“लाल्या’ विकृतीची लक्षणे म्हणजे कपाशीची सुरुवातीची पाने टोकाकडून व कडेने पिवळसर पडण्यास सुरवात होणे हे होय. हरितद्रव्यामुळे पाने हिरवी असतात, जर या हरीतद्रव्याचे प्रमाण दोन टक्क्यापेक्षा कमी झालेत तर प्रत्येक पानामधील लाल रंगाचे कण एकवटतात त्यामुळे पाने लाल रंगाची दिसू लागतात. याला “ऍन्थोसायनीन पिग्मेंट’ म्हणतात; पण काही कारणास्तव हरितद्रव्य कमी झाले, की पाने लाल दिसू लागतात. लाल झालेली पाने शेवटी गळून पडतात व झाडे वाळू लागतात. बीटी कपाशीला नॉन बीटी कपाशीपेक्षा नत्र व इतर सर्व अन्नद्रव्यांची मात्रा जवळपास सव्वा ते दिडपट लागते.
जर बीटी कपाशीला पूर्ण अन्नद्रव्य मिळाले नाही तर बीटी वाणावर लाल्याची विकृती दिसून येते. विशेष म्हणजे बीटी वाणाला पाते ते बोंड भरण्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्यांची गरज असते. त्यामुळे बीटी कपाशीमधे अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करणे फार महत्त्वाचे आहे. म्हणून कपाशीचे उत्पादन कमी येण्याच्या कारणामध्ये लाल्या हे एक महत्त्वाचे कारण आहे. यासाठी कपाशीवरील लाल्याची उपाययोजना त्वरित करणे आवश्यक आहे.
लाल्या दिसण्याची संभाव्य कारणे –
1. सतत एकाच शेतात पुन्हा कपाशीची लागवड करणे
2. जास्त अन्नद्रव्यांची गरज असणाऱ्या पिकानंतर उदा. ऊस, केळी घेतल्यानंतर त्या शेतात कपाशीचे पीक घेतल्यास त्यास आवश्यक प्रमाणात अन्नद्रव्ये मिळत नाहीत.
3. हलक्यात जमिनीत कपाशीची लागवड केल्यास लाल्याची लक्षणे लवकर दिसतात.
4. जर जमिनीत पाणी साचून राहिल्यास किंवा पाण्याचा जास्त काळ ताण पडल्यास झाडे जमिनीतील नत्र, मॅग्नेशिअम व जस्तासारखी आवश्य्क मूलद्रव्ये व्यवस्थितरीत्या शोषून घेऊ शकत नाहीत, त्यामुळे “लाल्या’ची लक्षणे दिसतात.
5. जमिनीतील उपलब्ध होणाऱ्या प्राणवायूवर झाडांच्या मुळांची वाढ व अन्नद्रव्यांचे शोषण अवलंबून असते. जास्त पाणी साचल्यास भारी जमिनीत झाडांची मुळं सडतात. त्याचप्रमाणे पाने लागण्याची अवस्था ते बोंड अवस्थेमध्ये जास्त पाऊस पडल्यास पाणी साचते. त्यामुळे जमिनीत प्राणवायूचे प्रमाण कमी होते, पिकाला अन्नद्रव्ये मिळत नाहीत, त्यामुळे पाने लाल होण्यास सुरवात होते.
6. बोंडे धरण्याच्या अवस्थेत प्रामुख्याने पानामध्ये नत्राची जास्त गरज असते. या काळात बोंडाना आवश्यक तेवढा नत्र न मिळाल्यास ते पानांमधून नत्र शोषून घेतात त्यामुळे पानामधील नत्राचे प्रमाण 2 टक्या्या पेक्षा कमी होते व पाने लाल होतात.
7. नत्राची मात्रा विभागून न दिल्यास लाल्याची विकृती दिसते.
8. बीटी जनुकामुळे कपाशीच्या बोंडाचे बोंड अळ्यांपासून संरक्षण होते. परिणामी, झाडावर जास्त बोंडे टिकून राहतात. या बोंडांना पोषणासाठी जास्त नत्राची गरज असते. नत्राचे प्रमाण कमी होऊन ती लाल पडू लागतात.
9. बीटी कपाशीमध्ये पिकाच्या शेवटच्या अवस्थेत जास्त वेगाने वारे वाहत असल्यास पिकाच्या कालावधी काही प्रमाणात कमी होतो, त्यामुळेसुद्धा पाने लाल पडतात.
10. वाफसाच्या म्हणजे ऑक्टोोबर व त्यापुढील महिन्यात तापमान अचानक कमी झाल्यास (21 अंश से.पेक्षा) किंवा रात्रीचे तापमान 15 अंश से.पेक्षा कमी झाल्यास तेव्हांसुद्धा ऍन्थोसायनीन नावाचे लाल रंगाचे द्रव्य पानात जमा होते, त्यामुळे पाने लाल दिसू लागतात.
11. कपाशीवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास पान सुरवातीस कडेने लाल पडून नंतर संपूर्ण पानच लालसर दिसते
12. तुडतुड्यांशिवाय फुलकिडे व लाल कोळी यांच्या प्रादुर्भावामुळेही काही प्रमाणात पाने लालसर दिसतात.
“लाल्या’मुळे कपाशीमध्ये होणाऱ्या शारीरिक क्रियेतील व रासायनिक बदल –
I. पानांमधील प्रकाश संश्लेयषण क्रियेचा वेग कमी होतो त्यामुळे पानांतील हरितद्रव्य कमी होते
II. पानांचा श्वेसन क्रियेचा वेग कमी होतो.
III. मुळामधील साखर कमी होते व कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढते.
IV. मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते तसेच पानांमधील ऍन्थोसायनीनचे प्रमाण वाढते.
V. कर्ब – नत्राचे प्रमाण वाढते.
VI. पानामध्ये टॅनिनचे प्रमाण वाढते.
लाल्यावरील उपाययोजना
1. जमिनीतील जास्त पाणी साचल्यास त्वरित चर काढून ते पाणी शेताबाहेर काढून द्यावे व वाफसा येताच डवरणी करावी कारण अशा परिस्थितीत डवरणी केल्यास मुलाभोवती हवा खेळती राहते
2. कपाशीचे हलक्यार जमिनीत पीक घेऊ नये, कपाशीसाठी योग्य जमिनीची निवड करावी
3. पाणी साचणाऱ्या जमिनीमध्ये कपाशी घेणे टाळावे, तसेच पाण्याचा निचरा कमी होणाऱ्या जमिनीत सुद्धा हे पिक घेऊ नये
4. रासायनिक खताची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी. नत्राची मात्रा कोरडवाहूसाठी दोन वेळा आणि बागायतीसाठी तीन वेळा विभागून देणे अतिशय आवश्यणक आहे. जमिनीतून 10 ते 12 किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रति एकरी द्यावे.
5. कपाशीमधील पाते लागणे, बोंडे भरणे आदींसारख्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेत दोन ते तीन वेळेस दोन टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी करावी.
6. काही प्रमाणात “लाल्या’ची लक्षणे दिसताच 200 ग्रम युरीया व 100 ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून शिफारशीनुसार दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
7. रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव: तुडतुडे, मावा, पांढरी माशी पानांतील अन्नरस शोषून घेतात, त्यामुळे पाने लाल दिसतात. या किडींच्या नियंत्रणासाठी योग्य औषध निवडून लवकर फवारणी करावी
डॉ. जीवन रामभाऊ कतोरे
विषय विशेषज्ञ (कृषी विद्या),
कृषि विज्ञान केंद्र, अकोला