पेरणीच्या आधी जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. अगोदरच्या पिकाचे अवशेष, धसकटे, दगड-गोटे गोळा करून घ्यावेत. जमीन चढ-उताराची असल्यास तिचे सपाटीकरण करून घ्यावे. पिकाच्या गरजेनुसार २ ते ३ वेळा कुळवणी करून घ्यावी. शेवटच्या कुळवणीअगोदर शेणखत किंवा कंपोस्ट खत पिकाच्या शिफारशीनुसार द्यावे.
१. पाणी नियोजन :
खरीप हंगामातील पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. गरजेनुसार व नियमित पाऊस पडेल याची खात्री नसते, त्यामुळे वेळीच पाण्याचे नियोजन करावे. जमिनीचा प्रकार, पिकाच्या जाती, पिकाची अवस्था या बाबींचा विचार करुनच पिकांना पाणी द्यावे. गरेजनुसार ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. पिकांची वाढ जोमदार होण्यास व तणनियंत्रणात राहण्यासाठी त्याचा फायदा होतो.
क्षारयुक्त पाणी पिकास देणे टाळावे. पाणी साचू नये यासाठी शेतीच्या बाजुने चर खोदून निचरा करावा.
२. लागवड पद्धत :
रोपवाटिका तयार करताना सारा किंवा गादी वाफ्यावरच करावीत. त्यामुळे रोपांची वाढ जोमदार होते. अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. रोपवाटिकेत तणांचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी. लागवडीस योग्य वाढ झाल्यानंतरच रोपांची लागवड करावी. जास्त कोवळी किंवा जास्त वय झालेली रोपे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम करतात.
पेरणी शक्यतो बियाणे हाताने टोचून किंवा ओळीमध्ये करावी. त्यामुळे आंतरमशागत करणे सोपे जाते. जर बियाणे हाताने विसकटून दिले, तर ते जास्त लागते. आंतरमशागत करण्यासही अडचणी येतात. उत्पादन कमी येते, पिकांचा दर्जा घसरतो.
पेरणी करताना पिकाचा प्रकार, जमीन, पाण्याची उपलब्धता बघूनच पेरणीची पद्धत निवडावी.
पीक व तण यांच्यात पहिल्या २०-३० दिवसात हवा, पाणी, जागा, अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा होते. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होते. उत्पादनात तसेच त्याच्या दर्जातही घट होते. त्यामुळे वेळेवर एकात्मिक पद्धतीने तण नियंत्रण करावे.
३. बियाणे :
बियाणे खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. पक्क्या पावतीवर पीक, जात, लॉट क्रमांक, बियाणे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करून घ्यावी. बियाण्याची पिशवी नेहमी खालील बाजूने फोडावी. टॅग असलेली बाजू सुरक्षित ठेवावी. बियाण्याचा थोडा नमुना पिशवीमध्ये राखून ठेवावा.
शिफारशीनुसारच पेरणीपुर्वी बीजप्रक्रिया करावी. कीडनाशकाच्या प्रक्रियेनंतरच जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
-प्रा. सचिन तेलंगे पाटील, कृषी महाविद्यालय, बारामती