शेती आणि गावे आत्मनिर्भर भारताच्या केंद्रस्थानी

शेतीला फायदेशीर बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा पोत विचारात घेऊन विविध प्रकारच्या पिकांची लागवड करावी, असे आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केले आहे. त्यांनी देशातील शेतकऱ्यांना उद्देशून एक पत्र लिहिले असून त्यामध्ये शेतकऱ्यांना विविध सूचना केल्या आहेत. देशाच्या बहुतेक भागात मान्सून सक्रिय झाला असल्याने, बऱ्याच भागात पिकांच्या पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत आणि इतर भागात ही कामे सुरू आहेत असे त्यांनी सांगितले. उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करावा, यासाठी आपण शेतकऱ्यांशी संपर्क साधत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

लॉकडाऊनच्या खडतर काळात देशातील उद्योग आणि व्यवसायांवर विपरित परिणाम होऊन ही देशातील शेतकऱ्यांनी जबाबदारीने आणि समर्पित वृत्तीने आपली शेतीची कामे पूर्ण केल्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश अतिशय प्रभावी पद्धतीने गेले तीन महिने कोरोना विषाणूच्या आपत्तीला तोंड देत आहे, असे ते म्हणाले. रब्बी पिकांची कापणी आणि विक्रीची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करण्यात आली. कृषी उत्पादन देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनला असल्याचे त्यांनी सांगितले.

तोमर यांनी त्यांच्या पत्रामध्ये शेतकऱ्यांना अनेक चांगल्या कृषी पद्धतींची माहिती दिली आहे. यामध्ये खरीप हंगामातील प्रमुख उत्पादन असलेल्या भाताच्या पिकाच्या लागवडीच्या उत्तम पद्धती, तणांवर नियंत्रण, जैविक कीटकनाशकांचा वापर, सेंद्रीय खते आणि गांडूळखताचा वापर, लावणीसाठी रिज अँड फरो पद्धती, ऱ्हायझोबियम जीवाणूने डाळींच्या बियाण्यांवर प्रक्रिया, नायट्रोजनयुक्त खतांचा पोटॅश आणि फॉस्फोरससह मृदा आरोग्य पत्रिकेला अनुसरून वापर आणि सिंचनाच्या सर्वोत्तम पद्धती त्यांनी सुचवल्या आहेत.

या पत्रात तोमर यांनी देशातील विविध भागांच्या गरजा स्वतःहून अतिशय तपशीलवार विचारात घेतल्या आहेत. या सर्वांचा एकत्रित विचार करून त्याचा सारांश लक्षात घेतला तर पीक व्यवस्थापनाच्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब केला तर शेती उत्पादनात अनेक पटींनी वाढ होऊ शकते असे तोमर यांचे म्हणणे आहे. यासाठी पूर्वतयारीची, योग्य निर्णयाची आणि आपल्या शेतात त्यांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या जय जवान, जय किसान, जय विज्ञान या घोषणेचा उल्लेख करत तोमर यांनी पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर किंवा स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शेती आणि गावांना केंद्रस्थानी ठेवण्याच्या दृष्टीकोनावर भर दिला आहे. आपण भरघोस खरीप पीक येईल याची काळजी घेतली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खांद्यावर कृषी उत्पादनात वाढ  करण्याची अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. केवळ स्वतःच्या कल्याणासाठी नव्हे तर संपूर्ण देशाच्या कल्याणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे, असे त्यांनी नमूद केले.