शेतकरी बांधवांनो, पाणी बचतीच्या या बाबींचा अवश्य अवलंब करा…

भारतासारख्या शेतीप्रधान देशात पाण्याची ही कमतरता एखाद्या बॉम्बप्रमाणे अर्थकारणावर परिणाम करू शकते. येणार्‍या पावसाचे पाणी अडवले गेले नाही, जमिनीतल्या पाण्याचे पुनर्भरण केले गेले नाही, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि संपूर्ण कार्यक्षमतेने वापर केला गेला नाही तर आपली अन्नसुरक्षा आणि पिण्याच्या पाण्याची गरज नक्कीच धोक्यात येईल. या धोक्याची तीव्रता कमी करण्यासाठी प्रत्येक शेतकर्‍याने आपापल्या परीने उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर, पावसाच्या पाण्याने जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण आणि वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर या गोष्टी अत्यंत काटेकोरपणे पाळण्याची वेळ आली आहे.

वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वापरल्या जाणार्‍या सिंचनाच्या पद्धती भिन्न असतात. त्यामध्ये त्या प्रदेशांचा इतिहास, संस्कृती, पर्यावरण, आर्थिक स्थिती आणि शेती करण्याच्या पद्धतींचा ठसा बर्‍याच प्रमाणात उमटलेला असतो. जरी सिंचनाचे काही पाणी जमिनीतील शोषणाद्वारे स्थानिक भूजलसाठ्यात मिसळत असले तरी बरेचसे पाणी पिकांच्या वाढीसाठी आणि त्याद्वारे होणार्‍या बाष्पोत्सर्जनातून स्थानिक जलचक्राच्या बाहेर पडते. त्यामुळे पिकांद्वारे वाढीसाठी वापरल्या गेलेल्या पाण्याचा हिस्सा नेमका त्यापासून मिळणार्‍या उत्पादनासाठीच वापरला जाणे आणि पिकांमधून होणारे बाष्पोत्सर्जन कमीत कमी करणे हे पाणी बचतीचे दोन उद्देश प्राधान्याने डोळ्यांसमोर ठेवणे आवश्यक आहे. पाण्याची काटकसर करताना आणि सिंचनाची कार्यक्षमता वाढवताना सध्या उपलब्ध असलेल्या ठिबक सिंचनाच्या पद्धतीला बागायती पिकांसाठी सध्या तरी दुसरा पर्याय नाही. सर्व प्रकारच्या फळबागा, कापूस-उसासारखी नगदी पिके, भाजीपाल्याची आणि फुलांची पिके घेणार्‍या शेतकर्‍यांनी सिंचनासाठी ही पद्धत अवलंबलीच पाहिजे. तुलना करायची झाल्यास सरीने पाणी दिल्यास कार्यक्षमता पन्नास-पंचावन्न टक्के मिळते, तर ठिबक सिंचनाने कार्यक्षमता ८५-९५ टक्क्यांपर्यंत मिळू शकते. यामधला मार्ग गहू, हरभरा, भुईमुगासारख्या पिकांसाठी तुषार सिंचनाच्या स्वरूपात वापरता येतो. ठिबक सिंचन प्रणालीतही कमी पाणी फेकणारे ठिबक आणि काही ठराविक दाबालाच कार्य चालू करणार्‍या नळ्या तसेच जमिनीच्या खाली बसवल्या जाणार्‍या नळ्या किंवा सच्छिद्र पाईप वापरल्यास अजूनही काही प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते आणि सिंचन कार्यक्षमतेने होऊन पीक उत्पादन वाढण्यास मदत होते.

१.जमिनीची मशागत
जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी असेल तर पाण्याच्या ताणामुळे त्या लवकर भेगाळतात. जमिनी भेगाळल्या की, त्यात खोलवर असलेले पाणीही वाफ होऊन उडून जाते आणि पिकांना दिलेले पाणी भेगांत शिरून खोलवर जाऊन बसते. असे पाणी पिकांच्या उपयोगी पडत नाही. भेगा पडलेल्या जमिनीवर कोळपणी, निंदणी करून मशागत केली आणि जमीन झाकण्यासाठी सेंद्रिय आच्छादनाचा वापर केला तर भेगा बुजल्या जाऊन सिंचनाची कार्यक्षमता वाढते आणि पाण्याची बचत होते. सेंद्रिय आच्छादनासाठी खुरपलेले गवत, तण, उसाचे पाचट, धान्य मळणी केल्यानंतर उरलेला भुसा, झाडांचा पालापाचोळा इत्यादी शेतकचर्‍याचा वापर करता येतो.

२.पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिके निवडा
पाणी वाचवण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रमाणावरून पिकांची निवड करणेही आवश्यक आहे. उदा. मक्याच्या पिकाला एकरी ५.५ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते तर त्याच्या निम्म्या पाण्यात सूर्यफुलाचे पीक येऊ शकते. आपल्याकडे घेतली जाणारी ऊस, केळी अशांसारखी पिकेही प्रचंड प्रमाणात पाण्याची मागणी करतात. पाण्याची बचत करायची असेल तर अशा जास्त पाणी लागणार्‍या पिकांपेक्षा कमी पाणी लागणारी पिके लावणे आणि त्यांचीही दुष्काळी परिस्थितीत तग धरून ठेवणारी वाणे वापरणे हाच उपाय शिल्लक राहतो. अशा वाणांवर काम करण्यास अनेक बिजोत्पादन कंपन्यांनी सुरुवात केली आहे. पाणी ही कुठल्याही पिकाची अत्यावश्यक गरज आहे; पण वनस्पतीच्या प्रकारावरून काही पिकांना जास्त तर काही पिकांना कमी पाणी लागते. सर्वसाधारणपणे वनस्पतीच्या अंगात १ ग्रॅम सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होण्यासाठी मुळांद्वारे जमिनीतून ५०० ग्रॅम पाणी शोषले जाते. हे पाणी मुळांपासून पानांपर्यंत पोहोचून त्यातला फक्त दोन टक्क्यांपर्यंतचाच भाग पेशींमध्ये राखला जातो आणि उरलेले पाणी वाफेच्या स्वरूपात परत वातावरणात सोडले जाते. जमिनीतून पाणी शोषणे आणि सेंद्रिय पदार्थांची निर्मिती म्हणजेच पिकांच्या बाबतीत उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग या गोष्टीची कार्यक्षमता ठरताना पीक वनस्पतीच्या पानांचे एकूण क्षेत्रफळ, मुळांचा प्रकार आणि संख्या, खोडातील पाणी वहन क्षमता, पानांवरील पर्णरंध्रांची संख्या, पानांची प्रकाश ऊर्जा आणि हवेतील कार्बन वायू खेचून घेण्याची क्षमता इत्यादी घटक महत्त्वाचे असतात. पानांचे एकूण क्षेत्रफळ, खोलवर जाणारी किंवा उथळ असलेली मुळे यावरूनही कुठल्या पिकाला कमी पाणी लागेल हे ढोबळमानाने ठरवता येते.

३.मोकळे पाणी देण्याच्या पद्धतीत सुधारणा
बर्‍याच शेतकर्‍यांनी अजूनही सिंचनाच्या आधुनिक सुविधा स्वीकारल्या नसल्याने पिकांना मोकाट पाणी देण्याची पद्धत सर्रास अवलंबली जाते. जमीन हलकी असेल तर पिकांना सारख्या पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. अशा वेळेस मुख्य पाईपला एक बायपास काढून त्यात व्हॉल्वद्वारे थोड्या-थोड्या वेळाने पाणी सोडले की, मुख्य धारेत अडथळे येऊन पाणी मोठ्या पृष्ठभागावर एकसारखे लवकर पसरण्यास मदत होते. या पद्धतीने पाण्याने माती वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच जमिनीत कमी पाणी मुरून पाण्याची बचत होते. सध्या उभ्या गव्हाच्या आणि हरभर्‍याच्या पिकांना ही पद्धत अमलात आणता येईल. भाजीपाल्याच्या पिकांसाठी सरी-वरंबा पद्धत वापरली असेल तर सुरुवातीच्या एक-दोन पाण्यानंतर नंतरचे पाणी फक्त एक आड एक सरीत जरी सोडले तरी पुरेसे होते.

४.पाण्याचे बाष्पीभवन कमी करणे
शेततळ्यातील पाण्याची उष्णतेने वाफ होऊन पाणी कमी होते. पाण्याच्या पृष्ठभागावर पसरणारी काही रसायने बाजारात उपलब्ध आहेत. अशा रसायनांचा तवंग पाण्यावर साठलेला राहून पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यास मदत करतो. अशा प्रकारची साधने वापरताना पाण्याचा दर्जा खालावणार नाही आणि सिंचन प्रणालीत अडथळे येणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. शेततळ्यावर पन्नास टक्के ते नव्वद टक्के क्षमतेची शेडनेट एक ते दीड मीटर उंचीवर आच्छादूनही पाण्याचे बाष्पीभवन बर्‍याच प्रमाणात रोखता येते. अशा प्रकारे सावली केल्याने शेततळ्यात शेवाळ्याची वाढही होत नाही.

५.तुषार सिंचन पद्धतीचा वापर
तुषार सिंचनाचा संच उपलब्ध असल्यास हरभरा, गहू, कांदा, लसूण अशा पिकांसाठी त्याचा जरूर वापर करावा. यामुळे सिंचनाची कार्यक्षमता वाढून पाण्याची बचतही होते. फळझाडांसाठी छोटी स्प्रिंकलर्स वापरल्यास ठिबकपेक्षा जास्त जमीन भिजू शकते.

६.ठिबक सिंचनाचा वापर
पाण्याची बचत करणारी आणि सिंचनाची कार्यक्षमता वाढवणारी सर्वात चांगली सिंचनप्रणाली कोणती असे विचारले तर ठिबक सिंचन प्रणालीचाच उल्लेख करावा लागेल; पण पाईपलाईनमधील गळती, फिल्टरमध्ये अडकलेला कचरा, गरजेपेक्षा जास्त दाब आणि पाणी देण्याचे अनियंत्रित वेळापत्रक यांमुळे अशी चांगली प्रणाली उपलब्ध असूनही पाण्याची नासाडी होण्याची शक्यता असते. अगदी आणीबाणीच्या परिस्थितीत भाजीपाल्याची पिके आणि फळपिके यांच्यामध्ये तापमानाच्या चढ-उतारानुसार पाण्याच्या मागणीत होणारे बदल, पिकांची पाण्याची ताण सहन करण्याची क्षमता आणि जमिनीतील ओलावा यांचा अभ्यास करून ठिबक संचाद्वारे देण्यात येणार्‍या पाण्याची वीस टक्क्यांपर्यंत कपात करता येते. अशा प्रकारच्या तुटीच्या सिंचनाद्वारे सद्यःस्थितीत डाळिंब, आंबा, मोसंबीसारखी पिके दहा टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी देतील; पण दुष्काळी परिस्थितीत तग धरून राहतील. कमी पाणी उपलब्ध असताना ‘पिकाचे मूळ क्षेत्र दिवसआड पक्षपातीपणाने भिजवणे’ ही एक नवीनच पद्धत आता अमलात आणली जाऊ लागली आहे. ठिबक सिंचनाद्वारे संध्याकाळच्या थंड वेळेत उघड्यावरील भाजी आणि फळपिकांना पाणी दिले तर सिंचनाची कार्यक्षमता वाढू शकते आणि पाण्याच्या पाळ्या कमी होऊन पाण्याची बचत होऊ शकते.

७.जमिनीवर आच्छादनाचा वापर
उपलब्ध पाण्याची बचत करण्यासाठी शेतजमिनीवर आच्छादनाचा वापर करणे हा एक सोपा उपाय आहे. उघड्या जमिनीवर पिकांना दिलेले पाणी काही प्रमाणात जमिनीत मुरते आणि काही प्रमाणात उष्णतेने वाफ होऊन वातावरणात उडून जाते. जमीन हलकी असेल तर या दोन्ही घटनांच्या शक्यता जास्त असतात. अशा परिस्थितीत पीक लवकर ताणावर येऊन उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. या गोष्टीवर मात करण्यासाठी पाण्याच्या पाळ्या वाढवाव्या लागतात आणि त्यासाठी जास्त पाण्याची गरज भासते. फळपिके किंवा सरी-गादी वाफ्यांवर लावलेल्या भाजीपाला पिकांच्या भोवतीची जमीन शेतातील काडीकचर्‍याने किंवा बाजारात उपलब्ध पातळ प्लॅस्टिकच्या कागदाने झाकली तर जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि पाण्याच्या पाळ्या कमी द्याव्या लागून पाण्याची बचत होते. पीक लावलेल्या जागेपासून पाण्याचा स्रोत लांब असेल आणि दांडाने पाणी पिकापर्यंत आणण्याची पद्धत रूढ असेल तर दांडामध्ये प्लॅस्टिक कागदाच्या आच्छादनाचा वापर करावा किंवा गुंडाळी पाईप वापरून पीक जमिनीपर्यंत पाणी पोहोचवावे. यामुळे दांडातून पाणी वाहत जात असताना जमिनीत मुरून होणारी त्यातील तूट कमी करता येते.

८.पाण्याचे पुनर्भरण
‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ अशासारख्या मोहिमा काही वर्षांपासून आपल्याकडे चालू झाल्याने भूजलाचे पुनर्भरण म्हणजे काय, याची थोडीफार कल्पना शेतकर्‍यांनाही आता येऊ लागली आहे. ज्या ठिकाणी नद्या, धरणे, तळी असे जलसाठे नाहीत अशा ठिकाणी विहिरीतून किंवा बोअरमधून मिळणार्‍या भूजलावरच पिकांचे सिंचन अवलंबून असते. अशा भूजल साठ्यांमधून सतत उपसा केला गेल्यास जमिनीतील पाण्याची पातळी खाली-खाली जाते आणि परिसरातील पाणथळ जागा किंवा नद्याही आटू लागतात. सद्यःस्थितीत सगळीकडे ही परिस्थिती आपण अनुभवतो आहोत. जमिनीतील पाण्याचे प्रमाण कमी झाले की, त्यातील क्षारांचे प्रमाण वाढते आणि अशा पाण्याची विद्युतवाहकता जास्त राहून पिकांसाठी ते निरुपयोगी ठरू शकते. पाण्याची पातळी खाली गेल्याने पिकांना दिलेल्या पाण्याचा निचराही लवकर होतो आणि त्यांना वारंवार पाणी देण्याची पाळी येते. आपल्या शेतीचे क्षेत्र, त्यातील चढ-उतार बघून शेतात अथवा जवळून वाहणार्‍या ओढ्या-नाल्यांवर छोटे बंधारे बांधून पावसाच्या जोराने वाहणार्‍या पाण्याचा प्रवाह कमी कसा करता येईल, याचा विचार करून शक्य त्या पाणी जिरवण्याच्या योजना अमलात आणल्या तर भूजलाचे संवर्धन करण्यात आपलाही हातभार लागेल. शेततळी केलेली असतील तर त्यांचा उपयोग भूजल उपसून साठवणूक करण्यापेक्षा पावसाचेच पाणी साठवण्यासाठी करावा. हरितगृहे असतील तर त्यांच्या छतावर पडणारे पाणी एकत्र करून शेततळ्यात साठवावे किंवा विहिरी-बोअरमध्ये सोडावे. पावसाचे जमा केलेले पाणी हरितगृहातील पिकांसाठी उत्तम समजले जाते. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी युरोपसारख्या पन्हाळी पत्र्यांच्या बंदिस्त टाक्या आपल्याकडेही उभारून देणार्‍या कंपन्या आहेत. शेततळ्यांऐवजी अशा पर्यायांचा विचार करावा. पडिक जमिनीवर वनीकरण करूनही पाणी जमिनीत मुरवण्यास मदत होऊ शकते.

९.पाण्याचा पुनर्वापर
शेतीसाठी किंवा इतर कामांसाठी वापरलेल्या पाण्याचा शेतीसाठीचा पुनर्वापर हा पाण्यासारख्या किमती आणि दुर्मिळ होत चाललेल्या संसाधनाच्या बचतीचा शाश्‍वत पर्याय आहे. वनशेती किंवा जैवइंधनाच्या पिकांची शेती यासाठी तर हा पर्यायच वापरला गेला पाहिजे, असा विचार आता पुढे येतो आहे, तर खाद्य पिकांच्या उपयोगासाठी, मानवी आरोग्याचा विचार करता हा पर्याय वापरावा की नाही, याबद्दल साशंकता आहे. डेन्मार्कच्या ‘ग्रून्डफॉस बायोबूस्टर’सारख्या कंपन्यांनी केलेल्या संशोधनांवरून आणि निर्माण केलेल्या साधनांवरून मानवी सांडपाणीही थोड्या प्रक्रिया करून भाजीपाल्यासारखी पिके घेण्याच्या योग्यतेचे करून दाखवले आहे. अशा प्रकारच्या शक्यतांवर जास्त संशोधन झाल्यास आपल्याकडील विशेषतः मोठ्या शहरांच्या आसपासच्या शेतकर्‍यांची पाणी समस्या कायमची मिटण्यास हातभारच लागेल. हरितगृहांतही ‘मातीशिवाय शेती’ची कल्पना अमलात आणल्यास वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर सहजतेने करता येतो आणि या प्रकारच्या प्रणाली बर्‍याच ठिकाणी सर्रास वापरल्या जातात. या पद्धतीत पाण्याची आणि खतांची बचत असा दुहेरी फायदा असतो