धावपट्टीवर विमानाला दे धक्का..

दुचाकी आणि चार चाकी वाहने ढकलताना तुम्ही खूपवेळा पाहिले असतील. पण तुम्ही कधी विमानाला धक्का देताना पाहिले आहे ? असे क्वचितच कुणी पाहिलं असेल.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे, ज्यामध्ये लोक विमानाला ढकलताना दिसत आहेत. वास्तविक हा मजेदार व्हिडिओ नेपाळमधील बाजुरा विमानतळावरील आहे. तारा एअरलाइन्सचे छोटे विमान आहे. विमानतळाच्या धावपट्टीवर अचानक या विमानाच्या लँडिंग गिअरचे टायर पंक्चर झाले.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही लोक विमानाला धक्का देत आहेत. जोपर्यंत हे विमान विमानतळावर पार्किंगमध्ये नेले जात नाही, तोपर्यंत दुसरे कोणतेही विमान धावपट्टीवर उतरू शकत नाही. अशा परिस्थितीत मार्ग मोकळा व्हावा म्हणून विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांच्या मदतीने धावपट्टीवर उभे असलेले विमान हटविण्याचा निर्णय घेतला.

शेवटी, लोकांनी हे विमान धावपट्टीवरून यशस्वीपणे काढले. त्यानंतर धावपट्टी रिकामी करून लँडिंगच्या प्रतीक्षेत असलेल्या विमानाला लँडिंगची परवानगी दिली जाते. काही वेळातच खराब झालेल्या विमानाचे पंक्चर झालेले टायरही बदलण्यात येते.