‘मेरी आवाज ही, पहचान है… या स्वरमय सूरांनी दिला लतादीदींना अखेरचा निरोप’

नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज़ ही, पहचान है, गर याद रहे,  या संगीतमय धूनीच्या स्वरमय वातावरणात स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला शासकीय व लष्करी इतमामात, मंत्रोच्चारात अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरींची सलामी देऊन जवानांनी यावेळी मानवंदना दिली.

यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वतीने वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी  पुष्पचक्र अर्पण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,रश्मी ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री पियूष गोयल, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल देसाई, मनसे अध्यक्ष राज ठाकरे,आमदार सुनील प्रभू,मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,मिलिंद नार्वेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह-चहल, तसेच लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील  ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर,भारतरत्न सचिन तेंडुलकर, लेखक-गीतकार जावेद अख्तर, गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेता शाहरुख खान,अमीर खान, रणबीर कपूर,गायक शंकर महादेवन, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, भारतरत्न लता मंगेशकर यांचे असंख्य चाहते, चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थितांनी आदरांजली वाहिली.

त्यांच्या राहत्या घरी प्रभुकुंज येथून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान पर्यंत फुलांनी सजलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेसोबत त्यांचे निकटवर्तीय होते. भारतरत्न लता मंगेशकर यांचे असंख्य चाहते उपस्थित होते, यावेळी अनेकांना लतादीदींना निरोप देताना अश्रू अनावर झाले होते.