Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन

मुंबई, दि. 22 : आरोग्यदायी निरोगी जीवनशैली आणि सार्वजनिक आरोग्य यासंदर्भातील योजना याबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने लघुचित्रपट स्पर्धा आयोजित केली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग विविध माध्यमातून आरोग्य शिक्षण तळागाळात पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. लोकांनीही आरोग्य शिक्षणासाठी जनजागृती करावी व आरोग्य विषयावरील माहितीपटासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

आरोग्य शिक्षणासाठी लोकसहभाग लाभावा, विविध विषयांवर जनजागृती व्हावी यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांचे प्रश्न ओळखून ते कल्पक रितीने मांडून वर्तनात बदल घडवण्यासाठी योगदान द्यावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.

स्पर्धा दोन विभागात घेण्यात येत आहे. आरोग्यविषयक व्हिडिओ स्पॉट (कालावधी 1 मिनिटापर्यंत) आणि माहितीपट/ लघुचित्रपट (कालावधी 10 मिनिटांपर्यंत), असे दोन प्रकार असतील. स्पर्धा सर्वांसाठी खुली असणार आहे आणि प्रवेश विनामूल्य आहे.

या लघुचित्रपट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयार केलेली फिल्म ७ मार्च २०२२ पर्यंत iecmaff22@gmail.com या ई-मेल वर पाठवावी. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी https://mahaarogyasamvadiec.in/maff-2022/  या लिंकवर भेट द्यावी. तसेच राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, परिवर्तन इमारत, विश्रांतवाडी, पुणे ४११००६ दूरध्वनी क्रमांक. 8208623479 संपर्क साधावा. असे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Exit mobile version