जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना

मुंबई, दि. 6 : व्ही. शांताराम जीवन गौरव, राजकपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 1 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या समितीचा कालावधी शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षे किंवा समितीची पुनर्रचना होण्यापर्यंत असणार आहे.

व्ही. शांताराम जीवन गौरव आणि विशेष पुरस्कार निवड समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख हे अध्यक्ष तर सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर हे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक हे सदस्य असतील. तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक सतीश रणदिवे, ज्येष्ठ अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेत्री रेणुका शहाणे, निर्माता आणि दिग्दर्शक किरण शांताराम हे या समितीमध्ये अशासकीय सदस्य असणार आहेत.

राजकपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख हे अध्यक्ष तर सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर हे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक हे सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. तर निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, निर्माता, दिग्दर्शक आणि नागराज मंजुळे, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम हे या समितीमध्ये अशासकीय सदस्य असणार आहेत.