पपई पिकावरील ‘मिलीबग’चे नियंत्रण

पपई पिकावर ‘पिठ्या ढेकूण’ (मिलीबग) या किडीचा प्रादूर्भाव दिसून येताच वेळीच या किडीचे सर्वेक्षण करून ती इतरत्र पसरणार नाही, याची दक्षता घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी सामूहिक पद्धतीने उपाययोजना केल्यास नवीन उद्भवणार्‍या किडीच्या प्रादूर्भावास व प्रसारास वेळीच आळा घालता येईल.

‘पिठ्या ढेकूण’ या किडीचा प्रादूर्भाव झालेल्या पपईच्या पानाच्या खालील बाजूस शिरेशेजारी देठावर, फुले तथा फळांवर कापसासारखे पांढरट पुंजके दिसतात. या किडीची मादी पिवळसर रंगाची असून, अंगावर पांढर्‍या तंतूचे मेणचट आवरण असते. मादी आकाराने २.२० मि. मी. लांब व १.४० मि. मी. रुंद असून, शरीराच्या पाठीमागील बाजूस ३ ते ४ पट मोठ्या आकाराची अंड्याची पिशवी मेणचट पदार्थाने आच्छादलेली असते. पिठ्या ढेकणाचे नर कोषापूर्वी व कोषावस्थेत गुलाबी रंगाचे, तर पहिल्या व दुसर्‍या अवस्थेतील पिले पिवळसर रंगाची असतात. त्यांचा आकार लांबट गोलाकार (१ मि. मी. लांब व ०.३ मि. मी. रुंद) व छातीकडील भाग फुगीर असतो. नरास पंख असतात, तर मादीला पंख नसतात. नराच्या ऍन्टीना १० सेगमेंटच्या तर मादीच्या ८ सेगमेंटच्या असतात. मादीने घातलेली अंडी हिरवट, पिवळी व अंड्याच्या पिशवीत मेणचट आवरणाखाली असतात.

जीवनक्रम
मादी एका अंड्याच्या पिशवीत परिस्थितीनुसार १०० ते ६०० पर्यंत अंडी १-२ आठवड्यांत घालते (सरासरी १८६ ते २४४ अंडी/मादी). त्यातून १० दिवसांत पिले बाहेर पडतात. मादी पिले २४ ते २६ दिवसांत चार अवस्था व नर पिले २७ ते ३० दिवसांत कात टाकून पाच अवस्था पूर्ण करतात. मादी लिंग प्रलोभनाद्वारे नरास आकर्षित करतात, तर काही प्रजाती मिलनाशिवाय पिलांना जन्म देतात. कोरडे-उष्ण हवामान किडीच्या वाढीस पोषक असून, त्यांचे प्रजनन वर्षभर चालू असते. या किडीचा प्रसार पहिल्या, दुसर्‍या अवस्थेत तसेच वार्‍यामार्फतही होतो.

खाद्य पिके
या किडीचा प्रादूर्भाव ५५ पिकांपेक्षा जास्त पिकांवर आतापर्यंत आढळून आला. यापैकी पपई, जास्वंद, ऍव्होकॅडो, प्लम, अकॅलिफा, लिंबूवर्गीय फळझाडे, कापूस, टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरी, पानवेल, वालवर्गीय पिके, वाटाणा, रताळी, आंबा, चेरी, डाळिंब, चिकू, अंजीर, तुती, खिरणी, साग, तसेच तणांपैकी गाजर गवत, दुधणी, केणा, चिलटा इत्यादी वनस्पतींवर या किडीचा प्रादूर्भाव आढळून येतो.

नुकसानीचा प्रकार
पिठ्या ढेकणाच्या तोंडाची रचना सोंडेसारखी असून, सुईसारख्या अवयवाद्वारे वनस्पतीतील अन्नरस शोषण केला जातो. या किडीची पिले व मादी पपईची पाने, देठ, कळ्या, फुले, अपक्व तथा पक्व फळातील अन्नरस शोषण करतात. प्रथम सुईसारख्या अवयवाद्वारे तोंडातील विषारी लाळ वनस्पतीच्या पेशीत सोडली जाते आणि नंतर अन्नरस शोषला जातो. ही कीड पानांच्या खालच्या बाजूस शिरेलगत, कळ्या व फळांवर प्रस्थापित होऊन रस शोषतात. किडीच्या अति प्रादूर्भावामुळे पाने पिवळी पडणे (क्लोरोसिस), पानांची गुंडाळी होणे तथा वाकडी होणे, झाडांची वाढ खुटणे, कीडग्रस्त फुले, कळ्या गळून पडणे, फळे आकाराने लहान राहणे, अशी लक्षणे दिसून येतात. पिठ्या ढेकणाच्या माद्या शरीरातून चिकट-गोड पदार्थ बाहेर टाकतात, त्यावर ‘कॅप्नोडियम’ नावाची काळी बुरशी अधिक प्रमाणात वाढते. त्यामुळे झाडाची कर्बग्रहणाची क्रिया मंदावते. अशाप्रकारे काळी पडलेली तथा चिकट झालेली फळे, तसेच त्यावरील पिठ्या ढेकणाच्या पांढरट आवरणामुळे ती खाण्यास अयोग्य होतात. अशा फळांना बाजारात नाकारले जाऊन मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान होते.

कीड व्यवस्थापन व नियंत्रणाचे उपाय
* कीडविरहीत रोपांची लागवड करावी.
* पपई बागेतील तण काढून बाग स्वच्छ ठेवावी.
* पपई बागेजवळ किडीची इतर खाद्य पिके नष्ट करावीत.
* ‘क्रिप्टोलिमस मॉन्ट्रोझिअरी’ व ‘स्कीमनस कॅक्सीव्होरा’ हे भुंगेरे ‘मिलीबग’चे नियंत्रण करताना आढळून आले आहे. नुकतेच या ‘मिलीबग’च्या यशस्वी व्यवस्थापनासाठी ऍसेरोफॅगस पपए, स्युडोलेप्टोमॅस्ट्रिक्स व मेक्सिकाना ऍनागायरस लॉकी हे मित्र किटक अमेरिकेतून आयात करण्यात आले आहेत. त्यापैकी ऍसेरोफॉगस पपए या मित्र किटकांचे चांगले प्रमाण महाराष्ट्रात आढळून आले आहे. त्याचे संगोपन करून प्रयोगशाळेत संवर्धनाचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
* कीडग्रस्त पाने तथा शक्य असल्यास झाडाचे इतर भाग किडीसह काढून नष्ट करावेत.
* किडीचा प्रादूर्भाव कमी असताना वनस्पतीजन्य कीडनाशक निंबोळी तेलाची व फिश ऑईल रोझीन सोप मिसळून फवारणी करावी.
* किडीचा जमिनीवरून प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी खोडाभोवती मातीत मिथिल पॅराथिऑनची भुकटी मिसळावी किंवा बुंध्याभोवती २ मि. लि. क्लोरोपायरीफॉस किंवा ५ मि. लि. थायेमेथॉक्झाम १० लिटर पाण्यात मिसळून १ लिटर द्रावण ओतावे. तसेच शक्य झाल्यास खोडाभोवती चिकटपट्टी गुंडाळावी. त्यामुळे खोडावरून चढणार्‍या पिलांना प्रतिबंध होईल.
* बागेत किडीचा फारच मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव दिसल्यास रासायनिक कीडनाशके, २० मि. लि. क्लोरोपायरीफॉस (२० ईसी), २० मि. लि. डायमिथोएट (३० ईसी), २० मि. लि. प्रोफेनोफॉस (५० ईसी), ६ गॅ्रम थायोमेथॉक्झाम (२५ डब्ल्यू. जी.), २० मि. लि. ब्युप्रोफेझीन (२५ एस. सी.), ६ मि. लि. इमिडॅक्लोप्रीड (१७.८ एस. एल.) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. कीडनाशकाच्या द्रावणात फिश ऑईल रोझीन सोप किंवा उपलब्ध स्टिकर वापरून फवारणी करावी.

असा झाला पिठ्या ढेकणाचा उगम
पपईवरील पिठ्या ढेकूण (मिलीबग) या किडीच्या प्रादूर्भावाची नोंद प्रथम मध्य अमेरिकेतील मेक्सिको प्रांतात सन १९५५ मध्ये झाली. या किडीचे शास्त्रीय नाव ‘पॅराकोकस मार्जीनॅटस्’ असून, ती ‘हेमिप्टेरा’ वर्गातील व ‘स्युडोकॉक्सिडी’ कुळातील आहे. या किडीबाबत सविस्तर विश्‍लेषण १९९२ मध्ये करण्यात आले. या किडीचा उगम मेक्सिकोत १९९२ साली आढळला. भारतात ही कीड प्रथम जुलै २००८ मध्ये तामिळनाडू राज्यात कोईम्बतूर येथे पपईच्या बागेत आढळून आली. त्यानंतर तिचा प्रसार सालेम परिसरात झाला. पुढे ही कीड बंगळुरू येथे मार्च २०१० मध्ये, तर पुण्यात एप्रिल २०१० मध्ये पपई बागेत आढळून आली.

– डॉ. अजित चंदेले, डॉ. भालचंद्र चव्हाण, डॉ. दादासाहेब पोखरकर, डॉ. रमेश नाकट, डॉ. सुभेदार जाधव
किटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर