Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

तोंडाला पाणी सुटावे असे आमसुलाचे सार!

आपल्या घरात असे अनेक पदार्थ आहेत जे बहुगुणी आहेत. त्याचे सेवन करणे म्हणजे आजारांना दूर पळवणे. पण बरेचदा आपल्याला हे पदार्थच माहित नसतात. असाच एक पदार्थ. तुम्ही सगळ्यानी ऐकला नक्कीच असेल पण तुम्ही त्याचे सेवन करता का?  आमसुलाचे सार याचा मूळ गुणधर्म आहे पित्त कमी करणे. त्यामुळे कोणाला पित्ताचा त्रास झाला तर अथवा घसा दुखत असेल तर त्यांनी गरमागरम आमसुलाचे सार प्यावे. घशाला आराम वाटतो. या सारामुळे तोंडाला चव येते. शिवाय हे आमसुलाचे सार तयार करणे फार अवघड नाही. बनण्यास सोपे असे हे आमसुलाचे सार.

साहित्य :

८-१० सुकी आमसुले ,चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे व मीठ, किसलेला गूळ एक चमचा, पाव वाटी खवलेला नारळाचा चव,दोन चमचे तांदूळाची पिठी, एक चमचा जिरे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर व दोन कप पाणी.

कृती :

गॅसवर एका स्टीलच्या भांड्यात दोन वाट्या पाणी आणि ८-१० सुकी आमसुले घालून उकळून   घ्या.  नंतर ओल्या नारळाचा चव, हिरवी मिरची, मीठ व जिरे पूड एकत्र मिक्सरवर वाटून घ्या. हे वाटण   आमसुल घालून उकळलेल्या पाण्यात घाला. त्यात चवीनुसार गूळ घालावा. तांदळाची पिठी घालावी. जेणेकरून साराला दाटपणा येईल. हे मिश्रण एकजीव होऊ द्यावे आणि पाच मिनिटे उकळून घ्यावे. कोथिंबीर भुरभुरावी आणि तुमचे सार तय्यार!

Exit mobile version