तोटय़ातील गुंतवणुकीतून बाहेर पडणेही अवघड झाल्यामुळे भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ६ कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना ८.५० टक्के व्याज दोन हप्त्यांमध्ये अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
ईपीएफओने २०१९-२० साठी व्याजाचा दर ८.५ टक्के पातळीवर आणला आहे. आधीच्या वर्षी म्हणजे २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के व्याजाचा दर कर्मचाऱ्यांना त्यांच्या ‘पीएफ’ रकमेवर मिळाला होता. यंदा व्याजदरही घटला तसेच तो जमा ही झाला नाही. पहिल्या हप्त्यात ८.१५ टक्के आणि उर्वरित ०.३५ टक्के व्याज हे डिसेंबरमध्ये जमा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.