‘बाहेर जातेच आहेस, तर पॅरासिटॅमॉल घेऊन ये ग.’’ असे आता सांगणे धोकादायक ठरू शकते. तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर अधिकच! वाचा आणि विचार करा!
ताप, डोकेदुखी, अंगदुखी असेल तर मेडिकलममध्ये जाऊन मनानेच पॅरासिटॅमॉल आणणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पण सतत ही गोळी घ्यावी का, ऊठसूट ही गोळी कुणी घेऊ नये, याबाबत एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, डॉक्टरांना आपली तब्येत व्यवस्थित दाखवून त्यांच्या सल्ल्यानेच ही गोळी घ्यावी. उच्च रक्तदाबाचा त्रास असूनही पॅरासिटमॉलच्या गोळ्या घेणाऱ्यांना हृदयविकार आणि पक्षाघाताचा त्रास होऊ शकतो, असा निष्कर्ष एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून निघाला आहे.
डोकेदुखी आणि तापावर पेनकिलर घेणे सुरक्षित असते. अंगदुखी आणि ताप असेल तर वेदनाशामक गोळी किंवा पॅरासिटमॉलचा जगभरात वापर केला जातो. वेदनाशामक गोळीत पॅरासिटामॉल असतेच.
पॅरासिटॅमॉलवर स्कॉटलंडमध्ये एक संशोधन करण्यात आले. २०१८ साली या देशातील काही लाख लोकांना अंगदुखी, डोकेदुखी किंवा तापावर इलाज म्हणून पॅरासिटमॉल घ्यायला सांगितले होते. त्यावेळी लक्षात आले की रक्तदाब असलेल्या लोकांना हृदयविकार जडला आहे. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हृदयविकाराचा धोका आणि पॅरासिटमॉलमध्ये संबंध असल्याचे समोर आले होते. इंग्लंडमध्येही तिघांपैकी एकाला रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे लक्षात आले आहे.
शंभर जणांची मुलाखत घेतली असता त्यांच्यापैकी दोन तृतीयांश लोक रक्तदाबासाठीची औषधं घेत होते. तसेच एका संशोधनात सलग दोन आठवडे दिवसातून चार वेळा एक ग्रॅम पॅरासिटमॉल घेतल्यावर असा निष्कर्ष निघाला की, गोळी घेत असलेल्या लोकांचा पॅरासिटमॉलमुळे रक्तदाब वाढला. रक्तदाब ही हृदयविकार आणि स्ट्रोकची प्राथमिक पायरी असते, म्हणून या संशोधनाकडे दुर्लक्ष करता कामा नये.
त्यामुळे डोकेदुखी किंवा ताप आल्यास दोन ते पाच दिवसांसाठीच पॅरासिटमॉल घेतल्यास हरकत नाही, पण केवळ अंगदुखी किंवा डोकेदुखी असल्यास पॅरासिटॅमॉल टाळण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. तसेच उच्च रक्तदाब असल्यास डॉक्टरांच्या मार्गदर्शन व सल्ल्यानेच ही गोळी घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आता पॅरासिटमॉल खूप काळ सलग घेतल्याने रक्तदाबात वाढ झाली असता ती तशीच राहते का नंतर
आपोआप कमी होते, यावर संशोधन सुरू आहे. तसेच रक्तदाब वाढला तर हृदयरोगाची शक्यता किती असते, यावरही संशोधन केले जाणार आहे.
त्यामुळे डोके दुखतेय, अंग दुखतेय, या सबबींखाली मेडिकलमध्ये जाऊन स्वतःच्या मनाने सरसकट पॅरासिटॅमॉल घेऊ नका आणि खाऊही नका. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी तर पॅरासिटॅमॉल घेण्याआधी शंभरवेळा विचार करावा.