जीवनशैली : नव्या नोकरीच्या ठिकाणी वावरताना

नवीन जॉब मिळाल्यानंतरचा आनंद खूप काही सांगून जातो. नव्या जॉबमुळे आयुष्याला एक नवी कलाटणी मिळणार असते. पण आनंद आणि उत्साहाच्या भरात कळत-नकळत घडलेली एखादी छोटीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे नव्या जॉबला जाताय पण जरा सांभाळून….कारण तुमच्या प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण केले जाते.

सेलिब्रेशन तर बनतचं

चांगली नोकरी मिळवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. पण एकदा का जॉब मिळाला की हायसं वाटतं. मग मित्र-मैत्रिणींना ग्रँड पार्टी, धमाकेदार सेलिब्रेशन तर होणारच कारण जॉबसाठी आपण भरपूर मेहनत घेतलेली असते. त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है बॉस.

फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन (टिप्स)

नव्या जॉबमुळे जीवनात एक सुखद बदल जाणवतो. पण नव्या जॉबबरोबरच नव्या जबाबदाऱ्याही समोर उभ्या ठाकतात. त्यामुळे पहिलं पाऊल सांभाळून टाकायला हवं. सुरुवातीला विनम्रतेने सहकर्मचाऱ्यांची व वरिष्ठांची ओळख करून घ्या. आपले डोळे व कान उघडे ठेवत अॉफिसमध्ये घडणाऱ्या घटनांचे बारीकीने निरिक्षण करा. अॉफिसमधील शिष्टाचार, नियम, पद्धती सर्व जाणून घ्या व त्यांचे तंतोतंत पालन करा. कुणाच्याही चुका काढू नका अर्थात लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला सोपवलेलं काम आधी समजून, निरखून घ्या मगच कार्य करा. अॉफिस स्टाफसोबत आपल्या वैयक्तिक गोष्टी जास्त शेअर करू नका.

नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.

नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाची कामे, फोन नंबर्स डायरीत नोट करा. दुसऱ्यांच्या विचारांचा सन्मान करा. कंपनीचे नवीन प्रोजेक्ट, नवीन कार्यक्रम यांमध्ये रूची ठेवा. भले तुम्ही सक्रिय सहभागी नसला तरीही आपल्या कामाशी काम ठेवा. गटातटात पडू नका. आपली वेगळी छवी निर्माण करण्याचा प्रयत्न करा. बॉडी लँग्वेज, राहणीमान, आपले विचार सरळ, साधे सकारात्मक ठेवा. आपल्यावर होणाऱ्या टिकेला सहन करण्याची क्षमता ठेवा. बॉसच्या नजरेत ईमानदार, हुशार राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्यासमोर यशाचे व प्रगतीचे दरवाजे उघडले जातील. अहंकाराला चार हात दूरच ठेवा, नाहीतर काम बिघडलच म्हणून समजा. चूक झाली तर ती मान्य करून त्यापासून धडा घेऊन ती सुधारण्याचा प्रयत्न करा.