चक्री वादळ येणे, किंवा आणखी कुठले वादळ येणे ही गोष्ट आता सामान्यांना माहिती आहे. पण सौर वादळ येणे ही बाब वेगळी आहे आणि धोकादायक ही. अवकाशातील एक घटना अशाच एका सौर वादळाची नांदी ठरू पाहत आहे.
यूएस स्पेस एजन्सी नासाच्या सौर डायनॅमिक वेधशाळेने अलीकडेच सूर्याच्या बाह्य वातावरणात एक प्रचंड ‘कोरोनल होल’ शोधला आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या भाषेत याला कोरोना म्हणतात. सूर्याच्या दक्षिण गोलार्धातील कोरोनामधील छिद्रातून भारीत कण बाहेर पडतात. येथील तापमान 1.1 दशलक्ष अंश सेल्सिअसपर्यंत आहे, त्यामुळे पृथ्वीवर मोठे सौर वादळ येऊ शकते. शास्त्रज्ञ सतत सूर्याच्या बाह्य पृष्ठभागावर लक्ष ठेवून आहेत. पृथ्वीवरील संभाव्य धोक्याचे देखील मूल्यांकन करत आहेत.
पृथ्वीवर धडकू शकते सौर वादळ
संशोधकांनी म्हटले आहे की सूर्याच्या वातावरणातील बिघाडामुळे पृथ्वीवर मोठे सौर वादळ येऊ शकते. याचे कारण असे की सूर्याच्या पृष्ठभागावर सापडलेल्या छिद्रातून भारीत कणांचा सतत स्फोट होतो. या कणांमुळे पृथ्वीच्या भूचुंबकीय क्षेत्रात हालचाल होऊ शकते. याचा अर्थ पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशात भूशास्त्रीय परिणाम होऊन शकतो. परिणामी, उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर आकाशात अवरोरा (अवकाशातील प्रकाश) दिसण्याची मोठी शक्यता आहे.
असा होणार परिणाम
सौर वादळाचा थेट परिणाम मानवांवर होणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. सौर वादळे पृथ्वीचे बाह्य वातावरण तापवू शकतात. याचा परिणाम उपग्रह, GPS मॅपिंग, मोबाईल फोन आणि उपग्रह दूरदर्शन सिग्नलवर होऊ शकतो. विद्युत वाहिन्यांमधील विद्युत प्रवाह खूप दाबाने वाहू शकतो. ज्यामुळे सर्किट्सचा स्फोट होऊ शकतो. अर्थात असे असले तरी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सौर वादळ आणि त्याचा परिणामांपासून संरक्षण करते त्यामुळे वादळाचा परिणाम सौम्य होऊ शकतो किंवा नाहीही. संशोधक त्यावर लक्ष ठेवून आहेत.