मुंबई, दि. ४ : कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील कलावंतांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, कलाकारांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने ताबडतोब प्रस्ताव सादर करावेत”, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिल्या. सांस्कृतिक कार्य विभागातील अधिकाऱ्यांच्या, दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे व अंशतः टाळेबंदीमुळे जवळपास वर्षभर कलाकारांना कला सादर करता आली नसून ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याची निवेदने प्राप्त होत आहेत. तसेच काही कलाकारांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे आवश्यक आहे. या सगळ्यांचा सहानुभतीपूर्वक विचार करून त्यांना दिलासा मिळेल, अशा उपाययोजना प्रस्तावित कराव्यात, अशा सूचनाही मंत्रीमहोदयांनी दिल्यात. याकाळात नाट्य, चित्रपट कलावंतांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांचे अनुदानाचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा, असेही मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले. अन्य प्रयोगात्मक क्षेत्रातील कलावंतांच्या समस्या सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे बैठकीला उपस्थित होते.