ट्विटरचे सुरक्षा नियम झाले आणखी कडक

पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ झाले आहेत. त्यानंतर त्यांनी महिला सुरक्षा आणि वैयक्तिक माहिती सुरक्षा या अनुषंगाने नवीन धोरणे तयार करायला सुरुवात केली आहे. मंगळवारी वैयक्तिक माहिती संरक्षण धोरण नवीन अद्यवत केले आहे. त्यानुसार कोणालाही संमतीशिवाय खाजगी व्यक्तींचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्याची परवानगी नाही. कंपनीने ब्लॉग पोस्टद्वारे माहिती दिली की कंपनी आता खाजगी मीडियामध्ये फोटो आणि व्हिडिओ समाविष्ट करण्यासाठी आपल्या वैयक्तिक माहिती धोरणाची व्याप्ती वाढवत आहे.

आतापर्यंत कोणताही वापरकर्ता त्यापरवानगीशिवाय इतर वापरकर्त्यांचे व्हिडिओ आणि फोटो पाठवत असे. फोटो आणि व्हिडिओंबाबत कंपनीने घेतलेल्या निर्णयाचा उद्देश महिला, मुलांच्या, वापरकर्त्यांच्या छळविरोधी धोरणांना  अधिक मजबूत करणे आणि महिला वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवणे हा आहे.

वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ

ट्विटरने म्हटले आहे की, “फोटो किंवा व्हिडिओ यांसारख्या वैयक्तिक माध्यमांच्या प्रसारण करण्याने एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे संभाव्य उल्लंघन होऊ शकते आणि त्यामुळे भावनिक किंवा शारीरिक हानी देखील होऊ शकते.” सोशल मीडिया फर्मने वापरकर्त्यांना इतरांची वैयक्तिक माहिती जसे की त्यांचा पत्ता किंवा स्थान, ओळख दस्तऐवज, गैर-सार्वजनिक संपर्क माहिती, आर्थिक माहिती किंवा वैद्यकीय डेटा शेअर करण्यापासून आधीच प्रतिबंधित केले आहे.

नवीन नियम का लागू केले गेले

“वैयक्तिक माध्यमांचा गैरवापर प्रत्येकावर परिणाम करू शकतो, परंतु याचा महिला, आणि अल्पसंख्याक समुदायांच्या सदस्यांवर देखील विपरित परिणाम होऊ शकतो,” कंपनीने म्हटले आहे. याचा अर्थ असा नाही की फोटो किंवा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यापूर्वी सर्व व्यक्तींच्या संमतीची आवश्यकता असेल, परंतु कोणीतरी ते -काढून टाका- हा पर्याय निवडल्यास प्लॅटफॉर्म त्यावर बंदी घालेल.