Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष

जगातील सर्वांत मोठ्या सॉफ्टवेअर निर्मात्या मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने भारतीय वंशाच्या सत्या नाडेला यांची कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याआधी नाडेला यांनी गेली ७ वर्षे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पद भूषविले आहे. दरम्यान कंपनीचे माजी अध्यक्ष जॉन थॉम्पसन यांची प्रमुख स्वतंत्र संचालक पदी (लीड इंडिपेंडंट डायरेक्टर) नियुक्ती केल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.

२०१४ मध्येच जॉन थॉम्पसन यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्याकडून कंपनीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. तसेच स्टीव्ह बामर यांच्यानंतर ५३ वर्षीय नाडेला २०१४ पासून मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

नाडेला यांची या पदावर एकमताने नियुक्ती झाली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नाडेला यांचे व्यवसायाबद्दलचे सखोल ज्ञान योग्य धोरणात्मक संधी स्वीकारण्यासाठी आणि महत्त्वाच्या जोखीम ओळखण्यासाठी कंपनीला उपयोग होईल.

नाडेला यांची सीईओ पदाची कारकिर्द

नाडेला यांच्या सीईओ पदाच्या कारकिर्दीत मायक्रोसॉफ्ट कंपनीची मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वृद्धी झाली. लिंक्डइन, नुआन्स कम्युनिकेशन्स, झेनीमॅक्स यांसारख्या कंपन्या अब्जावधी डॉलर्संना मायक्रोसॉफ्टने विकत घेतल्या. त्याची दखल घेऊन नाडेला यांना अध्यक्षपदी बढती देण्यात आली असल्याची चर्चा आहे.

ॲपल, गुगलच्या स्पर्धेत घेतली आघाडी

१९७५ मध्ये स्थापन झालेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला नवी उर्जा देण्याचे काम नाडेला यांनी केले. २०१४ मध्ये नाडेला सीईओ झाले. त्या वेळी ॲपल आणि गुगल या स्पर्धक कंपन्यांनी मोबाईलवर लक्ष केंद्रित करून आघाडी घेतली होती. त्या स्पर्धेत कंपनीला आणण्याचे काम नाडेला यांनी केले.

योगदान ठरले कंपनीच्या वाढीसाठी साह्यभूत

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात नाडेला यांनी कंपनीत मोठे संघटनात्मक बदल केले. १४ टक्के मनुष्यबळात कपात करून त्यांनी कॉर्पोरेट स्ट्रक्चर सुटसुटीत केले. फिनलॅंडमधील नोकिया कंपनीचा मोबाईल विभागही त्यांनी कंपनीशी जोडून घेतला. या कालावधीत क्लाउड कम्प्युटिंगला त्यांनी प्राधान्य दिले. त्यांचे हे पाऊल कंपनीच्या वाढीसाठी साह्यभूत ठरले. त्यांच्या काळात डेटा सेंटर्समधून सॉफ्टवेअर्स आणि सर्व्हिसेस रेंटवर उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देण्यात आला. जगभरातील सुमारे ७५ टक्के कम्प्युटर्समध्ये मायक्रोसॉफ्टची विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे. येत्या आठवड्यात विंडोजची नवी जनरेशन सादर केली जाणार आहे.

दरम्यान कंपनीने तिमाही लाभांश जाहीर केले असून ते प्रति शेअर ५६ सेंट्स एवढे असतील आणि ९ सप्टेंबर रोजी दिले जातील, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version