Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

‘डोंगरची मैना’ ही देते पैका!

करवंद डोंगराळ भागातच येतात, म्हनुन या रानमेव्यास डोंगरची ‘काळी मैना’ म्हटले जाते. डोंगराळ भागातील शेतकरी जवळपासच्या शहरांमध्ये करवंदाची विक्री करतात. करवंदावर प्रक्रिया करून अनेक पदार्थ तयार करता येतात व त्यातून अधिक अर्थार्जन होते. या फळाकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहिले तर एक चांगला उद्योग डोंगराळ भागातील शेतकर्‍यांसाठी उभा राहू शकतो.

डोंगराळ भागातील शेतकर्‍यांनी करवंदाच्या झाडांची व्यापारी तत्त्वावर लागवड केल्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा नवीन पर्याय शेतकर्‍यांना उपलब्ध होऊ शकतो. यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने करवंदांची ‘कोकण बोल्ड’ ही जात विकसित केली आहे. याची फळे मोठी, गोलाकार असून यात गरांचे प्रमाण भरपूर आहे. शिवाय, फळातील बिया मृदू असल्यामुळे कच्च्या व पक्व फळांपासून प्रक्रिया केलेले विविध टिकावू पदार्थ बनवून त्यांचा व्यवसाय करता येईल.

करवंदाचे सरबत
पिकलेली करवंद फळे (१ किलो), फळे निवडून घेणे, स्वच्छ धुऊन घेणे, कुस्करून किंवा पल्परच्या साहाय्याने बिया वेगळ्या करणे, गर मलमलच्या कापडातून गाळून घेणे, रस (६०० मि. लि.), १ लिटर सरबत करण्यासाठी करवंदाचा रस १०० मि. लि., १३० ग्रॅम साखर, २ ग्रॅम सायट्रिक आम्ल व ७७० मि. लि. पाणी वापरावे.

सरबत
सरबत १ महिन्यापर्यंत टिकविण्याकरिता त्यात १०० मि. ग्रॅ. सोडियम बेन्झोएट टाकावे. तयार झालेल्या सरबतास नैसर्गिकपणे आकर्षक असा लालभडक रंग येतो. त्यामुळे असे सरबत ग्राहकांना आकर्षित करून त्यापासून जास्त आर्थिक फायदा मिळू शकतो.

करवंदाची बर्फी
पिकलेली करवंद फळे (१ किलो गर), निवडून घेणे, स्वच्छ धुऊन घेणे, बिया वेगळ्या करणे, मिक्सरमधून गर काढून घेणे (पाणी न टाकता), ओलं खोबरं १०० ग्रॅम, साखर ७५० ग्रॅम, वनस्पती तूप ५० ग्रॅम, चवीप्रमाणे वेलची पूड व मीठ एकत्र करणे, मिश्रणास मंद आचेवर उष्णता देऊन घट्ट करणे, वनस्पतीतूप लावलेल्या ट्रेमध्येमिश्रण ओतून घेणे (१ सेंटिमीटर जाडीचा थर येईपर्यंत एकसारखे पसरावे), मिश्रण थंड झाल्यावर सुरीने काप/वड्या पाडणे, करवंद बफी तयार.

करवंदाची चटणी
पिकलेल्या करवंदांची स्वादिष्ट व रुचकर चटणी करता येते. त्यासाठी करवंद स्वच्छ धुऊन बिया वेगळ्या कराव्यात व त्यात चवीप्रमाणे मीठ, हिरव्या मिरच्या, साखर आणि थोडं ओलं खोबरं टाकून वाटून घ्यावे.
करवंद सुकवणे
गरिबांचा मनुका म्हणून करवंद फळांना ओळखलं जातं. करवंदांना मीठ लावून उन्हात सुकवूनसुद्धा त्याचा खाण्यासाठी वापर करता येतो. याशिवाय, करवंदांपासून जॅम, जेली, वाईन इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थसुद्धा करता येतात.
करवंदाचे लोणचे
अर्धवट पक्व करवंद फळे (१ किलो), निवडून घेणे, स्वच्छ धुऊन घेणे, कोरडी करणे, चवीप्रमाणे मोहरी दाळ, हळद पावडर, लाल तिखट, काळी मिरी, लवंग, मीठ एकत्रित करून थोड्या तेलात परतून मसाला तयार करणे, करवंद फळात मसाला एकत्रित करून बाटलीत भरणे, तेल गरम करून थंड झाल्यावर त्यात ओतणे (करवंद फळे मिश्रणात बुडून राहतील इतपत)

करवंद लोणचे
करवंद लोणचे साधारणपणे ८-१० दिवसांत मुरून खाण्यास तयार होते. सध्या घरोघरी आंबा लोणचे केले जाते त्याच पद्धतीने करवंदाचे लोणचे तयार होते. अर्धवट पक्व करवंदाची चव मुळातच आंबट गोड असल्याने करवंद लोणचे स्वादिष्ट लागते.

अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Exit mobile version