‘ट्रॅजेडीकिंग’ दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला

मुंबई , ता. ७ : अनेक पिढ्यांच्या, कोट्यवधी चित्रपटरसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा ‘ट्रॅजेडीकिंग’ काळाच्या पडद्याआड गेला. आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून बॉलिवूडच नाही तर जगभरातील करोडो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे आज वयाच्या ९८ वर्षी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात प्रदीर्घ आजारानंतर सकाळी ७.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या  निधनाने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली असून त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान सदैव स्मरणात राहील, या शब्दांत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती  एम. वेंकैया  नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि चित्रपट क्षेत्रातील आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी  दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल दिलीप कुमार यांना कला क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार (1994) देऊन गौरवण्यात आले.  त्यांना पद्मविभूषण ( 2015) हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कारही मिळाला होता . 2000 ते 2006 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी सायरा बानो आहेत.

भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार

दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळातील ते नायक होते. 1944 मध्ये बॉम्बे टॉकिजची निर्मिती असलेल्या ‘ज्वार भाटा’ चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले, यानंतर दिलीप कुमार यांनी मागे वळून पाहिले नाही. आपल्या दर्जेदार अभिनयातून विविध अविस्मरणीय चित्रपट केले, त्यातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. बेस्ट ॲक्टरसाठी सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड जिंकण्याचे रेकॉर्डही दिलीपकुमार यांच्याच नावावर आहे.अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमुना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर यासारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिलीपकुमार यांनी केवळ अभिनयच केला नाही तर त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीदेखील केली.

1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘मुगल-ए-आजम’ चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड केला. एकापेक्षा एक सरस आणि दर्जेदार चित्रपटांतून अभिनय करणाऱ्या दिलीपकुमार यांचे चित्रपट सृष्टीतील योगदान हे अनन्यसाधारण होते.

भारतीय चित्रपट सृष्टीच्या लौकिकात भर घालणारी, त्याला सातासमुद्रापार नेणारी अशी दिलीप कुमार यांची कारकिर्द आहे. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नेहमीच्या जगण्यातही त्यांनी आपल्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणे  चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवला आणि वाढवला. मेहनतीच्या जोरावर कला क्षेत्रात स्थान निर्माण करता येते, असा संदेश देणारी त्यांची वाटचाल होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

दिलीप कुमार यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत राष्ट्रपती म्हणाले की, त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे.  त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना मोहित केले आणि भारतीय उपखंडात रसिकांनी त्यांच्यावर उदंड प्रेम केले.  दिलीप साब कायम भारतीयांच्या हृदयात राहतील. ” उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. उपराष्ट्रपती म्हणाले की त्यांच्या निधनाने सिनेमा क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. “‘ट्रॅजेडी किंग ’ म्हणून ओळखले जाणारे, हे महान अभिनेते  सर्वात अष्टपैलू कलाकारांपैकी एक होते आणि त्यांनी सामाजिक नाट्यापासून  रोमँटिक नायकापर्यंत विविध भूमिका तितक्याच ताकदीने साकारल्या.”

अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले कि त्यांच्या निधनाने आपल्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी झाली आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला एक लखलखता तारा निखळला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजरामर भूमिका साकारणारे, दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

आज सकाळी दिलीपकुमार यांचे निधन झाल्याचे वृत्त समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केली तसेच त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्र्यांनी दिलीपकुमार राहत असलेल्या खार येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शनही घेतले.  यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर त्यांच्यासमवेत उपस्थित होते.