अंशुमन-जुईली झळकणार ‘सिंगिंग स्टार’च्या मंचावर!

२१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘सिंगिंग स्टार’ या सोनी मराठी वाहिनीच्या कार्यक्रमात ज्या कलाकार जोड्या दिसणार आहेत त्यांतलीच एक जोडी अंशुमन विचारे आणि जुईली जोगळेकर ही असेल.

अंशुमनला सर्वांनी विनोदी अभिनय करताना पाहिलं आहे, पण अंशुमनला गाणं प्रचंड आवडतं. तो गाणं शिकलेला नाही, पण जे काही गाणं तो गाऊ शकतो ती त्याला दैवी देणगी आहे असं तो मानतो. सोनी मराठी वाहिनीवरील सिंगिंग स्टार या कार्यक्रमामुळे त्याला गाणं शिकण्याची संधी मिळणार असल्याचंही तो म्हणतो. या संगीतमय प्रवासात अंशुमनला साथ देणार आहे गायिका जुईली जोगळेकर. जुईली नव्या पिढीची युवा गायिका आहे.

याचबरोबर ऐतिहासिक भूमिका करून आपला वेगळा ठसा उमटवलेले अजय पुरकर हेही सिंगिंग स्टार या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून दिसणार आहेत. अजय पुरकर यांनी शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या आईकडून त्यांच्यात गाणं आलं, असं ते मानतात. त्यांच्या या संगीत प्रवासात त्यांना साथ देणार आहे गायिका अमृता नातू. ‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमामुळे गाण्याच्या पुन्हा जवळ जाण्याची आणि प्रेक्षकांना आपलं गाणं ऐकवण्याची संधी मिळणार असल्यानं अजय खूश आहेत.

‘सिंगिंग स्टार’ या स्पर्धेत जुई गडकरी-हर्षवर्धन वावरे, स्वानंदी टिकेकर-रोहित राऊत, अभिजित केळकर-कविता राम, अर्चना निपाणकर-राहुल सक्सेना, पूर्णिमा डे-मंदार आपटे या जोड्याही प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. हा कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांसाठी सुरेल मेजवानीच असणार आहे. सोनी मराठी वाहिनीचा हा पहिलाच संगीत कार्यक्रम आहे आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी या कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढणार आहे!