सुरू ऊस
सुरू उसाच्या लागवडीकरिता को-८६०३२ (निरा), को-९४०१२ (सावित्री), को. एम. ०२६५ (फुले-२६५) या जातींचे १० ते ११ महिने वाढीचे चांगले जाड, रसरशीत डोळे फुगलेले बेणे निवडावे. सुरू उसाची लागवड कोरड्या पद्धतीने केल्यास चांगली होते. ओली लागवड करावयाची असल्यास दोन डोळ्यांची टिपरी दोन टिपरीमधील अंतर १५-२० सें. मी. ठेवून मांडावीत. नंतर सरीत पाणी सोडून डोळे बाजूला येतील, अशा पद्धतीने पाण्यात दाबावीत. लागवडीपूर्वी प्रतिहेक्टर बेण्यासाठी १०० ग्रॅम बाविस्टीन अधिक ३०० मि. लि. मॅलॅथिऑन अधिक १०० लिटर पाणी या द्रावणात १० मिनिटांसाठी बेणे प्रक्रिया केल्यानंतर १० किलो ऍसिटोबॅक्टर जिवाणू अधिक १०० लिटर पाणी या द्रावणात वरील बेणे ३० मिनिटे बुडवून लागवड करावी. त्यामुळे उसासाठीच्या नत्र खताच्या मात्रेमध्ये ५० टक्के बचत होते. लागवडीच्या वेळी प्रतिहेक्टर २५ किलो नत्र (५४ किलो युरिया) अधिक ६० किलो स्फूरद (३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) अधिक ६० किलो पालाश (१०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे.
हरभरा
हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादूर्भाव आढळून आल्यास २५ मि. लि. क्लोरोपायरीफॉस (२५ टक्के प्रवाही) किंवा २५ मि. लि. प्रोफेनोफॉस (४० टक्के प्रवाही) प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
कांदा
कांदा पिकावरील करपा व फूलकिडे नियंत्रणासाठी २५ ग्रॅम क्लोरोथॅलोनील किंवा २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम अधिक १० मि. लि. कार्बोसल्फान किंवा ५ मि. लि. डेल्टामेथ्रीन किंवा १५ मि. लि. फिप्रोनील अधिक १० मि. लि. स्टिकर प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
वाटाणा
वाटाणा पिकावरील मावा या रस शोषणार्या किडींचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात दिसून आल्यास ४ मि. लि. कॉन्फीडार प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. भुरी रोगाची लक्षणे दिसताच २५ ग्रॅम गंधक किंवा १० मि. लि. डिनोकॅप १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भेंडी
भेंडी पिकावरील फळे पोखरणार्या अळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ४ टक्के किंवा १० मि. लि. प्रोफेनॉफॉस किंवा ५ मि. लि. डेल्टामेथ्रीन प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
वांगी
वांगी पिकावरील फळे पोखरणार्या अळीच्या नियंत्रणासाठी २० मि. लि. प्रोफोनोफॉस किंवा ३ ते ४ मि. लि. स्पिनोसॅड किंवा १० मि. लि. इंडोक्झाकार्ब प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
रब्बी ज्वारी
ज्वारीवरील माव्याच्या व चिकट्याच्या नियंत्रणासाठी ५०० मि. लि. डायमेथोएट (३४ टक्के) किंवा ४०० मि. लि. मिथिलडिमेटॉन (२५ टक्के) ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रतिहेक्टर याप्रमाणे फवारणी करावी.
गहू पिकात करावयाची कामे
पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन व गहू पिकात कमी पाण्यातही तग धरण्याची प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी, यासाठी वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकावर २ टक्के (१० किलो ५०० लिटर पाण्यातून प्रतिहेक्टर क्षेत्रावर) युरियाची फवारणी करावी. उशिरा पेरणी केलेल्या गव्हामध्ये तण नियंत्रणासाठी खुरपणी करून पहिले पाणी देण्याअगोदर युरिया खताचा दुसरा हप्ता (१२५ किलो युरिया प्रतिहेक्टर) द्यावा.
कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक