योगाभ्यासामध्ये शरीर आणि मन एकत्र आणून अभ्यास केला जातो. योगाभ्यासाची- योगासने आणि प्राणायाम- ही दोन अंगे आपल्याला ठाऊक आहेत. श्वासाकडे लक्ष देत सावकाशपणे केलेल्या योगासनांनी होणारे फायदेही आपल्याला ठाऊक आहेत. मात्र योगासने कुठेही, केव्हाही, कशीही आणि कितीही करणे योग्य नाही. त्यातून मुलांचे शरीर लवचिक असते, त्यामुळे त्यांना योगासने शिकवणे सोपे असा एक गैरसमज प्रचलित आहे.
योगासन करण्याचे योग्य वय
साधारण बाराव्या वर्षानंतर मुलांनी योगासने करावीत, असे जाणकार सांगतात. कारण यावेळेपर्यंत शरीराची हाडे व आतील अवयव यांची वाढ पूर्ण झालेली असते. आसनांमुळे पडणारा ताण सहन करण्यासाठी शरीर तयार झालेले असते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे योग्य मार्गदर्शकाच्या देखरेखीखाली योगासने शिकावी.
ठराविक वेळापत्रक हवे
पहाटे केलेला अभ्यास केव्हाही चांगला. (मग तो शाळेचा असो की योगाभ्यास) ते शक्य नसल्यास इतर वेळेस करायला हरकत नाही. पण आज सकाळी, उद्या दुपारी असे बदलते वेळापत्रक ठेऊ नये. एक वेळ ठरवून त्याच वेळेला योगाभ्यास करावा. शक्यतो आजूबाजूला खेळती हवा असावी. पोट साफ असावे. आपल्याला सतरंजी आणि सैलसर कपडे एवढीच तयारी करावी लागते. अजून एक- जेवण झाल्यानंतर आसने करायची नाहीत, साधारण ३ तासांनी करायची. या सूचना मोठ्यांकरतासुद्धा आहेत.
ही योगासने योग्य
आसनांमध्ये उभे राहून, बसून, पोटावर तसेच पाठीवर झोपून करायची आसने आहेत. यांत सूर्यनमस्कार, वृक्षासन, ताडासन, भुजंगासन, धनुरासन, श्वानासन, वीरासन ही व अशी आणखीन काही आसने करावी. त्यापूर्वी पूरक हालचाली (warm-up) व नंतर शवासन करावे. साधारण ५ सूर्यनमस्कार आणि थोडी आसने अशी सुरुवात करून, हळूहळू प्रमाण वाढवत न्यावे.
असा होईल फायदा
यामुळे पचनशक्ती व भूक तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते. उंची, शारीरिक क्षमता सुद्धा वाढते. एकाग्रताही वाढते, त्यामुळे अभ्यास सुधारायला मदत होते. आसने करताना मुले झाड, पर्वत, कासव, मांजर अशी तुलना करतात आणि योगाभ्यासाचा आनंद लुटतात.