाव– या तलावामध्ये बाहेरील आणलेले मासे किंवा रोगग्रस्त मासे ठेवण्यात येतात. मुख्य माशांपासून रोगग्रस्त मासे स्वतंत्र ठेवण्याकरिता या तलावाचा उपयोग होतो. या तलावाचे क्षेत्रफळ हे ०.०२ हेक्‍टर इतके असू शकते. या तलावाची खोली १.५ मीटर पर्यंत असते.

गोड्या पाण्यात संवर्धनासाठी कार्प मासे-

जगात माशांच्या सुमारे २२,००० जाती आढळतात. त्यापैकी १६०० च्यावर जाती या आपल्या भारतात आढळतात. या सर्व जातींपैकी ठराविक
जाती खाण्यासाठी उपयोगी आहेत. संवर्धनयोग्य जातीच्या माशांची निवड करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. मत्स्यसंवर्धन करताना मासे हे इतर माशांच्या बरोबर राहण्यास योग्य असावेत. मासे हे दाटीवाटीने राहूनसुद्धा वाढीसाठी सक्षम असावेत. मासे हे वातावरणातील तसेच पाण्यातील होणाऱ्या बदलाशी जुळवून घेणारे असावेत. उदा. तापमान, सामू, गढूळपणा, विद्राव्य प्राणवायू, विद्राव्य कार्बन- डाय- ऑक्‍साईड. मासे हे हाताळण्यास योग्य तसेच काढणीसाठी योग्य असावेत. बाजारात माशांना चांगली मागणी असावी.

भारतीय प्रमुख कार्प –
• कटला (Catla catla)
• रोहू (Labeo rohita)
• मृगळ (Cirrhinus mrigala)
चायनीज कार्प –
• सायप्रिनस (Cyprinus carpio)
• चंदेरा (Hypophthalmichthys molitrix)
• गवत्या (Ctenopharyngodon idella)
खतांचा वापर –
मत्स्यबीज तलावामध्ये सोडण्यापूर्वी त्यामध्ये नैसर्गिक खाद्य उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यासाठी खतांचा वापर करावा.
सेंद्रिय खत (शेण) , रासायनिक खत (डीएपी), पेंड , भुसा एकत्र करून पाण्यामध्ये शिंपडावे. या मिश्रणामुळे नैसर्गिक खाद्याची निर्मिती होते.
बीजसंचयन –
बोटूकली आकाराचे ५००० मत्स्यबीज प्रती एकरी सोडावेत. तलावातील बीजसंचयन थंड वातावरणात सकाळी अथवा संध्याकाळी करावे. बीजसंचयानाच्या वेळी मृत अथवा आजारी मासे काढून टाकावेत.
पाण्याची गुणवत्ता–
उत्तम दर्जाचे पाणी हे उत्तम मत्स्यउत्पादन देते. पाण्याचे व्यवस्थापन जेवढे उत्तम तेवढेच उत्तम उत्पादन आणि नफा मिळेल . शेततळ्यातील पाण्याचा दर्जा यावर विशेष लक्ष असणे गरजेचे आहे.

मत्स्य शेतीला पाण्यातील घटकांचे योग्य प्रमाण

सामू – ७ ते ८.५
तापमान – २५ ते ३० अंश सेल्सिअस
ऑक्सिजन – ४ ते१० मिली ग्रॅम प्रति लिटर
हार्डनेस – ४० ते ४०० मिली ग्रॅम प्रति लिटर
अमोनिया – १ मिली ग्रॅम प्रति लिटर पेक्षा कमी
रंग – साधारण हिरवट नीळसर

खाद्य व्यवस्थापन –
केवळ शेणखत वापराने १.५ ते २.० टन उत्पादन मिळू शकते.
माशांचे तयार खाद्य दिल्याने ३ ते ४ टन उत्पादन मिळू शकते.
खाद्य हे शक्यतो शेंगदाणा/मोहरीच्या तेलाची मळी आणि तांदळाची पेंड यांच्या मिश्रणापुरतेच मर्यादित आहे. मात्र हळूहळू सघन मत्स्यशेतीकडे लोकांचा कल वाढत असल्याने वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रथिनांमधील घटकदेखील यात समाविष्ट करण्‍यात येत आहेत.

आरोग्य व्यवस्थापन –
दर महिन्याला माशांची वाढ तपासून घ्यावी.
दर १५ दिवसांनी पाण्याची तपासणी करून घ्यावी.
रोगात मासे वेगळे करवेत.

मासे काढणी –
एका वर्षाने मासे काढणी करावी. त्यावेळी माशाची वाढ १ ते १.५ किलो इतकी झाली असते.
मासे काढणीचा निर्णय बाजारातील मागणीनुसार करावा.

मत्स्यबीज मिळण्याचे ठिकाण –
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित, कृषि विज्ञान केंद्र , बारामती (पुणे), मु. पो. माळेगाव खुर्द, ता. बारामती, जि. पुणे
संपर्क :- श्री. सुमित नालबंद- ९९७०७९८६४४ / ०२११२-२५५४२७
उपलब्ध मत्स्यबीज जाती – कटला, रोहू, मृगळ, सायप्रिनस, चंदेरा

-डॉ. आर. एस. जाधव, पशुसंवर्धन विषय विशेषज्ञ व श्री. सुमित नालबंद, मत्स्यतज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बारामती

Exit mobile version