फेसबुक का डिलिट करत आहे लोकांचे फोटो?

फेसबुकचा वापर जगभरात होत असला, तरीही भारतात त्याचे सर्वाधिक वापरकर्ते आहेत. अशातच मध्यंतरी फेसबुकवरील माहितीचा गैरवापर करून निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचे केंब्रिज अ‍ॅनॅलिटीका प्रकरण घडले होते. त्यातून फेसबुकवरील डाटा, माहिती आणि फोटो अजिबात सुरक्षित नाहीत असा एक संदेश वापरकर्त्यांमध्ये पोहोचला होता. याशिवाय समाजात तेढ निर्माण करणाºया पोष्ट आणि लिखाणांमुळेही फेसबुकचे नाव चर्चेत होते. त्यामुळे भारतासह अनेक देशांनी फेसबुकवर बंधने आणली, तरीही वापरकर्त्यांचा खासगीपणा आणि सुरक्षा हा प्रश्न आजही कायम राहतोच. मात्र यासंदर्भात आता फेसबुक एक पुढचे पाऊल टाकत आहे.

फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या ‘मेटा’ ने च्या कृत्रिम बुद्धीमत्ता विभागाचे उपप्रमुख जेरोम पेसेंटी यांनी ही घोषणा केली आहे. चेहरा ओळखण्याची प्रणालीद्वारे फेसबुकचा वापर करण्याची पद्धत मागील काही काळापासून फेसबुकवर कार्यरत होती. जगभरातील 600 दशलक्षापेक्षा जास्त वापरकर्ते या सुविधेचा लाभ घेत होते. आता या प्रणालीशी संबंधित वापरकर्त्यांचे चेहरे आणि व्हिडिओ असा जवळपास एक अब्जापेक्षाही जास्त फोटोंचा व व्हिडिओचा डाटा फेसबुक आता कायमस्वरूपी नष्ट करणार आहे. त्यामुळे इथून पुढे वापरकर्त्यांना चेहरा ओळखून लॉग इन होण्याची सुविधा मिळणार नाही. हा बदल म्हणजे तंत्रज्ञानाच्या इतिहासात सर्वात मोठा बदल समजला जाणार आहे.

भविष्यात वापरकर्त्यांची सुरक्षा जपण्यासाठी फेसबुकच्या या निर्णयाचा उपयोग होऊ शकतो असे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. तसेच फेसबुकने कृत्रिम बुद्धीमत्ता, आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (आभासी वास्तव) या तंत्राचा वापर करून मेटाव्हर्स क्षेत्रात पदार्पण करण्याचे ठरविले आहे. त्यांनी कंपनीचे नावही मेटा असे ठेवले आहे. त्यामुळे येणाºया काळात कदाचित चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाच्याही पुढचे तंत्रज्ञान मेटा प्रणालीत वापरले जाण्याची शक्यता आहे.