गाईंमधील वांझपणाची समस्या आणि त्यावर उपाय

महाराष्ट्रात बहुसंख्य शेतकर्‍यांजवळ गुरेढोरे आहेत. बरेच जण दुग्धव्यवसाय करतात व त्यांच्याजवळ माद्या असतात. या माद्यांमध्ये प्रजनन संस्थेसंबंधी काही समस्या येतात. या समस्यांपैकी एक समस्या म्हणजे वांझपणा, ही समस्या वेळीच ओळखून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.

कधी कधी निरोगी असणार्‍या माद्यांमध्ये वांझपणाची समस्या असते व बरेचदा त्याचे योग्य निदान होत नाही. याला बरीच कारणे आहेत. उदा. गावात तज्ज्ञ पशुरोग व विषयाचा डॉक्टर उपलब्ध नसणे वगैरे. वांझपणा म्हणजे जेव्हा एखादी गाय माजावर न येणे किंवा रेतन केल्यावरही जिला गर्भधारणा न होणे आणि त्यामुळे तिला संतती न होणे होय. वांझपणाचे दोन प्रकार असतात.

१) कायमस्वरूपी वांझपणा किंवा स्थायी वांझपणा.
२) अस्थायी वांझपणा.

कायमस्वरूपी वांझपणा किंवा स्थायी वांझपणा
या प्रकारचा वांझपणा गाईच्या प्रजनन अंगात असलेल्या एखाद्या दोषामुळे असतो. उदा. निरणाचा म्हणजे योनीचा मार्ग स्थायी जाड पडद्यामुळे बंद असणे. योनीची अपूर्ण वाढ, स्त्रीबीजवाहिनी किंवा स्त्रीबीजनलिकेत दोष असणे, डिंबग्रंथीमध्ये दोष असणे, इतर प्रजनन अंगामध्ये दोष असणे इत्यादी.
मादीच्या शरीरात प्रजननासाठी आवश्यक संप्रेरकांची कमतरता असेल तर तिच्या प्रजनन अवयवांची नीटपणे वाढ होत नाही. याशिवाय, नराच्या विर्यात असणार्‍या शुक्राणू आणि मादीच्या डिंबग्रंथींवरून निघणार्‍या स्त्रीबिजाच्या मिलनात काही अडचण. जसे योनीद्वार संकुचित असणे किंवा योनीद्वाराचा पडदा जाड असणे किंवा बीजवाहिनीत दोष वगैरे असले तर मादी कायमस्वरूपी वांझ राहते. कारण आनुवंंशिक कारणामुळे असणार्‍या वांझपणावर उपाय नसतो. अशा परिस्थितीत अनुभवी जनावरांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन अशा वांझ जनावरांना कळपातून काढून टाकावे. कारण त्यांच्या पालनपोषणावर उगाच खर्च करत बसल्याने दुग्धव्यवसाय तोट्यात येतो आणि आर्थिक नुकसान होते.

अस्थायी वांझपणा
या प्रकारचा वांझपणा प्रजनन अंगांमध्ये होणार्‍या व्याधी किंवा रोगांमुळे असतो. कधी-कधी माद्यांना जीवाणूजनित रोग जसे ब्रुसेल्लोसिस, व्हिब्रीयोसिस वगैरेंची लाग होते. त्यामुळे प्रजननअंगामध्ये काही दोष निर्माण होतात. यामुळे माद्यांमध्ये वारंवार उलटणे म्हणजे गर्भधारणा न होणे व परत परत माजावर येणे, वारंवार गर्भपात होणे वगैरे समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत वेळेवर योग्य औषधोपचार न केल्यास मादी वांझ होऊ शकते.

उपाय
ज्या मादीचा गर्भपात झाला तिला उरलेल्या निरोगी माद्यांपासून दूर वेगळ्या गोठ्यात ठेवावे. मादीचे योनीद्वार आणि आजूबाजूचा भाग, मागचा पुढचा भाग, शेपटीच्या बुडापासचा भाग, शेपटी वगैरे भरपूर पाणी ओतून स्वच्छ करावे. नंतर पाण्यात पोटॅशियम परमँगनेटचे काही कण किंवा डेटॉलचे काही थेंब टाकून त्या द्रावणाने धुवावेत म्हणजे जंतूंचा संसर्ग कमी होईल. नंतर मृत गर्भ, त्याची आवरणे, नाळ व इतर द्रवपदार्थ झाडून गोळा करावे आणि खोल खड्ड्यात दफन करून वर कळीचा चुना टाकावा.

निरोगी जनावरास नाळ व गर्भास चाटू देऊ नये. अन्यथा, त्यास संसर्ग होण्याचा संभव असतो. कुत्री, माजरे, कावळे व तत्सम पशुपक्ष्यांना हाकलून लावावे व त्यांना नाळ व इतर आवरणांना तोंड लावू देऊ नये. अन्यथा त्यांच्याद्वारे संसर्ग पसरण्याचा संभव असतो. गोठ्यात जेथे गर्भपात झाला ती जागा भरपूर पाणी ओतून झाडून स्वच्छ करावी. खराब पाणी गटारात जाऊ द्यावे. नंतर फरशीवर फिनाईल पाण्यात मिसळून टाकावे. जर गोठ्यात कच्ची जमीन असेल तर तेथील वरची माती खरडून खोल खड्ड्यात दफन करावी व तेथे कळीचा चुना टाकावा. तेथे काही दिवस दुसर्‍या निरोगी जनावरांना ठेवू नये. शेवटच्या काळात विशेष लक्ष ठेवून काही अडचण आल्यास लगेच तज्ज्ञ पशुवैद्यकास पाचारण करून औषधोपचार करवून घ्यावा. असे केल्यास बर्‍याच समस्यांचे निवारण करता येईल.