ऊस हे महराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पिक आहे. या पिकामुळे महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होण्यास मदत झाली आहे. राज्यातील एकूण उसाखालील क्षेत्रापैकी ४० ते ४५% खोडव्याचे क्षेत्र असूनही एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा मात्र ३० ते ३५% इतकाच आहे.
खोडवा पिक घेताना विचारात घ्यावयाच्या बाबी:
सर्वसाधारण १५ फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवावा. त्यानंतर खोडवा उसावर खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
लागवडीच्या उसाचे उत्पादन हेक्टरी १०० टन आणि उसांची संख्या हेक्टरी एक लाखापेक्षा जास्त असलेल्या उसाचाच खोडवा ठेवावा.
खोडवा ठेवायची जमिन सुपीक व निचाऱ्याची असावी.
शिफारशीत ऊस जातीचाच खोडवा ठेवावा.
काणी व गवताळ वाढ या रोगांचा खोडवा उसातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी उष्ण बाष्प प्रक्रिया केलेल्या त्रिस्तरीय बेणेमळ्यातील शुद्ध बेणे बाविस्टीनची बीजप्रक्रिया करून ऊस लागणीसाठी वापरावे. दर ३ ते ४ वर्षांनी बेणे बदल करावा.
खोडवा राखण्याची योग्य वेळ:
उसाची तोडणी ऑक्टोंबर पासून एप्रिल/ मे पर्यंत केली जाते. सर्वसाधारणपणे असे दिसून येते कि जसजसा खोडवा राखण्यास उशीर होतो, तसतसे खोडव्याचे उत्पादन कमी होत जाते. म्हणून १५ फेब्रुवारी नंतर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवू नये. ऑक्टोंबर- नोव्हेंबर या कालावधीत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास अधिक उत्पादन मिळते.
खोडवा ठेवताना लक्ष्यात ठेवायच्या महत्वाच्या बाबी:
ऊस तोडणीच्यावेळी, पाचट ओळीत न लावता जागच्या जागी ठेवावे, शेतात एखाद्या ठिकाणी ढीग राहिल्यास तो पसरून घ्यावा. त्यांनतर उसाच्या बुड्ख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटावे व उसाचे बुडखे मोकळे करावेत जेणे करून त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन कोंब जोमदार येतील.
ऊस तोडणी यंत्राने उसाची तोडणी केल्यास पाचटाचे आपोआपच लहान तुकडे होतात व जमिनीलगत हलकासा पाचटाचा थर तयार होतो त्यामुळे बुडख्यांवरील पाचट बाजूला करावे लागत नाही.
उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारधार कोयत्याने छाटून घ्यावेत त्यामुळे जमिनी खालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते. जमिनीखालील येणारे कोंब जोमदार असतात. बुद्ख्यांची छाटणी न केल्यास जमिनीच्या वरील कांडीपासून डोळे फुटतात. असे येणारे फुटवे कमजोर असतात व क्वचितच त्यांचे उसात रुपांतर होते.
ऊस तोडणी यंत्राच्या सहाय्याने तोडणी केली असल्यास बुडखे आपोआपच जमिनीलगत छाटले जातात त्यामुळे पुन्हा बुडखे छाटणी करावी लागत नाही व खोद्व्याची फुटसुद्धा चांगली होते.
बुडखे छाटणीनंतर लगेचच ०.१% बाविस्टीन (१ ग्रम बाविस्टीन १ लिटर पाणी) या बुरशीनाशकाची फवारणी छाटलेल्या बुडख्यांवर करावी त्यामुळे मातीतून होणार्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो.
शेतात सरीमध्ये ठेवलेल्या पाचटावर प्रति एकरी ३२ किलो युरिया व ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे. त्यांनतर ४ किलो पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धन सेंद्रिय खतामध्ये अथवा ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावे. पाचट कुजण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पाचट कुजविणाऱ्या जीवाणूंची गरज असते.
खोडवा उसाला पाणी द्यावे. पाचटामुळे सुरवातीस पाणी पोहचण्यास वेळ लागतो तरी सर्वत्र पाणी बसेल याकडे जातीने लक्ष द्यावे. पाचट जास्त असल्यास जमिन ओळी असताना सरीतील पाचट पायाने दाबून घ्यावे किंवा जनावरांच्या पायाने दाबून घ्यावे पाचटाचा मातीशी संबध येऊन हळूहळू कुजण्याची क्रिया सुरु होते.
पाणी दिल्यानंतर खोडवा पिकामध्ये गॅप किंवा नांग्या पडल्याने पिक विरळ दिसत असल्यास प्लास्टिक पिशवीत अगर प्लास्टिक ट्रे मध्ये तयार केलेली रोपे वापरून नांग्या भराव्यात.
खोडव्याला पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांची वापसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावी. खते देण्यासाठी नवीन पद्धतीनुसार रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या औजाराच्या सहाय्याने जमिनीत वापसा असताना खोडवा ठेवल्यानंतर १५ दिवसांच्या आत ५० किलो नत्र (१०९ किलो युरिया), २३ किलो स्फुरद (१४५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि २३ किलो पालाश (३९ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) १० ते १५ से.मी अंतरावर वरंब्याच्या बगलेत, १५ ते २० से.मी खोल छिद्र घेऊन, दोन छिद्रामधील अंतर ३० से.मी. ठेऊन सरीच्या एका बाजूला खतमात्रा द्यावी. दुसरी खतमात्रा विरुद्ध बाजूस याच पद्धतीने १३५ दिवसांनी परत द्यावी. खते दिल्यानंतर नेहमीप्रमाणे पाणी द्यावे. *(को.८६०३२ या ऊस जातीसाठी उत्पादनक्षमता जास्त असल्यामुळे रासायनिक खतांची खतमात्रा २५ टक्केने जास्त द्याव्यात.)
– संतोष करंजे, कृषी विद्या विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती