Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

असे करा ठिबकवरील कापसाचे व्यवस्थापन

ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास कापूस पिकाचे अधिक उत्पादन मिळते. त्यामुळे अनेक शेतकरी या पद्धतीचा अवलंब करीत आहेत. दरवर्षी कापूस पिकाने जमिनीतून शोषून घेतलेली अन्नद्रव्ये भरून न निघाल्यास, पिकांचे संतुलित पोषण न झाल्यास पिकाची जोमदार वाढ होत नाही. कापसाचे जास्त उत्पादन मिळण्यासाठी त्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

बरेच कापूस उत्पादक शेतकरी ठिबक सिंचन संच उभारल्यापासून बरेच जण दरवर्षी त्याच अंतरावर कापसानंतर पुन्हा कापसाचे पीक घेतात. यामुळे कापूस पिकाने जमिनीतून शोषण केलेल्या अन्नद्रव्यांची भर न पडल्यास बोंडे चांगली पोसली जात नाहीत, बोंडांना वजन येत नाही, झाडांची वाढ खुंटते, पाने लालसर होतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्याबरोबरच पिकास संतुलित पोषण (मुख्य अन्नद्रव्ये- नत्र, स्फूरद, पालाश, दुय्यम अन्नद्रव्ये-कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये – झिंक, फेरस, बोरॉन) तसेच जिवाणू खते ऍझेटोबॅक्टर, पी. एस. बी. हे शेणाच्या स्लरीमधून वापर करणे अधिक फायद्याचे असते.

कापूस पिकासाठी एकाच वेळी जास्त खते वापरू नयेत. खते जास्तीत जास्त विभागून द्यावीत. पिकाच्या अवस्थेनुसार हव्या त्या अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. जसे द्राक्ष, स्ट्रॉबेरी, गुलाब, कानेंशन्स, जरबेरा, ढोबळी मिरची, टोमॅटो, उत्पादक शेतकरी ठिबकमधून रोज विद्राव्य खते वापरतात. कापूस पिकातही याचा अवलंब केल्यास अधिक फायदा होईल. कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी कापसासाठी आठवड्यातून किमान दोन वेळा तरी ठिबक सिंचनाद्वारे खते द्यावीत. खते देताना खताची मात्रा खताच्या टाकीत सरळ टाकू नये. निवड केलेली खतांची मात्रा आधी प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये संपूर्णपणे विरघळले आहे की नाही, याची खात्री करावी. नंतरच द्रावण फर्टिलायझर टँकमध्ये टाकून फर्टिगेशन सुरू करावे. अलिकडे बाजारात पाण्यात विरघळणारे मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट तसेच चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट्स (सूक्ष्म अन्नद्रव्ये) एक किलोच्या पाकिटामध्ये उपलब्ध आहेत. त्यांचाही ठिबक सिंचनासोबत वापर केल्यास कापूस पिकासाठी अधिक उपयुक्त ठरेल. पिकाची वाढ जोमदार होऊन त्याची अधिक उत्पादन देण्याची क्षमता वाढेल.

लागवडीच्या वेळी रासायनिक खतांचा वापर केलेला नाही, अशा शेतकर्‍यांनी एकरी युरिया ५० किलो, १० ः २६ ः २६ हे खत ५० किलो, मॅग्नेशियम सल्फेट १५ किलो, गंधक १० किलो, झिंग एक समान द्यावे. खतांचा बेसल डोस देऊन झाला असल्यास त्वरित फर्टिगेशन सुरू करावे. ठिबक सिंचन संचाचा पाण्यासोबतच पाण्यात विरघळणार्‍या खतांचा वापर करण्यासाठी करावा. नत्राकरता युरिया, स्फूरदसाठी १२ः६१ः० किंवा फॉस्फेरिक ऍसिड आणि पालाशसाठी फक्त पांढरा पोटॅशचा उपयोग करावा. ठिबक सिंचनातून खते देण्यासाठी व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर टँकचा वापर करावा.

पूर्वहंगामी कापूस पिकासाठी ठिबक सिंचनाचे वेळापत्रक
(लागवड ५ फूट बाय २ फूट)
महिना पाण्याची गरज
झाड/दिवस/लिटर
ऑगस्ट ३.६००
सप्टेंबर ५.५००
ऑक्टोबर ७.१००
नोव्हेंबर ४.७५०
डिसेंबर ३.२६०
जानेवारी ३.३२५
फेब्रुवारी ३.६२५
टीप ः पाऊस सुरू असेल, जमिनीत पुरेशी ओल असेल तर ठिबक संचाद्वारे पाणी देऊ नये. इनलाईन ठिबक योग्य (१ किलो/चौ. सें. मी.) दाबावरच चालवावे.

पूर्व हंगामी कापूस लागवडीचे पीक सध्या ३० ते ५० दिवसांचे आहे. काही अल्प प्रमाणात तुडतुडे, पाने खाणारी अळी दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणाकरता मेटॅसिस्टॉक्स किंवा डायमेथोएट किंवा क्लोरोपायरीफॉस किंवा मेथील ऑक्सीडेटॉन १५ मि.लि., १५ लिटर पाण्यातून फवारणी करावी. सोबत १० मि.लि. स्टिकर पाण्यात मिसळावे. फवारणी करताना फवारणी सूक्ष्म येण्यासाठी पंपाला प्रेशर असावा. कापसाच्या झाडांवर फवारणी काळजीपूर्वक करावी. झाडांना आंघोळ घालू नये. फवारा अतिसूक्ष्म असावा. पिकाची उत्तम वाढ होण्यासाठी १९ ः १९ ः १९ विद्राव्य खत ४५ ग्रॅमची १५ लिटर पाण्यातून फवारणी करावी, सोबत स्टीकरचा वापर करावा.

पिकाच्या अवस्थेनुसार पाणी द्या
बर्‍याच वेळा दोन पावसामध्ये खंड पडतो. अशा वेळी पिकास पाण्याचा ताण पडतो. पाण्याच्या ताणानंतर पाऊस पडल्यास किंवा पाणी दिल्यास पात्या, फुलांची गळ होते असे लक्षात येते. त्यामुळे ठिबक सिंचन संच आपल्याकडे असल्यानंतर पाऊस पडण्याची वाट न बघता ठिबक सिंचनाद्वारे सिंचन करावे. पिकाच्या अवस्थेनुसार पिकाची पाण्याची गरज भागवावी. जमीन फक्त वाफसा अवस्थेत राहील एवढेच पाणी ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. मार्गदर्शनासाठी खालील वेळापत्रकाचा उपयोग करावा. कापूस पीक पाण्यास अतिशय संवेदनशील आहे. कापूस पिकास अधिक पाणी देऊ नये. जमिनीत वाफसा कायम ठेवावा. पाण्याचा ताण पडल्यास पात्या, फुलांची गळ होते. पानांचा आकार लहान होतो, जमीन कोरडी झाल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. बोंडे चांगली पोसली जात नाहीत, वजनदार होत नाही. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होतो. अधिक पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा करावा. कापूस पिकाच्या उत्पादनात पाणी आणि खतांचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे.

– बी. डी. जडे,
वरिष्ठ कृषितज्ज्ञ, जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि., जळगाव.
मो. नं. ९४२२७७४९८१

Exit mobile version