Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

बांधावरील भाजीपाला लागवड फायद्याची

लोकसंख्या जसजशी वाढत आहे, तसतशी पिकांच्या लागवडीयोग्य जमिनीचे क्षेत्र कमी होत चालले आहे. यावर पर्याय म्हणून उपलब्ध सर्व जागेचा वापर करीत बांधांवरही पीक उत्पादन घेतले पाहिजे. त्यासाठी बांधावरील भाजीपाला लागवडीसंबंधी माहिती घेऊ.

बांधावर भाजीपाला लागवड करताना घ्यावयाची काळजी :

 बांधावर उंच व पसरट सावली देणारी झाडे असतील तर अशी जागा टाळावी. ज्या बांधावर आपण भाजीपाला लागवड करणार आहे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध असला पाहिजे.
 लागवडीअगोदर मशागत करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. यामध्ये शेण खत, गांडूळ खत व सर्व प्रकारच्या जीवाणूखतांचा वापर करावा. त्यामुळे रासायनिक खतांच्या कमी मात्रा वापरूनही चांगले उत्पादन घेऊ शकतो.
 सुधारित किंवा संकरित जातींचे बियाणे वापरावे. वाण रोग व कीड प्रतिकारक्षम असले पाहिजेत.
 पाणी व्यवस्थापनासाठी शक्‍यतो ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. कमी पाण्यामध्ये भाजीपाला उत्पादन घेणे त्यामुळे शक्य होईल.
 लागवड शक्‍यतो जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्‍टोबर किंवा जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यामध्ये पाण्याच्या उपलब्धतेनुसार करावी.
 सेंद्रीय खते लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावीत. रासायनिक खते लागवडीच्या वेळी अर्ध्या प्रमाणात व उर्वरित खते १.५ ते २ महिन्याच्या अंतराने द्यावीत.
 आंतरमशागतीमध्ये १५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमीत खुरपणी करावी. ८ ते १० दिवसांच्या अंतराने हंगाम व पिकांच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
 शक्‍यतो जास्त उंच न वाढणाऱ्या भाजीपाल्यांची लागवड करावी.
 वाल, वाटाणा, दुधी भोपळा, घेवडा, कोथिंबीर, काकडी व मिरची या भाजीपाल्यांची लागवड बांधावर करणे सहज शक्‍य आहे.
 कीड व रोग व्यवस्थापनासाठी शक्‍यतो जैविक कीटकनाशकांचा किंवा बुरशीनाशकांचा वापर करावा म्हणजे कमी खर्चामध्ये नियोजन करता येते.
 चांगला बाजारभाव मिळवायचा असेल, तर भाजीपाल्याची काढणी योग्यवेळी केली पाहिजे. तसेच काढणीपश्‍चात व्यवस्थापनाला (काढणी, प्रतवारी व पॅकिंग) महत्त्व दिले पाहिजे.

बांधावरील भाजीपाला लागवड (हंगामनिहाय)

खरीप : वाल, काकडी, दुधी भोपळा, घेवडा, रताळी, सुरण
रब्बी : वाल, वाटाणा, मुळा, पालक, रताळी
उन्हाळी : काकडी, दुधी भोपळा, पालक, रताळी

बांधावरील भाजीपाला पिके, लागवडीचे अंतर, जाती

वाल—————- ६० x ३० सेंमी.———– फुले सुरुची, कोकण भूषण
काकडी————–१ x ०.५ मीटर———— हिमांगी, फुले शुभांगी
दुधी भोपळा——- ५ x १ मीटर————— सम्राट
घेवडा————— ४५ x ३० सें.मी.———- फुले सुयेश, फुले सुरेखा
वाटाणा———— ३० x १५ सें.मी.———– बोनाव्हिला, अरकेल, फुले प्रिया
मुळा————— ३०x१५ सें.मी.————- पुसा देशी, पुसा केतकी, पुसा रेशमी
रताळी————- ६०x२० सें.मी.————- वर्षा, कोकण आश्‍विनी

श्री. यशवंत जगदाळे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
Exit mobile version