Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

रजनीकांत यांचे विशेष चित्र

सुपरस्टार रजनीकांत यांना 70 व्या जन्मदिनानिमित्त सुविख्यात संगीत दिग्दर्शक ए आर रेहमान यांनी सामाजिक माध्यमांवर रजनीकांत यांचे विशेष चित्र प्रदर्शित केले. ट्वीटर द्वारे ए आर रेहमान म्हणाले, “सुपरस्टार रजनीकांत यांना 70 व्या जन्मदिनानिमित्त चाहत्यांतर्फे विशेष चित्र प्रदर्शित करणे
माझे भाग्य. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा सुपरस्टार रजनीकांत. आपणास उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे ”

12 डिसेंबर 1950 साली रजनीकांत यांचा जन्म बंगळूरू येथे एका मराठी कुटुंबात झाला. चित्रपटात येण्यापूर्वी शिवाजी राव गायकवाड यांनी कुटुंबास आर्थिक सहकार्य करण्यासाठी बस कंडक्टर, कार्पेंटर आणि अन्य अनेक कामे केलीत. शिवाजी राव गायकवाड पासून सुपरस्टार रजनीकांत
हा प्रवास एखाद्या अद्भुत चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. बंगळूरू मध्ये कर्नाटक परिवहन मंडळात बस कंडक्टर म्हणून कार्यरत असताना शिवाजी राव गायकवाड यांनी नाटकात काम करण्याची आवड जोपासायला सुरवात केली. त्यांनी अनेक कन्नड नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर मित्रांच्या
प्रोत्साहनाने ते चेन्नईत चित्रपटाच्या शिक्षणासाठी गेले.

शिवाजी राव गायकवाड यांना पुट्ट्णा कानगल यांच्या कथा संगमा या कन्नड चित्रपटाद्वारे पहिली संधी प्राप्त झाली. त्यानंतर प्रथितयश दिग्दर्शक के
बालचंदर यांनी शिवाजी राव गायकवाड यांच्यातील क्षमता ओळखत तमिळ शिकण्याचा सल्ला दिला तसेच 1975 साली अपूर्व रागंगल चित्रपटात एका कर्करोग ग्रस्त मनुष्याची भूमिका बजाविली. त्या चित्रपटाचे नायक कमल हसन आणि रजनीकांत पुढील काळात अत्यंत घनिष्ठ मित्र झाले. अपूर्व रागंगल
चित्रपटानंतर शिवाजी राव गायकवाड यांचे रुपांतर रजनीकांत असे झाले आणि त्यांनतर जे झाले तो इतिहास आहे.

आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत रजनीकांत-थलैवा यांनी कन्नड, तमिळ, तेलुगु, हिंदी, मल्याळम सहित बंगाली आणि इंग्रजी चित्रपटातही काम केले. 170 पेक्षा जास्त चित्रपटात काम करून नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या सुपरस्टार रजनीकांत यांना पद्म भूषण आणि पद्म विभूषण
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बहुभाषा कोविद रजनीकांत यांना मराठी, कन्नड, तमिळ, तेलुगु, आणि इंग्रजीची उत्तम जाण आहे.

9 जानेवारीला सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘दरबार ‘ चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला. दरबार नंतर सुपरस्टार रजनीकांत दिग्दर्शक शिवा यांच्यासोबत काम करणार आहे. अन्नात्थे या चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर करणार आहे. याचित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत अनेक वर्षांनी अभिनेत्री मीना आणि खशबू सुंदर काम करणार आहेत. अन्नात्थे चित्रपटाचे चित्रीकरण मंगळवार 15 डिसेंबर पासून सुरु होणार आहे.

मुळातच अध्यात्मिक असलेले रजनीकांत यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून सुपरस्टार ऋषिकेशच्या स्वामी दयानंद आश्रम परिसरास भेट दिली. रजनीकांत दरवर्षी ऋषिकेश येथे दर्शनास येतात. रजनीकांत यांना स्वामी दयानंद आश्रम परिसरात पाहण्यात आले तसेच त्यांचे चाहत्यांसोबत फोटो काढले 2018 साली वर्षी रजनीकांत यांनी रामकृष्ण मठास सुद्धा भेट दिली हाती. स्वामी दयानंद रजनीकांत यांचे गुरु आहेत. रजनीकांत यांनी स्वामी दयानंद यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि काही काळ ध्यान केले. सुपरस्टार रजनीकांत जवळपास दहा दिवस हिमालय क्षेत्रात वास्तव्य केले . यावेळी यांच्यासोबत मुलगी ऐश्वर्या धनुष सुद्धा उपस्थित होत्या.

31 डिसेंबरला रजनीकांत आपल्या राजकीय पक्षाची जाहीर घोषणा करणार असून पक्षाची अधिकृत सुरुवात जानेवारी महिन्यात होणार आहे. 2017 डिसेंबर महिन्यात राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत रजनीकांत यांनी दिले होते. मात्र जवळपास तीन वर्षानंतर या घोषणेस मूर्त रूप प्राप्त होणार
आहे. माध्यमांशी बोलताना रजनीकांत म्हणाले, “दिलेल्या वचनावर मी कधीच मागे फिरत नाही. तामिळनाडूत राजकीय बदल आवश्यक आहे. ही सध्याची गरज असून आता झाले नाही तर कधीच होणार नाही. यासाठी नागरिकांनी माझ्यासोबत राहावे. आपण सोबत हा बदल घडवून आणू. एकत्र मेहनत करून विजय प्राप्त करू.मागील महिन्यात चेन्नईत राघवेंद्र सभागृहात रजनीकांत यांनी आपल्या ‘ रजनी मक्कल मंदरम’ या संस्थेच्या
पदाधिका-यांची बहुचर्चीत आणि बहुप्रतीक्षित  बैठक घेतली आणि विविध विषयांवर चर्चा मंथन आणि मंत्रणा केली.

सत्ताधारी अण्णा द्रविड मुनेत्र कळगम (अण्णाद्रमुक) तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकचे जेष्ठ नेते एडप्पाडी के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात अण्णाद्रमुक निवडणूक लढविणार असून ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून अण्णाद्रमुकने विधानसभा निवडणुकीसाठी 11 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. डीएमकेने प्रशांत किशोर यांच्या आय-पॅक संस्थेसोबत करार केला आहे.

प्रशांत किशोर आणि एम के स्टालिन एकत्र आल्यामुळे सर्वांचे लक्ष 2021 तामिळनाडू विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे.निवडणूकीत द्रविड मुनेत्र कळगमचे अध्यक्ष एम के स्टालिन विरुद्ध एडप्पाडी के पलानीस्वामी असा थेट सामना रंगणार आहे.मात्र कमल हसन, रजनीकांत आणि शशिकला यांच्या उपस्थितीने समीकरण बदलण्याची दाट शक्यता आहे.

Exit mobile version