संत्र्यावरील ‘खैर्‍या’ व ‘डिंक्या’चे नियंत्रण

थंडीच्या प्रकोपामुळे तसेच ‘डिंक्या’ किंवा ‘फायटोप्यारा’मुळे झाडे पिवळे पडणे, डिंक वाहणे अशी लक्षणे संत्रा, मोसंबी पिकात दिसून येत आहेत. शेतकर्‍यांनी यावर वेळीच उपाय करून बागा वाचविण्यास प्राधान्य द्यावे.

कोळी या किडीचा प्रादूर्भाव ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात म्हणजे फळे आवळ्याच्या आकाराची झाल्यानंतर अधिक प्रमाणात होतो. ही कीड अष्टवाद वर्गातील असल्यामुळे भिंगांचा वापर करूनच ही कीड ओळखणे शक्य होते. या कोळी लाल व पिवळसर रंगाच्या असतात. फळावरील पृष्ठभाग खरचडून वर येणारा रस त्या शोषण करतात. अळी फळाच्या सालीत घातक लस सोडतात. परिणामी, फळावर काळा डाग पडतो आणि घातक लसीमुळे फळातील सालीमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत जाऊन काळा डाग वाढत जातो. सध्या हाच प्रकार सर्वत्र संत्रा बागेत आढळून येत आहे. ज्या संत्राबागा दाट स्वरूपात असेल, सूर्यप्रकाश कमी व आर्द्रता जास्त स्वरूपात असेल, त्या संत्राबागेत परिणाम जास्त आढळून येत आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यातही हा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

या किडीची पूर्ण अवस्था तीन आठवड्यांची असते. एका वर्षात किडीच्या अनेक पिढया तयार होतात. कोळी म्हणजेच संत्र्याची काळी साल झालेल्या ‘खैर्‍या’चे व्यवस्थापन करायचे असेल, तर ८० टक्के पाण्यात मिसळणारे २० ते २५ ग्रॅम गंधक, सोबत काळे डाग कमी करण्याकरिता एक किलो २०:२०:२० हे १० लिटर पाण्यात मिसळावे. त्याला वस्त्रगाळ करून ९० लिटर पाणी मिसळून द्रावण तयार करावे. त्यात पाण्यात मिसळणारे २५ ग्रॅम गंधक मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या द्याव्यात. गंधकाऐवजी १५ मि. लि. डायकाफॉल हे कोळीनाशक शेतकरी बांधव वापरू शकतात. २०:२०:२०: च्या फवारणीमुळे ५०० ग्रॅम कॅल्शिअम क्लोराईड सोबत दिले तरी चकाकी वाढण्यास, काळेपणा कमी होण्यास मदत होईल. संत्र्यावरील संपूर्ण डाग जरी कमी झाले नाही तरी वाढीच्या काळात वरील द्रावणामुळे काळे डाग कमी होण्यास मदत होईल.

थंडीच्या प्रकोपामुळे तसेच ‘डिंक्या’ किंवा ‘फायटोप्यारा’मुळे झाडे पिवळे पडणे, डिंक वाहणे अशी लक्षणे संत्रा, मोसंबी पिकात दिसून येत आहेत. त्यासाठी पाण्याचे नियोजन करून दोन झाडांच्या मध्यातून तीन फुटांची एक सरी पाडावी. त्यातच पाणी द्यावे किंवा दुहेरी आळे पद्धतीने पाणी द्यावे किंवा मायक्रोस्प्रिंकलर किंवा दुहेरी आळे किंवा ठिबक पद्धतीने एका दिवसात ८० ते ९० लिटर पाणी द्यावे. डिंक खरडून, जमा करून वाळलेल्या गवतावर जाळून टाकावा. कारण त्यात डिंक्याचे स्पोअर असतात म्हणून डिंक जमिनीवर पडू देऊ नये.

जखमेवर १ टक्का पोटॅशिअम परमॅग्नेटचे द्रावण लावावे. त्यानंतर त्यावर बोर्डो पेस्ट लावावा व नंतर झाडावर २० ग्रॅम रिडोमिल एम. झेड. किंवा एलिएट १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. तसेच झाडाच्या घेराला समांतर एक फूट रिंग तयार करावा. एका झाडाला ४० ग्रॅम रिडोमिल २० लिटर पाण्यात मिसळून रिंगमध्ये टाकावे. झाडाच्या समांतर म्हणजे घेरास समांतर रिंग २ ते ३ दिवस उघडा ठेवून ३० ते ५० किलो शेणखत अधिक ७ किलो निंबोळी ढेप टाकून त्यावर पाणी शिंपडून (१० ते २० लिटर) रिंग बुजवून द्यावा. इतर अन्नद्रव्ये ६०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फूरद, ४०० ग्रॅम पालाशही द्यावे किंवा अमोनिअम सल्फेटद्वारे नत्र म्हणजे २.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २.५ किलो स्फूरद व म्युरेट ऑफ पोटॅश, ५०० किलो पालाश प्रतिझाड दिल्यास फळाची आणि झाडाची सुधारणा होण्यास मदत होते. सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे २०० ग्रॅम जस्त सल्फेट, २५० ग्रॅम बोरॅक्स प्रति झाडाप्रमाणे दिल्यास चांगले परिणाम आढळून आले आहेत.
रिडोमिल शक्य नसल्यास २० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड, १० ग्रॅम बावीस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या घेराला समांतर रिंग करून २० लिटर पाण्यात म्हणजे ४० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड, २० ग्रॅम बावीस्टीन घेऊन द्रावण रिंगमध्ये टाकावे व हेच द्रावण झाडावर फवारावे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे म्हणजे ‘डिंक्या’ कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतकर्‍यांना गोमुत्राचा वापर करावयाचा आहे त्या शेतकर्‍यांनी प्रति झाड ४ ते ५ लिटर गोमुत्र आळ्यात द्यावे व ‘डिंक्या’वरसुद्धा वापरावेे. याबाबत शाश्‍वत उपाययोजना ज्या शेतकर्‍यांनी वापरली असेल अशा शेतकर्‍यांचा सल्ला घेऊन उपाययोजना करावी.

कृषी महाविद्यालय, नागपूर