सध्या काही ठिकाणी सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी इत्यादी पिकांवर विविध प्रकारच्या किडींचा व अळींचा प्रादूर्भाव आढळून येत आहे. वेळीच या किडी नियंत्रित केल्या नाही तर उत्पादनात घट होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी किडींचे योग्य व्यवस्थापन करून त्या नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे.
सोयाबीन
प्रमुख किडी
* तंबाखूवरील पाने खाणारी अळी
* उंट अळ्या
* खोड माशी
* चक्री भुंगा
* पाने गुंडाळणारी अळी
व्यवस्थापन
मुख्य पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफूल या पिकाची एक ओळ लावावी आणि त्यावर तंबाखूवरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळी यांची प्रादूर्भावग्रस्त पाने अंडी/अळ्यांसहीत नष्ट करावीत.
* पेरणी जुलैच्या दुसर्या आठवड्यांपर्यंत संपवावी.
* पेरणीसाठी बियाण्यांंचे प्रमाण शिफारशीप्रमाणे वापरावे.
* नत्रयुक्त खतांचा समतोल वापर करावा.
* संप्रेरकाचा वापर टाळावा.
* पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे.
* आंतरमशागत- निंदणी व कोळपणी वेळेवर करावी.
* हेक्टरी २०-२५ पक्षी थांबे उभारावेत.
* तंबाखूवरील पाने खाणार्या अळींसाठी हेक्टरी १०-१२ कामगंध सापळे लावावेत; तसेच सापळ्यात जमा झालेले पतंग रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून नष्ट करावेत.
* चक्रीभुंगा व खोडमाशीच्या प्रादूर्भावामुळे कीडग्रस्त पाने, फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडींसह नायनाट करावा.
* जेथे चक्रीभुंगा आणि खोडमाशीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, अशा ठिकाणी पेरणीच्या वेळेस फोरेट १० टक्के दाणेदार १० किलो प्रतिहेक्टर जमिनीत ओल असताना टाकावे.
* पाने खाणार्या अळ्या, चक्रीभुंगा आणि खोडमाशी या किडींनी अंडी घालू नये, याकरता सुरवातीलाच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
* केसाळ अळी तसेच तंबाखूची पाने खाणारी अळी, एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात व त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात. अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून किडीसह नष्ट करावीत.
* तंबाखूवरील पाने खाणार्या (स्पोडोप्टेस) अळीच्या व्यवस्थापनासाठी एस. एल. एन. पी. व्ही. ५०० एल. ई. विषाणू २ मि. लि. प्रति लिटर पाणी किंवा नोमुरिया रिलाई या बुरशीची ४ ग्रॅम लिटर पाण्यात मिसळून फवारणी, प्रादूर्भाव आढळून येताच करावी.
* पिकांचे नियमित सर्वेक्षण करून किडींनी आर्थिक नुकसानीची मर्यादा पातळी गाठल्यास कीड नियंत्रणाचे उपाय योजण्याबाबत विचार करावा.
* हिरवी घाटे अळी या किडींच्या प्रादूर्भावाची पातळी समजण्याकरता हेक्टरी किमान ५-१० कामगंध सापळे शेतात लावावेत. सापळ्यामध्ये प्रतिदिन ८ ते १० पतंग सतत २ ते ३ दिवस आढळल्यास किडीच्या नियंत्रणाची उपाययोजना करावी आणि सापळ्यात जमा झालेले पतंग रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून नष्ट करावेत.
* पिकांची फेरपालट करावी. सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचे पीक घेऊ नये.
* सोयाबीनचे पीक काढल्यानंतर लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरट करावी.
* किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच किटकनाशकांची फवारणी करावी.
किडींची आर्थिक नुकसानीची पातळी
* तंबाखूची पाने खाणारी अळी/केसाळ अळी ः १० अळ्या प्रति मीटर ओळीत पीक फुलावर येण्यापूर्वी.
* उंट अळ्या ः ४ अळ्या प्रति मीटर पीक फुलावर असताना, ३ अळ्या प्रति मीटर ओळीत शेंगा धरण्याच्या अवस्थेत असताना.
* घाटे अळी ः ५ अळ्या प्रति मीटर ओळीत शेंगा धरण्याच्या अवस्थेत असताना.
* पाने पोखरणारी अळी
* सरासरी १० टक्के प्रादूर्भावग्रस्त पाने.
– डॉ. ए. जी. बडगुजर, प्रा. बी. व्ही. भेदे, एस. टी. शिंदे
किटकशास्त्र विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी